Wednesday, November 08, 2006

साहित्याचं गणित

संदर्भ: शैलेशचा 'साहित्य आणि गणित'
हे शीर्षक मी केवळ 'विरोधाभास' अलंकार साधण्यासाठी वापरलं नसून, मला खरंच वाटतं की चांगल्या साहित्यालादेखील विशिष्ट नियम लागू होतात आणि ते गणिताच्या नियमांप्रमाणेच काटेकोर असतात. ह्या माझ्या लेखाचा उद्देश हे ह्या गणिताचे काठिण्य दाखविणे हाच आहे.

साहित्याचा उद्देश (वाङ्मय या अर्थी) आपले विचार (कुठल्यातरी भाषेत) व्यक्त करणं, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हाच आहे असे मानायला कोणाची हरकत नसावी. म्हणजेच, प्रत्येक साहित्यिक कलाकृती काहीतरी विचार व्यक्त करत असते. ती कृती निर्माण करताना, निर्मात्याच्या मनात 'हे, हे आणि असे असे विचार मला यातून व्यक्त करायचे आहेत' असा हेतू असतो. ती कृती पूर्ण होऊन रसिकांपर्यंत पोहोचली, की त्याबरोबर काही विचार रसिकांपर्यंत जाऊन पोहोचतात. हे विचार आणि मूळ निर्मात्याच्या मनातील विचार ह्यात किती तफावत आहे, यावर त्या निर्मात्याचं यश जोखलं जाऊ शकतं. हे वाङ्मयातलं गणित आहे, विचार मांडण्याचं आणि नंतर ते समजावून घेण्याचं.

शैलेशनीच दिलेलं उदाहरण घेऊ. उगवत्या सूर्याचं वर्णन करताना, लेखकाला त्यातून नक्की काय व्यक्त करायचं आहे ह्यावर लेखक, काय उपमा वापरतो, शब्द, शैली कशी वापरतो हे अवलंबून असते. त्याला उत्साह दाखवायचा असेल तर तो, 'सहस्ररश्मी, आपल्या सहस्र सोनेरी अश्वांचा रथ उधळत पूर्वेच्या महाली दाखल झाला' असे काही म्हणेल. त्याला भव्यता आणि शुचिता, आनंद दाखवायचे असतील तर,
'देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे, जाती यती हर्षुनी,
शार्दुलादिक सर्व दुष्ट दडती, गिर्यंतरी जाऊनी',
असे वर्णन करेल. तेच वैताग, चिडचिड दाखवायची असेल तर, 'पहाटेची साखरझोप लुबाडत, आणि सुंदर स्वप्नांचा चक्काचूर करीत, घरातील दारिद्र्य उघडे करायला आलेल्या सावकारासारखा सूर्य घरात दाखल झाला', असे शब्द वापरेल.

हा जो विचार मांडण्याचा प्रयत्न आहे, तो एखादे प्रमेय सोडवण्याइतका किंवा त्याहूनही अवघड आहे. इथेच वाङ्मयातले गणित चालू होते. हे गणित अंकगणितापेक्षा कितीतरी अवघड आहे. अंकगणितात निदान क्रिया (operators) आणि त्यांची करणसाधने (operands) ह्यांची मर्यादित तरी आहेत, पण् वाङ्मयातल्या क्रिया आणि करणसाधने अमर्याद आहेत, म्हणूनच की काय वाङ्मयाचे गणित ढोबळ वाटण्याची शक्यता आहे. पण, हा ढोबळपणा हा या वाङ्मयीन पद्धतीचा दोष नसून, ती वापरण्याऱ्या साहित्यिक आणि रसिकांच्या उणेपणाचा परिणाम आहे. विविध मूर्त, अमूर्त कल्पना, शब्द यांवर समास, संधी यांसारख्या साध्या हत्यारांपासून, ते वृत्त व अलंकारांसारख्या उच्च प्रतीच्या साधनांचा प्रयोग करून सोडवली जाणारी ही गणिते येरागबाळ्याच्या आवक्यातली नव्हेतच!

या बाबतीतले टिळकांचे मत माझे म्हणणे पूर्ण करेल. टिळक ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना म्हणाले, "ज्ञानेश्वरी ही एखाद्या प्रमेयासारखी आहे. एकदा तुम्हाला प्रमेय कळू लागले की पुढच्या पायऱ्या आपोआप उलगडतात. तशी एकदा ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांशी तुम्ही एकरूप झालात की पुढच्या ओव्या तुम्हाला आपोआप सुचू लागतात."

Wednesday, September 20, 2006

वृक्ष् आणि वल्ली

(Duke's nose च्या पायथ्याशी)

वसंत फुलला, श्रावण स्रवला, जग हिरवाई ल्याले
मीच अभागी, पर्णहीन का, नैक पानही फुटले
वेणू वाजला, गोपी रंगल्या, तरी कोरडी, का मी?
येई सख्या रे धावत येई, मजला जवळी घेई.

(पुरंदरच्या पायथ्याशी)
पुरंधराच्या पुढ्यात मंडप, सजला पाचूंचा
कूजन मंजूळ करती पक्षी, घन वाजे चौघडा

ल्याली धरती हिरवा शालू, रानफुलांचा साज
नीलगगन वर नटला माळून, इंद्रधनूचा हार

पुराण पंडित गातो मंगल, अष्टक लग्नाचे
फुले धुक्याची घेऊन आली, शुभ आशिर्वचने

Friday, July 28, 2006

आरती प्रभू - अमूर्ताचा शिलेदार

आरती प्रभू - नावातच सारं आलं. समुद्राच्या वाळूसारख्या चंचल भावना, कल्पना घट्ट धरून त्यांना कवितांचे लगाम घालणार शब्दांचा सारथी. राग (प्रेम या अर्थी), लोभ, मत्सर, विरह, द्वेष, जितक्या म्हणून प्रकारे माणसं एकमेकांशी व्यक्त होऊ शकतात त्या सर्वांचे साग्रसंगीत दर्शन याच्या साहित्यातून दिसते. त्या साहित्याला असलेली कोकणची गूढ 'पार्श्वभूमी' (श्लेष अपेक्षित) त्या भावनांचे रंग अधिक गडद व्हायला मदत करते. क्वचित अनागर वाटणाऱ्या या साहित्यातला गोडवा अनुभवाने आणि परिचयाने वाढत जातो.

मला आवडलेल्या काही कविता मी इथे देत आहे. शक्य होईल तसे त्यांचे रसग्रहण करण्याचा विचार आहे.

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना

(हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.
'मग फुल काय म्हणालं?' एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.
'कोनाला?' 'अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं?'
'तू शांग...'
मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला?' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. - मी-एक नापास आजोबा, पु. ल. देशपांडे)

लव लव करी पातं
रसग्रहणासहित

Wednesday, July 26, 2006

लव लव करी पातं

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले

आरती प्रभूच्या कविता वाचायला लागल्यावर माझंही असंच झालं आहे. या कवितांनी वेड लावलं आहे. मनातल्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या सीमेवरल्या तरल भावनांचं वर्णन केवळ 'प्रभू'च करू जाणे. 'लव लव करी पातं' मधील कातरता अशीच मुग्ध करणारी.

लव लव करी पातं, मन नाही थाऱ्याला
एकटक पाहू कसं लुकलुक ताऱ्याला

कधीकधी संध्याकाळी मन अस्वस्थ होतं. गवताचं पातं जसं स्थिर राहत नाही तसं मनही अशावेळी विचारांचे झोके घेत राहतं. आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपलं काहीही ऐकायचं नाही असा पण करून, आपल्यालाही सळो की पळो करून सोडतं. बेचैनी वाढत राहते. लहान मुल जसं लहानसहान आवाजाने दचकून इकडे तिकडे पाह्तं तसं पानं जरी सळसळली तरीही उगाचच तिकडे पळतं. बरं यातून सुटका? नाही! बरोबरची माणसं देखील वेड लागलं असंच समजतात, त्यांना कुठे माहीत असतं मनात कुठलं वादळ उठलेलं असतं ते.

चव चव गेली सारी जोर नाही वाऱयाला
सुटं सुटं झालं मन धरू कसं पाऱ्याला

कुणी कुणी नाही आलं फड फड राव्याची
ऋणु झुणु हवा काही गाय उभी दाव्याची

तट तट करी चोळी तुट तुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची

मनाला हातात न येणारा पारा, कुणाची चाहूल लागली की दाव्याला झटका देऊन उभी राहणारी गाय यांच्या उपमा, पडलेल्या वाऱ्यातून दिसणारी बेचैनी, उधळलेल्या मनाला लगाम घालणारी साठीच्या पारुबाईची परिपक्वता या मात्रांच्या तालावर मनाच्या वेळूंतून घुमणारी ही शीळ, मनात पुन्हा वादळ उठायला पुरेशी ठरते.

Friday, June 09, 2006

पुस्तक परिचय

नंदनने सुरू केलेल्या पुस्तक परिचयाच्या (book tagging) खेळात माझा डाव
१. शेवटचे वाचलेले मराठी पुस्तक -
डबल लाईफ: मूळ (अलेक पदमसी) अनुवाद आशा कर्दळे (चुभूद्याघ्या)

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
अलेक पदमसी (आठवा लिरिलची धबधब्यात आंघोळ करणारी मुलगी, captain cook, कामसूत्र इ. आणि तुघलक, राष्ट्रकुल स्पर्धेतील उद्घाटन सोहळा), च्या आत्मचरित्राचा हा अनुवाद. एखादा माणूस किती सर्जनशील असू शकतो ह्याचे उदाहरण!

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -

खरं सांगायचं, तर इतकं वाचून झालं आहे, आणि त्यातलं इतकं आवडलं आहे, की ते इथे लगेच आठवणं आणि आठवलं तरी लिहिणं शक्य नाही. तरीही ...

सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर ( टारफुला - शंकर पाटील, सत्तांतर माकडांची गोष्ट आहे, टारफुला माणसांची)
वनवास - प्रकाश नारायण संत (पंखा, संगीत शारदा, याच मालिकेतलं आणखी एक)
कोंडुरा - चिं. त्र्य. खानोलकर
वंगचित्रे - पु. ल. देशपांडे
मृण्मयी - इंदिरा संत (कविता संग्रह)

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

बरीच!

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -

व्यंकटेश माडगुळकरांचं निसर्गप्रेम जाहीर आहे. नागझिरा सारख्या पुस्तकांतून त्यांनी जंगलातल्या सुरस चमत्कारिक गोष्टी सांगितल्या आहेत. पण 'सत्तांतर'मध्ये त्यांनी माकडांच्या जीवनावर फार वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. विशेषतः माणसाचा पूर्वज (so called) म्हणून या गोष्टीला महत्त्व आहे.

इतर बऱ्याच प्राण्याप्रमाणे वानरेही कळपाने राहतात. या कळपात बहुतेक एक नर आणि इतर माद्या व त्यांची पिल्ले यांचा समावेश होतो. हा नर या कळपाचे पूर्ण स्वामित्व उपभोगतो. इतर नरांना या कळपात प्रवेश नसतो. पण या नरांची कळपाचे स्वामित्व मिळवायची धडपड कायम चालू असते. ही धडपड, त्यातील क्रौर्य, डावपेच, 'बळी तो कान पिळी' ची सत्यता, मावळत्याकडे पाठ फिरवण्याचा अप्पलपोटेपणा यांचे थरकाप उडवणारे चित्रण माडगुळकर करतात.

ही कादंबरी वाचल्यावर, काही दिवसांतच 'टारफुला' हातात पडली. माणसांतही आपल्या पूर्वजाचे हे गुण वारसाहक्काने आले आहेत, हे त्यातून कळले. एका छोट्या गावातील सत्तेचा खेळ ह्या कादंबरीत रंगवला आहे. माकडे निदान नैसर्गिक प्रवृत्तीच्या प्रभावाखाली हा सत्तेचा खेळ खेळतात, पण माणसाला दिलेली बुद्धी इथे उलट काम करते. क्रौर्याच्या जोडीला कपटही आल्याने, हा सत्तेचा खेळ अधिक जीवघेणा आणि अनैसर्गिक होतो.

दोन्ही कादंबऱ्या लेखकांच्या प्रवाही आणि प्रभावी कथनाने वाचनीय झाल्या आहेत.

Thursday, June 08, 2006

जा जा रे कगवा!

सकाळी गच्चीत फिरत असताना, एक कावळा माझा कान चाटून गेला. आणि समोरच्या झाडावर बसून त्याच्या मित्र आणि मैत्रिणीच्या नावे हाकट्या करू लागला. त्याला कुठल्या शब्दांत सांगावे म्हणजे तो निघून जाईल याचा विचार करताना काही चीजा मला आठवल्या.
जसराजांची बिलासखानी तोडीतली

जा जा रे जा, कगवा
इतनो संदेसो मेरो दैयो जा!
जो मोरे प्रीतम, घर आए
नैना बिछाऊ मगवा!

(हो आता नुसती पहिली ओळ देऊन चालणार नाही, कारण सगळ्यांची सुरुवात सारखीच आहे.)

दुसरी परवीन सुलतानाची पहाडीतली ठुमरी
जा जा रे कगवा,
मोरा रे संदेसवा, पिया पास ले जा!
दिन बिते मोरा तरपत, तरपत
रतिया कटे मोरा गिन गिन तारे, हाये राम

तिसरी देवता भैरव मधली जितेंद्र अभिषेकींची
जा रे कगवा,
पिया के देस
पतिया मोरी देजो

तसेच मारु बिहाग मधील (धन्यवाद मिलिंद)

जा रे जा कगवा
इतनो मोरा संदेसवा लिये जा
तुमरे कारण जुगसी बीतत
मेरी रतिया...
मै पतिया लिख भेजी.

पुष्कर लेलेंनी ही चीज उत्कृष्ट म्हटली आहे.

प्रेमपत्र, प्रेमसंदेश वगैरे नाजूक गोष्टी पोचवणं ही कबूतर, राजहंस वगैरे रुबाबदार जमातींनी करायची कामं आहेत अशी माझी आतापर्यंत समजूत होती, ती साफ खोटी ठरली. कदाचित कावळ्यासारख्या अरूप पक्षाकडून केवळ खरा प्रियकर (किंवा प्रेयसी)च संदेश स्वीकारू शकते, अशी पाठवणाऱ्याची समजूत असावी. ह्या चीजा एकवेळ ठीक, पण ज्ञानेश्वर त्या पुढची पायरी गाठतात,

पैल तो गे काऊ कोकताहे
शकून गे माये सांगताहे

कर्कश कोकणारा काऊ काही शकून सांगत असेल असे वाटणे म्हणजे कुत्रा भुंकताना रागदारी गातोय असं म्हणण्यासारखं आहे. हे कमी की काय म्हणून, हा कावळा उडून जावा म्हणून बरीच आमिषेही ते पुढे करतात

उड उड रे काऊ, तुझे सोनियाने मढवीन पाऊ
दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी

मला माहित नव्हतं की हा सुराशी फटकून ओरडणारा हा पक्षी, गाणाऱ्यांना इतका प्रिय असेल! मी विचार करतोय यातली कुठली 'मात्रा' माझ्यासमोरच्या कावळ्याला लागू पडेल ते!

Thursday, April 13, 2006

भय इथले संपत नाही.

परवा कौस्तुभने मला 'भय इथले' (महाश्वेता चे शीर्षकगीत) ऐकायला दिले. मी तसे ते पूर्वी बऱ्याच वेळा हे गाणे ऐकले होते, पण पुन्हा ऐकल्यावर नकळतच त्या गाण्यात पूर्ण बुडून गेलो.

संध्याकाळची वेळ. सूर्यास्त होतोय. भगव्या संधीप्रकाशात क्षितिजापर्यंतची जमीन न्हायली आहे. त्याचवेळी चंद्राचं प्रतिबिंब वाहत्या झऱ्यांत पडलं आहे. झाडाखाली बसलेला मी, मला स्वतःलाच विसरतो. ते वातावरण आणि मी यांच्यातील नात्याची मला नव्याने ओळख होते. मी त्या झाडाशी तन्मय होऊन ती स्थिती अनुभवू लागतो.

याच वेळी अनाकलनीय हूरहूर मनाचा ताबा घेते. कोणाची तरी आठवण यायला लागते. विरहार्त मन कासावीस होतं. पण ही हूरहूर, हे कासावीस होणं हवहवसं असतं, पण तरीही त्रासदायक. त्या सुगंधी आठवणींनी मन भरून जातं, आणि उरते प्रचंड असहायता. ग्रेससारखा कवी या अवस्थेला शब्दांत बांधतो -

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवीली गीते

हे झरे चंद्र सजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
- ग्रेस

यक्षाने मेघासमोर आळवलेले मेघदूत हे ही असेच स्तोत्र नाही काय?

मी या गीताचा अर्थ लावायचा बराच काळ प्रयत्न करत होतो. यातल्या रूपकांचे अर्थ काही केल्या सापडत नव्हते. किंवा जे लागलेसे वाटत होते, ते सर्वत्र लागू होत नव्हते. पहिलं कडवं नीट वाचल्यावर मला कळलं, हया कवितेत गूढ काहीच नाही, हे साधे शब्दचित्र आहे. अगदी 'औदुम्बर' इतके साधे, पण तरीही नितांत सुंदर. बाकी कडवी ही, या शब्दचित्राने प्रभावित झालेली भावचित्रे आहेत. सीता दोनदा वनवासात गेली, त्यापैकी दुसऱ्या वनवासाचा उल्लेख दुसऱ्या कडव्यात आहे. यावेळी तिच्यासोबत रामाच्या आठवणीच होत्या. या आठवणींचे रूपक म्हणून शेल्याचा वापर केला आहे. तिची या आठवणींनी जी अवस्था केली असेल तशीच अवस्था कवीला इथे अभिप्रेत असावी.

अशा कित्येक अस्वस्थ संध्याकाळी मी या गीताच्या साथीने साजऱ्या केल्या आहेत, तरीही,
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
हेच खरे!


पूर्ण कविता मला इथे मिळली

Friday, March 24, 2006

इंद्रधनुष्या, ये ना संगे खेळायला.

हे गाणं मी लहानपणापासून म्हणत, ऐकत आलो आहे. इतकी वर्षं, इतक्या वेळा हे इंद्रधनुष्य पाहूनही, अजून ह्या सप्तरंगी स्वर्गीय दागिन्याविषयीचे माझे आकर्षण किंचितही कमी झालेले नाही.

मी आणि माझा एक मित्र राजगडावरून परतत होतो. जवळजवळ दोनचार मैल चाललो असू. पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. कुठेच S.T. ची चाहूल लागत नव्हती. तेव्हढ्यात, एक गाडी येताना दिसली. हात केला आणि ती थांबली. आमची निदान हमरस्त्यापर्यंत जायची सोय झाली. माझी नजर बुलंद राजगडावरून हलत नव्हती. तो आता दूर जाऊ लागला. तेवढ्यात, मित्राने माझं लक्ष समोर वेधलं. समोर संपूर्ण इंद्रधनुष्य माझ्याकडे पाहून हसत होतं. त्याची दोन्ही टोकं आम्हाला दिसत होती. आश्चर्य म्हणजे, आमची गाडी जसजसी त्या इंद्रधनुष्याजवळ जात होती, तसतसे ते एका टोकाकडून नाहीसे होऊ लागले. मी गोंधळून गेलो. बराच वेळ ह्या घटनेचा अर्थच लागत नव्हता. एकदम अंधारात वीज चमकावी तसा, डोक्यात प्रकाश पडला. हुर्यो! आम्ही इन्द्रधनुष्याखालून चाललो होतो. जसजसी गाडी पुढे जात होती तसतसे आम्ही इन्द्रधनुष्याचे प्रतल कापत चाललो होतो. त्यामुळे इन्द्रधनुष्याचा काही भाग, जो आत्तापर्यंत आमच्या आणि सूर्याच्या समोर होता, तो आता मध्ये येऊन नाहीसा होत होता. पुढे जाणाऱ्या गाडीबरोबर माझी नजर अदृश्य होणाऱ्या टोकाचा वेध घेत होती. आम्हाला निरोप द्यायला खुद्द निसर्गाने उभारलेली भव्य कमान आम्ही कसे नाकारणार?

मी खूप काळ इंद्रवज्राबद्दल ऐकून होतो. इंद्रवज्र म्हणजे सम्पूर्ण वर्तूळाकृती इंद्रधनुष्य! असे म्हणतात की, हरिश्चंद्रगडावर हे दृष्य दिसते. ह्यावर कडी म्हणजे जर आपण पुरेशा उंचीवर असू, तर ह्या इंद्रवज्रामध्ये पाहणाऱ्याची सावली दिसते. अर्थातच हे दृष्य डोळ्यांनी पहायची माझी फार इच्छा होती. ती मुम्बईहून कोइंम्बतूरला विमानाने जात असताना फलद्रूप झाली. विमानाखाली शूभ्र ढगांनी यक्षनगरी उभी केली होती. सूर्यानं आमच्या विमानाची या यक्षनगरीत पाडलेली सावली मी पाहत असताना, अचानक ह्या सावलीला सात रंगांनी वलयांकित केले. यापुढे काय बोलू?
मी अजूनही इंद्रवज्रात माझी सावली बघायला आतूर आहे!