Saturday, August 28, 2010

प्रकाश नारायण संत

आम्ही नातेवाईकांकडे गेलेलो. आता नातेवाईकांकडे जाणार म्हणजे एक नंबर काम. दिवसभर काही काम न करता नुसत्या चकाट्या. म्हणजे त्या घरातली माणसं काही बाही कामं करत असणार, बायका स्वयंपाकघर हे ते बघणार, एकोणीसवेळा चहा, सरबत असलं काही विचारणार, पुरुष, कामावर जाणार, खरेदी हे ते बघणार; सुट्टी असलीच तर ते पण आपल्याबरोबर असणार चकाट्या पिटायला. पण आपण मात्र लोळत, गप्पा मारत, दिलेला चहा पित, काहीतरी चघळत, झालंच तर कुठे पत्ते हे ते खेळ, अंगणात भटक, असा दिवस घालवणार. दुपारच्या वेळी आजुबाजूच्या बिट्ट्यांच्या आया त्यांना घरी घेऊन जाणार तेव्हा तर मग दुपार खायला की काय ते उठणार. मग आपण काकांना मदत करू का म्हणून विचारणार.
"काका, तुम्हाला काही मदत हवी का?"
"मदत बिदत कसलं ते, सोड, सुट्टीची‌ मजा कर. कामं होतायत पटपट." - काका एकीकडे झाडाला आळं करत म्हणणार.
"मला कंटाळा यायलाय".
"असं म्हणतोस, बरं मग हे खुरपं घे आणि त्या शेजारच्या झाडाला आळं कर जा" - काकांना पण बरं वाटणार कोणीतरी सोबत म्हणल्यावर. पण तेवढ्यात काकू येणार, मला लाडू विचारत, आणि मला खुरप्यासकट झाडाच्या मुळाशी हात घातलेला पाहून काकांवर ओरडणार.
"सुट्टीला म्हणून आलाय तो आणि तुम्ही एकदम खुरपं दिलंत त्याच्या हातात. आपण एक दिवसभर खळ नसल्यासारखं कामं करणार, स्वस्थ बसायचं नाव नाही घेणार, आता त्या पोराला पण. सुट्टीचे चार दिवस तरी त्याला मजा करायला नको? . . ." - काकूचा लांबच लांब पट्ट सुरू होणार. काकांनी सोडलेल्या "अगं पण", "तोच तर", "ऐकून घे" वगैरे छोट्या पुड्या ह्या पट्ट्यापुढे हवेत कुठल्या कुठे उडून जाणार. माझं बखोटं‌ धरून काकू मला ओढत विहिरीकडे नेणार, माझे हातपाय धुणार, आणि लाडूची‌ वाटी माझ्या हातात देऊन माझ्या तोंडावर हात फिरवत, "गरीब बिचारं ते सोनं माजं" असं हे ते म्हणत मला घरात घेऊन जाणार. ह्या सगळ्या प्रकारात ते म्याड खुरपं समजूतदारपणे माझ्या हातातून निसटून कुठेतरी पडलेलं असणार आणि काकूचा पट्टा पार त्या झाडाच्या मुळापासून ते स्वयंपाकघरापर्यंत लांबलेला असणार. काकांना तो कडक वाटला तरी‌ मला मात्र तो एकदम मऊ वाटणार, काकूनं नेसलेल्या सुती लुगड्य़ासारखा!
तर असं ते काका, मामा, आज्जीकडे सुट्टीत रहायला जाणं. घरात असा आळस यायचं कामच नाय. जरा पडलेला दिसलो की आई बाजारात पाठवणार, बाबा काहीतरी काम सांगणार, नाहीतर उगाच पाढे, परवचा असं झेंगट मागं लावून देणार, कधी रागावणार, धपाटा घालणार. ते सगळं दुसरीकडे नसणार, तरी पण आपण तिथून आपल्या घरी कधी‌ जातो असं होणार, आणि आपल्या घरात शिरताच 'आई' म्हणून ओरडणार.

तर आत्तापण असाच कुणा मामाकडे, काकाकडे म्हणून गेलेलो आणि अशाच पट्ट्याला धरून घरात आलेलो, म्याडसारखा एका हातात वाटी आणि दुसऱ्या हातात लाडू धरून. तो लाडूपण म्याडसारखा कधी तोंडात गेलेला ते पण नाही कळलं. नकळत पुस्तकाच्या एका कपाटासमोर उभारलेलो, यातलं कुठलं वाचायला घ्यावं याचा विचार करत. आमच्या वर्गात बाईंनी‌ नाटकात काम करण्यासाठी‌ पोरांना हात वर करायला सांगितल्यावर जशी सगळी‌ पोरं मी, मी‌ करत हात वर करतात तसं सगळी‌ पुस्तकं मी, मी करताहेत असं वाटायलेलं. मी पटकन एक पुस्तक काढलं, 'वनवास' - प्रकाश नारायण संत! मुखपृष्ठावर हिरव्या रंगाच्या गोंधळात एक मुलगा गुडघ्याला मिठी‌ मारून, एका गुडघ्यावर गाल टेकवून, म्याडसारखा बसलेला. त्या हिरव्या रंगांच्या गोंधळासारखाच गोंधळ त्या मुलाच्या मनात असणार, आणि गुडघ्याला मिठी मारून तो मुलगा त्या गोंधळात हरवून गेलेला असणार असं वाटायला लागलेलं. म्हणजे तो मुलगा आणि मी यात काहीच फरक नसणार. माझ्याही मनात असाच हिरवा गोंधळ, आणि मी‌ त्यात कधीकधी‌ हरवून जाणार, बऱ्याचदा संध्याकाळी, राखाडी संध्याकाळ आणि तो हिरवा गोंधळ आणि मी त्या दोऩ्हींत विरघळलेला. आई मला शिंगं फुटायला लागली असं काही म्हणते तसंच त्या मुलाचं पण झालेलं असणार, न दिसणारी, हिरवी शिंगं!
तर असा तो 'वनवास' घेऊन बसलेलो. त्या मुलाचं नाव लंपन हे मला चांगलंच कळलेलं आणि माझंही नाव लंपन आहे असं वाटायला लागलेलं. जसं पुस्तक वाचायला लागलो तसा माझ्यातला लंपनही मला दिसायला लागलेला. म्हणजे मी वाचत होतो तो लंपन वेगळा, आणि दिसत होता तो लंपन वेगळा पण तरीही एकच असं काही म्याडसारखं वाटायला लागलेलं. तो लंपन त्याच्या आज्जीकडे कानडी मित्रांसोबत आणि माझा लंपन माझ्या कोण कोण आत्या, मामी, आजी अशांकडे, कधी फणस, आंबा असल्या झाडांवर सतराशे छत्तीस पानं आणि फांद्यांमध्ये शत्रूपासून लपून बसलेला, कधी मारुतीच्या देवळाभोवतीच्या कट्ट्यावर दरबार भरवून राज्याची हालहवाल पाहणारा, कधी गच्चीवर तोफा लावून किल्ल्यावरचा हल्ला परवणारा, कधी गळलेले छोटे फणस, नारळ असं काय काय गोळा करून प्राजक्ताच्या बियांच्या मोहरांच्या बदल्यात व्यापार करणारा, कधी आजूबाजूच्या पोरांबरोबर गारगोट्या, सागरगोटे, आगपेट्यांची पाकिटं असं काहीबाही गोळा करत तासंतास भटकणारा. तो शत्रू तरी म्याडसारखा एकोणीसशे चौतीस वेळा मार खाऊन पळालेला असणार, त्या व्यापारात नफा, तोटा असलं काही नसणार, आणि तो दरबार कोणाच्या दमदार हाकेबरोबर एकदम बरखास्त होणार. तशाच एका सणसणीत हाकेबरोबर माझा लंपन गायब झालेला आणि समोर काकू उभी! "जेवायला येतोस का म्हणून विचारायला आले, तर तू आणि कुठे तंद्री लावलीस? आणि हे काय अजून लाडू नाहीच संपवलास? चल संपव तो आणि वाटी‌ दे मला". तिला मी एकदम डोळे मोठ्ठे करून, तोंडाकडे चाललेल्या हातात अर्धा खाल्लेला लाडू धरून, शून्यात का काय म्हणतात त्यात बघत, इष्टॉप म्हणल्यावर पुतळा झाल्यासारखा बसलेला दिसत असणार. पण त्या शून्यात बघत असलेला लंपन तिला दिसायला नाही. त्यामुळे हे ही कळायला नाही की तो लाडू घेतलेला हात तोंडाकडे जाता जाता असा अर्ध्यावरच का थांबलेला ते.

मग ते पुस्तक मी सोडायला नाही. खाता, पिता, झोपता तो लंपन आणि मी. पुऩ्हा कंटाळा वगैरे म्हणायचं देखील काम नाही. मी त्या लंपनला सोडायला नाही आणि 'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत' अशा पुस्तकांमधून माझ्या थेट मनात जाऊन बसलेला लंपन मला सोडायला नाही.
--

मी 'वनवास' नक्की कधी वाचलं ते आठवत नाही, पण मी सातवी ते दहावीत असताना कधीतरी वाचलं असावं. लंपनचं भावविश्व अतिशय नेटकेपणाने आणि वाङ्मयीन अचूकतेने या पुस्तकांमधून व्यक्त होतं, आणि मनाला भावतं. कानडी-मराठी‌ मुलुख, तिथली भाषा आणि माणसं आपली होऊन जातात. नंतर त्यांची 'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत' वाचली. मराठीत इतक्या सुंदर ललित कथा फार थोड्या आहेत. या चार पुस्तकांपलिकडे हे लिखाण झालं नाही याचं दु:ख न संपणारं आहे तितकाच या पुस्तकांमधून मिळणारा आनंदही‌ न संपणारा आहे. प्रकाश नारायण संतांना ही‌ माझी‌ नम्र श्रद्धांजली.

Saturday, July 10, 2010

गालातली‌ गुळणी

"काय झालं रे तुला?" - ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या एका मित्रानं विचारलं.
"का? काही नाही" - मी गोंधळून उत्तरलो.
"अरे तुझे केस असे अस्ताव्यस्त का? मला वाटलं काय झालं!".

अशा संवादातून आता केस कापायला झाले आहेत असं कळतं, तसे एखादा सोयीस्कर रविवार पाहून पाय ऩ्हाव्याकडे वळतात.

या रविवारीही‌ सकाळी मी‌ असाच ऩ्हाव्याचा रस्ता धरला. रस्त्यात जाताना काही‌ ओळखीची‌ लोकं भेटली. त्यांना हसून ओळख देऊन पुढे जात होतो, पण त्यांच्या प्रतिक्रिया विचित्र येत होत्या. ते हसताना थोडा खट्याळपणा, कुत्सितपणा जाणवत होता.

सकाळी फिरून येणारे काही ज्येष्ठ नागरीक मला ओलांडून गेले.
"सकाळी सकाळीच! आजकालची तरुण मंडळी‌ काय करतील हे सांगता येत नाही." - ज्ये. ना. १
"पण याला मी कधी असे पाहिलेले आठवत नाही, हे नवीनच दिसते आहे." - ज्ये. ना. २
"मी म्हणतो, होतं असं कधी‌कधी, हल्ली टेंशन्स पण असतात, त्यातनं अशीही सुटका होते. पण इतर अनेक उपाय असताना, अशा शिकल्यासवरल्या चांगली‌ नोकरी‌ करणाऱ्यांनी हे करावं, अरारा!" - ज्ये. ना. ३
"अहो, मी‌ असं ऐकलं आहे, की खूप सवय झाली की फारसा परिणाम होत नाही‌ म्हणे, मग काहीतरी‌ जोरदार लागतं. त्यामुळेच असेल. म्हणजे, पूर्वी घरातल्या घरात चालत असणार. आपल्याला कुठे कळायला ह्या गोष्टी. आता फारच वाढलं तसं बाहेरही!" - ज्ये. ना. १ एक डोळा मारत, इतरांना टाळ्या देत म्हणाले.
"आणि शिकल्यासवरलेल्यांचं आणि चांगल्या नोकरीचं काय म्हणता, त्या बारामतीच्या नेत्यांचं नाही का तसं . . ." - ज्ये. ना. २

ते कोणाबद्दल बोलताहेत हे मला कळेना, मी ते बोलणं कानाआड करेपर्यंत दुसरे गृहस्थ भेटले.
"काय झालं हो?, खूप दुखतं आहे का?".
"हो ना, कालच ऑपरेशन झालं."
"काय ऑपरेशनपर्यंत गेलं, आणि तरीही‌ अजून चालूच. बरोबर आहे या सवयी अशा सुटत नाहीत. पण आता सोडा बरं का!"

मी काही बोलायच्या आत ते गृहस्थ बरेच पुढे गेले होते. काहीतरी‌ चुकत होतं आणि ते मला कळत नव्हतं. मी‌ कपडे वगैरे तपासले, सगळं व्यवस्थित होतं. आणखी‌ काही कुत्सित नजरा झेलत मी ऩ्हाव्याकडे पोहोचलो. "आज गुळणी‌ लावून आला का, साहेब?" मी खुर्चीत बसता बसता ऩ्हाव्यानं कसलाही मुलाहिजा न बाळगता प्रश्न केला. मी उत्तर देणार इतक्यात आरशात पाहून एकदम प्रकाश पडला. आदल्या दिवशी‌ माझी‌ अक्कलदाढ काढली‌ होती, ती ही‌ ऑपरेशन करून. तेव्हा डॉक्टरांनी‌ सांगितलं होतं, "आज आणि उद्या बर्फानं गाल शेक, अगदी दिवसातून ४/५ वेळा. कितीही काळजी घेतली‌ तरी‌ दाढेच्या इथे सूज येते." थोडं मिस्किलपणे गालाशेजारी ओंजळ नेत त्यांनी पुस्ती‌जोडली, "अगदी गाल असा फुगतो." आता त्या मिस्किलपणाचा अर्थ माझ्यापुढे होता. कालपासून न फुगलेला तो गाल आता खालच्या बाजूला फुगला होता, अगदी‌ तंबाखूची‌ गुळणी‌ धरून बसल्यासारखा! त्यात जखमेमुळे जास्त प्रमाणात सुटणाऱ्या लाळेला धरून ठेवण्यासाठी‌ मी‌ ओठही आवळले होते. काल ऑपरेशन करताना ओठाला झालेली जखम मधून मधून उलत होती आणि त्यामुळे ओठांचा भाग लाल होत होता. सगळा गेटअप अगदी‌ जुळून आला होता. मगाशी‌ कानावरून गेलेल्या बोलण्यांचा अर्थ मला आत्ता लागला आणि हसू आले. "अरे, कसली‌ गुळणी, माझ्या दाढेचे ऑपरेशन झाले आहे काल, जरा जपून काम कर तुझं", मी‌ ऩ्हाव्याला सूचना केली. "दाढेचं दुखणं म्हणजे लय बेकार", त्याचा चेष्टेचा स्वर बदलून त्याची जागा सहानुभूतीने घेतली होती, "जाताना रुमाल धरा तिथं म्हणजे गैरसमज नाही होणार".

Saturday, June 26, 2010

पोटोबाचा किस्सा

गावात कामं करत हिंडल्यामुळे पाय आणि पोटातले कावळे एकाच वेळी ओरडू लागले होते (अशावेळी‌ पाय बोलतात, पण त्यांनी पुढची 'पाय'री गाठली होती). खुन्या मुरलीधराच्या बोळातून जाताना 'पोटोबा' दिसलं. घरची आठवण - असा पोटोबावाल्यांचा दावा आहे, माझा नाही. "घरच्या चवीची सर बाहेरच्या खाद्यपदार्थांना कशी‌ येईल?" हे माझे मत माझ्या बायकोच्या आणि आईच्या (किंबहुना बऱ्याच गृहिणींच्या) स्वयंपाकाची स्तुती करणारे असले तरी ह्या सबबीखाली मी त्यांना बाहेर नेणे टाळतो असा त्यांचा समज असल्याने, त्या ह्या स्तुतीला नम्रपणे, "हा, छोट्याशा गोष्टीची‌ पण स्तुती करतो" वगैरे उत्तरे देतात. असो, तर 'घरची आठवण' येणारे थालीपीठ, पिठलं, फोडणीची‌ पोळी वगैरे ज्या उपाहारगृहात (हा शब्द इथे वापरायला चांगला आहे) मिळते ते कसे आहे ते तरी बघू‌ या कुतुहलापोटी‌ मी आणि माझी बायको आत शिरलो.

चकचकीत सजावट (मराठीत याला आता interior असे म्हणतात.), आत A.C. हॉल, सजावटीला साजेसा गणवेष घातलेले नोकर वगैरे पाहून मी थोडा बावरलो. 'कल्याण'च्या चकचकीत A.C. दुकानात भेळ खाताना बावरलो होतो तितका नाही पण बावरलो. भेळ, पाणीपुरी हे पदार्थ म्हणजे हातगाडीवर, किंवा फारतर या पदार्थांचा आद्य घटक असलेल्या चिंचेच्या पाण्याची‌ पुटं चढलेली असावीत असा भिंतींचा रंग असणाऱ्या दुकानात खाता येतात. तसं असल्याशिवाय त्या पदार्थांची चव लागत नाही आणि समाधानही होत नाही. A.C च्या गारव्यात गार चिंचेच्या पाण्याला आंबट चव असते किंवा पाणीपुरीच्या पाण्याला पुदिन्याचा वास आणि खमंगपणा असतो पण त्यानं मिटक्या मारत खाण्याचं सुख मिळत नाही. अशा पंचतारांकित दुकानात जाताना तसेच कपडे घालावे लागतात. त्यामुळे हे पदार्थ खातानाची निम्मी मजा, पाणीपुरी तोंडात टाकता टाकता फुटली (तशी ती‌ नाही फुटली तर मजा काय?) तर त्या पाण्याने कपडे घाण होतील वगैरे पंचतारांकित चिंतां घालवतात. उरलेली, या पदार्थांच्या पंचतारांकित किंमतींमुळे! रस्त्यावर ज्या पैशात तुडुंब भेळ, पाणीपुरी खाऊन पोट आणि जीभ दोऩ्ही तृप्त होतात, त्याच पैशात इथे तोंडाला पाणीदेखील सुटत नाही.

आम्ही 'पोटोबा'त एका टेबलावर बसलो. तिथल्या पदार्थांच्या यादीत फक्त घरचीच नव्हे तर देशोदेशींची आठवण येईल असेही पदार्थ होते. पण तरीही आपण घरचेच पदार्थ मागवायचे असे आम्ही ठरवले. फोडणीची‌ पोळी, भाकरी वगैरे अतिपरिचयात अवज्ञा झालेले पदार्थ मागवण्याचा धीर झाला नाही आणि बाकी मानाचे पदार्थ जेवणाच्या वेळातच मिळतात असे कळले. त्यातल्या त्यात म्हणून आम्ही थालीपीठ मागवले. नोकरांच्या 'अगत्या'वरून, आणि वागण्यावरून चकचकीत गणवेषाच्या आतला मामला चिरपरिचयाचा पुणेरी आहे हे पाहून थोडा धीर आला. थोड्या वेळाने थालीपीठ आले आणि त्याबरोबर तोंडीलावणे म्हणून लोणी आणि चटणी! ते लोणी‌ खाताना मला थोडं पिठूळ लागले म्हणून एका नोकराला विचारलं, "हे काय आहे?". त्या वाक्यातली खोच लक्षात न घेता त्याने मला, "हे लोणी आहे, ते थालीपीठाला लावून खातात." अशी उपयुक्त माहिती दिली.
"ते मला माहित आहे, पण ते पिठूळ आहे, आणि ते गरम थालीपीठावर टाकले तरी वितळत नाहीये" - मी
"साहेब, लोणी‌ असेच असते" - तो. आमच्या घरच्या आठवणींमध्ये लोण्याची आठवण नसावी, असा त्याचा समज झाला असावा.
"हो बरोबरे, आम्ही‌ घरात मऊ, मुलायम, चटकन वितळणारे जे खातो ते लोणी नसावे" - मी‌ शक्य तितक्या थंड आवाजात म्हणालो.
फार काही लक्ष न देता तो निघून गेला. मी ते थालीपीठ चटणीबरोबर खाऊ लागलो.

थोडा वेळ गेला, आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. थालीपीठाची‌ चवही छान होती, त्यामुळे लोण्य़ावरून लक्ष उडाले होते. तेवढ्यात एक मध्यमवयीन गृहस्थ आमच्या शेजारच्या टेबलावर येऊन बसले. माझे त्यांच्याकडे लक्ष जाताच, त्यांनी माझ्याशी बोलायला सुरूवात केली,
"हे (माझ्या समोरच्या थालपीठाकडे बोट दाखवत) आम्ही आमच्याकडे बनवतो, बरं का!" मगाशी तो नोकर मला लोणी‌ म्हणजे काय ते सांगून गेला, आता हा माणूस मला थालपीठ 'घरीही' बनते हे सांगत होता.
"हो का, आमच्याही घरी बनवतात", या वेळी‌ आपण पडते घ्यायचे नाही असे मी‌ही‌ ठरवले.
"माझी बायको स्वत: धान्य दळून भाजणी‌ घरी‌ बनवते", त्यांनी‌ आपलं गाडं‌ पुढे रेटलं.
"माझीही‌ बायको आणि आई घरीच भाजणी बनवतात. आम्हीही‌ थालीपीठ घरीच बनवून खातो, आज इथे केवळ भूक लागली‌ म्हणून शिरलो." - मीही उत्तरलो.
"म्हणजे, आम्ही‌ मसालेही अगदी‌ घरी बनवतो बरं का!", माझा चेहरा पाहून ते आजोबा पुढचं काही बोलले नाहीत.
मला कुठंतरी‌ गणित चुकल्यासारखं वाटलं. ते गप्प झालेले पाहून, मी आणि माझ्या बायकोने उरलेल्या गप्पा सुरू केल्या. एकीकडे आमचे लक्ष त्या गॄहस्थांकडे होतेच. त्या गृहस्थांनी नोकराला बोलावून आपण फक्त चहा आणि साबुदाणा वडा घेणार असल्याचं सांगितलं. एकूण त्यांचा तिथला वावर, नोकरांना हुकुम सोडण्यातली सहजता, आणि पोटोबाविषयीची आपुलकी पाहून आम्हाला ते मालक आहेत की काय असा संशय आला.
"तुम्ही इथले मालक काय?" - मी त्यांना विचारलं. त्यांनी समाधानपूर्वक होकारार्थी‌ मान हलवली. आत्ता मला मगाचच्या त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागला आणि माझ्या उद्धट बोलण्याबद्दल मी त्यांची‌ माफी मागितली. लगे हाथो माझी लोण्याची मागणी मी‌ वरिष्ठांकडे नेली. त्यांनीही लगेच ते लोणी‌ पाहून नोकराला ते बदलून आणायला सांगितले. पुऩ्हा श्रोता मिळाल्याने,त्यांनी पोटोबा आख्यान पुढे सुरू केले. त्यातून मला तिथले स्वयंपाकघर ३००० स्क्वे. फु. आहे, तिथे मोठे exhaust fans आहेत, A.C. हॉल मध्ये दोन A.C. आहेत, सजावटीला किती खर्च आला वगैरे तपशील कळले. एव्हाना लोणी आले, तेही पिठूळच होते. पण आमचे खाणे संपले होते, त्यामुळे त्याकडे लक्ष न देता आम्ही आजोबांना नमस्कार करून बाहेर पडलो.

Saturday, February 20, 2010

पुण्यातील वाहतुकीचे अर्थकारण

पुण्यात दुचाकी वाहनांसाठी रस्त्यारस्त्यांवर वाहने लावण्यासाठी‌ शुल्क आकारले जात आहे. मुळातच पुण्यात सार्वजनिक वाहतुकीची अवस्था दयनीय आहे (BRTने काही फार सुधारणा होईल असे वाटत नाही. त्याबद्दल वेगळे बोलू.). त्यामुळे स्वत:ची वाहने चालवायला लागणे अपरिहार्य आहे, परिणामत: दिवसेंदिवस पुण्यातील वाहने वाढत आहेत, ती लावण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध नाही, ती चालवण्यासाठी‌ रस्ते कमी पडताहेत, आहेत त्या रस्त्यांची अवस्था काय विचारता,  आणि आता वाहने लावण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात तेही २ रुपये प्रति तास या प्रचंड दराने! म्हणजे आई जेऊ घाली‌ ना आणि बाप भीक मागू देई ना त्यातली गत झाली.

या सगळ्या प्रकारात फायदा कोणाचा झाला? वाहने तयार करणाऱ्या, ती‌ विकणाऱ्या कंपन्या, गॅरेजेस् इ. रस्त्यांवर पार्किगचे ठेके घेणारे ठेकेदार यांचा! ह्या धंद्यांमधून कोणाचं उखळ पांढरं होणार ते वेगळं सांगण्याची गरज नाही. एवढं करून ह्या सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत का हा प्रश्न विचारणं मूर्खपणा!

महानगरपालिकेला जो कर आपण देतो त्यात पथकर नामक एक प्रकार बहुतेक (!) असतो. त्याचप्रमाणे वाहने विकत घेताना त्यावर वाहने चालविली जाणार म्हणून एक कर लावतात. हा पैसा घेतल्यावर तत्संबंन्धी सेवा विनामूल्य देणे महानगरपालिकेला कर्तव्य वाटत नाही काय? जर हे कर नागरिक इमाने इतबारे भरत असतील तर महानगरपालिकेचे पार्किंगसाठी विनामूल्य जागा आणि सेवा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे, त्त्यासाठी मूल्य कसे आकारता येईल? ह्या मूल्यावर सेवाकर/आयकर वगैरे भरला जातो का हा वेगळा विषय!

मुळात पुण्य़ातल्या सर्व वाहतूकविषयक प्रश्नांचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सोपं उत्तर असताना मुद्दाम द्राविडी प्राणायाम कशाला? तरी बरं महानगरपालिका दरवर्षी कोट्यावधींनी अनुदानं 'पुणे महानगर परिवहन महामंडळा' ला (नाव बदललं तरी माणूस बदलत नाही.) देते आहे ती‌ नागरिकांकडून गोळा केलेल्या करांमधूनच! त्यात ह्या बसगाड्यांची तिकिटंही महाग आहेत (जवळजवळ १ रुपया प्रति कि.मी.). इतका पैसा या महामंडळाकडे जात असताना सर्वांना सोयीची सेवा हे मंडळ देऊ का शकत नाही?

तोपर्यंत, मी आपल्या गाडीवरून कुठेही गचके न खाता कार्यालयात पोचलो आहे, हे रस्ते सरळ सपाट आहेत, त्यांचा एकच थर आहे, रस्त्याच्या दोऩी बाजू समान पातळीवर आहेत, सर्व सिग्नल्स् व्यवस्थित चालत आहेत किंवा मला बसस्थानकावर गेल्यावर फार वाट न पाहता बस आली आहे, ती स्थानकासमोर सगळे प्रवासी चढे/उतरे पर्यंत थांबली आहे, वाहक सौजन्यापूर्वक बोलत आहे, सुटे पैसे व्यवस्थित वेळेवर परत देत आहे, मला आणि सर्वच प्रवाशांना बसायला जागा मिळाली आहे. बसायची‌ जागा स्वच्छ आहे असे पसायदान गायला काय हरकत आहे!

Sunday, February 07, 2010

रीटा, च्या आणि केळफा

कधी‌ नव्हे ते गेल्या दोन तीन महिन्यांत लागोपाठ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायचा योग आला. हे तीनही‌ मराठी चित्रपट होते हे विशेष! आणि तीनही‌ चित्रपट पाहणं हा सुखद अनुभव होता.

रीटाचा विषय वेगळा होता, त्याबद्दल मतभेद असतील पण  त्याविषयाची हाताळणी फारच प्रसन्न आणि प्रगल्भ वाटली. विशेषत: पल्लवी‌ जोशीचा अभिनय 'एकदम चाबूक', अगदी‌ जागेवर उभे राहून आणि जोरदार टाळ्या वाजवून दाद देण्याइतका. (मी काही‌ खुर्चीवरून उठून पुढे जाऊन इतर काही करू शकत नाही‌ ;) तेव्हा इतकंच!) तिचं‌ सुरूवातीला खिडकीवर उलटं‌ 'रीटा' लिहून आपण वेड्याच्या इस्पितळात असलो तरी‌वेडे नाही‌ हे दाखवण्याच्या प्रसंगातून पुढे किती‌ छान दिग्दर्शनाचा नमुना पहायला मिळणार आहे याची झलक मिळाली. पुढे उत्तरोत्तर कथा फुलत गेली अगदी शेवटच्या प्रसंगापर्यन्त. रेणुका शहाणेचं‌ कौतुक करावं तेवढं थोडंच! वास्तविक असा विषय असताना चित्रपट उत्तान/बीभत्स करणं काही‌ अवघड नव्हतं, ('कभी अलविदा ना कहना' आठवतोय?) पण तरीही तो अतिशय संयतपणे चित्रित झाला आहे. रीटाची असे असामान्य नाते जपण्यासाठी होणारी ओढाताण, तरीही त्यातले पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आणि ते पावित्र्य सिद्ध करण्याचा तिचा अट्टाहास, त्या प्रयत्नात तिचं झालेलं पतन आणि त्या जाणीवेनं स्वत:वरचा आलेला राग आणि मानसिक आघात, याबरोबरीने वेगवेगळ्य़ा पातळ्यांवर घरच्या वातावरणाचा होणारा परिणाम फार सुन्दर चित्रित झाला आहे. चित्रपट पाहिल्यावर जसं मन रितं होतं तसंच चांगली कलाकृती पाहिल्याच्या आनंदाने भरतंही.

सुमित्रा भावे आणि मंडळीच्या साच्यातल्या 'एक कप च्या' हा दुसरा चित्रपट. वास्तुपुरूष, देवराई, वळू वगैरे यादीत फिट्ट बसणारा! तिथे वेगळा संघर्ष. सगळ्या कलाकारांनी‌ काम छान केलं आहे. फक्त एकच कोंकणातल्या मराटीचे हेल नीट जमलेले नाहीत असं वाटलं. एखाद्या सामान्य माणसाला आपल्या तत्त्वांसाठी काय संघर्ष करावा लागतो, आनी‌हे करत असताना त्याला घरातले सगळे कशी साथ आणि सहकार करतात हे पाहून आपल्यालाही उभारी येते. विशेषत: यात 'साता समिंदरापार ब्रह्म्याची सृष्टी' या ओवीचा फारच छान उपयोग केला आहे. हे पूर्ण काव्य कोणाला माहीत असेल तर मला देऊ शकेल का?

तिसरा चित्रपट 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'. दादासाहेब फाळके यांनी‌ काढलेल्या पहिल्या मराठी‌ (आणि भारतीय़) चित्रपटाच्या निर्मितीची कथा. प्रसन्न सादरीकरण, योग्य तंत्रांचा वापर आणि अर्थातच अभिनय यामुळे चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. कथा जितकी मनोरंजक आहे तितकाच चित्रपटही देखणा झाला आहे. कमीतकमी दोन बादल्या अश्रू गाळण्याची‌ ताकद कथेत असूनही तो लोभ टाळला आहे. फाळके यांनी हा चित्रपट करण्य़ासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांचा संघर्ष हसत खेळत दाखवला आहे, पण त्यातलं गांभीर्य तसुभरही कमी न होऊ देता. कदाचित दादासाहेबांच्या स्वभावानुसार ही संट त्यांनीही अशीच हसत खेळत पेलली असतील. ऑस्करचे आव्हान हा चित्रपट पेलू शकेल अशी आशा वाटते, त्यासाठी शुभेच्छा!

एकही‌ गाणं नसणं हे या तिघांचंही आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल.  चित्रपट पाहिल्यावर मला नको नको वाटत असताना गेल्या काही दशकांतल्या बहुसंख्य भयानक चित्रपटांची आठवण झाली. भयानक कपडेपट, भयानक नाच आणि गाणी, भयानक संकलन, भयानक दिग्दर्शन अशा अनेक भयानक गोष्टींनी भरलेले ते भयानक चित्रपट! लक्ष्या, सराफ यांच्या इनोदी चित्रपटांची परंपरा अजूनही भरत आणि मकरंद चालवत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे चित्रपट असणं आल्हाददायक आहे. कसदार कथा आणि तिला साजेसं दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, पार्श्वसंगीत, आणि जोडीला उत्कृष्ट सादरीकरण, संकलन इत्यादी तांत्रिक बाबी ह्या चांगल्या गोष्टींचं महत्त्व पटवण्यासाठी मधला भयानक चित्रपटांचा कालखंड एखाद्या वाईट स्वप्नासारखा आला अशी समजूत करायला हरकत नाही. असेच चांगले चांगले चित्रपत मराठीत निर्माण व्हावेत आणि ते आम्हाला पहायला मिळावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ता.क. हे लिहून झाल्यावर 'नटरंग' पाहिला पण या यादीत तो नको :)

Wednesday, February 03, 2010

साडीपुराण

"अरे, जरा पुढे हो, मला त्या नवरीनं नेसलेली‌ साडी‌ पहायची‌ आहे, पिवळ्या रंगाला जांभळे काठ असलेली", माझी बायको मला पुढे ढकलत होती. एका लग्नात आम्ही‌ अगदी‌ ऐन मुहुर्ताला पोचलो होतो. त्यामुळे कार्यालयाच्या दारातून अनेक जणांच्या खांद्यांवरून लांब व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधुवरांना, टाचा उंचावून पाहण्याचा प्रयत्न चालू‌ होता. पुढे मुंगीलाही‌ शिरायला जागा नव्हती. माणसं‌ दाटीवाटीनं‌ माणसं‌ उभी‌ होती.

"अगं, आपण त्यांना भेटायला जाऊ तेव्हा दिसेल ना तुला.", मी‌ समजुतीच्या स्वरात म्हणालो.
"तुम्हा नवऱ्यांना काही‌ कळत नाही‌ हेच खरं."‌, समस्त नवरे जातीचा उद्धार करून युगानुयुगे चालत आलेल्या संवादाची‌ नांदी‌ झाली. "लग्न लागल्यावर नवरी‌, ती‌ साडी‌ बदलणार नाही‌ का? मग भेटताना ती‌ मी‌ कशी‌ पाहू? आणि काय रे, आपल्या लग्नात मी‌ लग्नानंतर साडी‌ बदलली‌ होती‌, हे पण तुला आठवत नाही?". नेहमीची प्यादी चाल करून यायला लागली. पुढे होणं खरंच शक्य नव्हतं. माझ्या पुढे एका बाजूला काही‌ महिला आणि मुली‌ आपापल्या साड्या/पेहरावाबद्दल चर्चा करण्यात गुंग झाल्या होत्या. त्यांनी‌ नवरीची‌ साडी‌ 'बघून' घेतली‌ असावी‌ किंवा ते प्रयत्न सोडून दिले असावेत. माझी‌ पुढे होण्यासाठी‌ जागा द्यायची‌ विनंती‌ त्यांच्या कानावरून देखील गेली‌ नव्हती. दुसऱ्या बाजूला काही‌ पोक्त बायका इतर महिलांच्या साड्यांबद्दल बोलत (म्हणजे टीका करत) होत्या. त्यांची‌ आपापल्या साड्यांबद्दलची‌ चर्चा संपली असावी किंवा आपापल्या साड्यांवर टीका करणे शक्य नसल्याने, जास्त चविष्ट चर्चेकडे वळल्या असाव्यात. त्यांना विनंती‌ केल्यावर, 'हा कोण टिक्कोजीराव', अशा अर्थाच्या फक्त नजरांनी (काही चष्म्यातून, काही‌ चष्म्यावरून), मला नमवून आपल्या चर्चेत मश्गुल झाल्या. एक-दोन पुरूष जे माझ्या पुढे होते त्यांचं लक्ष बायकांकडे (आपापल्या) होतं. त्यांचं दु:ख माहित असल्यामुळे त्यांना माझ्या विनंतीकडे लक्ष देणी जमणार नाही हे मला कळलं. पुढे करण्यासारखं काही नसल्याने, मी माझ्यावरचा हल्ला परतवत म्हणालो, "पण समजा नाही‌ पाहिलीस साडी तर काही बिघडणार आहे का?". मी काहीतरी चुकीचं बोललो हे हिच्या चेहऱ्यावरून मला कळलं.
"परवा आमची‌ भिशी‌ आहे, तिथे बायकांनी‌ 'पाहिलीस का लग्नातली साडी' असं विचारलं, तर मी‌ काय उत्तर देऊ?", स्वरात जरा आता चीड डोकावू लागली‌ होती.
"सांग ना पाहिली म्हणून. हो म्हणायला काय जातंय तुझं?", मी.
"तेवढंच नसतं रे ते, ", आता चिडीची‌ जागा सहानुभूतीने घेतली. माझं अज्ञान दूर करण्याच्या हेतूने, अर्जुनाला ज्याप्रमाणे भर युद्धात कृष्णाने उपदेश केला, त्याप्रमाणे मला लग्नाच्या भर मांडवात उपदेश करण्यास सुरुवात केली.
"हा प्रश्न म्हणजे तर सुरुवात असते. पुढे त्या साडीचं एक एक अंग घेऊन त्यावर सविस्तर चर्चा होते." मला वाटत होतं, अंग झाकण्यासाठी‌ साडी नेसतात, पण साडीलाही‌ अनेक अंग असतात हे मला नवं होतं. "काठ कसे आहेत, पदर कसा आहे. साडीच्या मुख्य रंगाला ते जुळताहेत का? साडीवर बुट्टे कसे आहेत? नक्षी‌काम कसे आहे? साडीचा पोत कसा आहे?  इथून चर्चा सुरू होऊन, ती साडी नवरीला कशी‌ दिसते हा निष्कर्ष निघेपर्यंत ती‌ चर्चा रंगते. हा निष्कर्ष नकारात्मक असेल तर चर्चा जास्त रंगते. मग माणसाला शोभणाऱ्या साड्या कशा निवडाव्यात इथपासून ते त्या निदान शोभेल अशा कशा नेसाव्यात यावर सविस्तर आणि उदारपणे आपले अनुभव आणि विचार व्यक्त करून मगच चर्चा थांबते. एखादी पोक्त बाई जर असेल तर आमच्यावेळी‌ असं नव्हतं इथून सुरुवात होऊन मग त्यावेळच्या खऱ्या आणि काल्पनिक अनुभवांचा स्वतंत्र पाठ दिला जातो. याशिवाय भिशीतल्या पदार्थांना चव कशी येणार? आता मला सांग मी जर साडीच पाहिली नाही तर या चर्चेत मी‌ काय डोंबल भाग घेणारे. आणि नाही बोलता आलं तर काय तिथे शुंभासारखी‌ गप्प बसून राहू?"

माझ्या ज्ञानात बरीच भर पडली‌ होती. हिची‌ समस्या मला कळली होती पण तरीही मला फार काही‌ करण्यासारखे नसल्याने, मी केविलवाणा हसलो. हे आख्यान बहुतेक त्या पोक्त बायकांच्या कानावर पडले असावे, त्या कौतुकाने माझ्या बायकोकडे पाहत होत्या. शेवटी त्यांनीच थोडी जागा करून आम्हाला पुढे जाऊ दिले. थोड्या प्रयत्नाने ती नवरी‌ आणि तिने नेसलेली‌ साडी‌ दोन्हींचे संपूर्ण दर्शन झाले. हिचा जीव भांड्यात पडला.