Sunday, June 25, 2023

दगडातील देव

बहुतेक कलांचा हेतू हा विशिष्ट माध्यमातून सौदर्याची ते सौंदर्य जास्त खुलेले अशी प्रतिकृती तयार करणे, त्या सौंदर्याचे शोधन करणे हा असतो. चित्रकलेत रंग आणि रेषांच्या माध्यमातून फुलं, पानं, दृष्य, व्यक्ती यांची प्रतिकृती निर्माण करता येते.काव्यात शब्द आणि छंदांच्या माध्यमातून जीवाचे आणि जीवनाचे सौंदर्य अभ्यासतात, त्याची प्रतिकृती करतात.  संगीतात ध्वनीच्या माध्यमातून निसर्गातील पशु, पक्षी, निर्झर इत्यादींच्या संगीताचे शोधन होते. त्याच्या जोडीने नृत्यनाट्यादि कलांतून अनेक माध्यमे एकत्र येऊन काळाच्या आयामाला स्पर्श करतात, तेथील गूढ सौंदर्याचा परिचय करून देतात. ईश्वराची प्रतिकृती म्हणून निर्माण झालेला मानव ईश्वराच्या कृतींची नक्कल करायला कलेचे माध्यम वापरतो.

छायाचित्रण ही त्या मानाने अलिकडच्या काळातील परंतु थोडी वेगळी‌ कला म्हणता येईल. तिच्यात स्वनिर्मिती म्हटली तर आहे म्हटली तर नाही. जे आहे तेच परंतु ते वेगळ्या दृष्टिकोनांतून पकडून त्यातील सौंदर्य वेगवेगळ्या तऱ्हेने खुलविणारी ही कला आहे. Beauty is in the eye of beholder हे या कलेला अक्षरश: लागू पडते. चित्रकलेचे सर्व विषय या कलेचेही विषय ठरतात अगदी दगडधोंडे देखील. चित्रकाराला योग्य दृष्टिकोन पकडायचे काम असते प्रतिकृती यंत्र करते.

परंतु हा दृष्टिकोन किती व्यापक असू शकतो हे श्रीकाकांच्या कामातून कळावे. व्यापक हा शब्द खरंतर इथे त्याच्या रुढार्थाने वापरता येणार नाही. कारण त्यांचा दृष्टिकोन हा सूक्ष्माकडे नेणारा आहे, स्थूलाकडे नाही. मुळात दगडासारख्या रूक्ष विषयात सौंदर्याची रसनिष्पत्ती होऊ शकते हे कळायला फार वेगळा रसिकतेचा झरा हृदयात हवा. पाषाणालाही (रसनिष्पत्तीचा) पाझर फोडणे हे शब्दश: श्रीकाका करतात. दगड कापला की त्यात निसर्गाने लपवलेले अफलातून चित्र दुग्गोचर होते, तेही‌ बऱ्याचदा अमूर्त! अमूर्त (abstract) चित्र हा तसा अर्वाचीन प्रकार. त्यात नैसर्गिक विषय कमी आणि मानवी कल्पकता जास्त! परंतु त्यातही निसर्गाने मानवावर मात केली आहे. Agates ची अशी अनेक छायाचित्रे आंतरजालावर मिळतील. खालील चित्र wikipedia वरून घेतले आहे.


श्रीकाका सूक्ष्मदर्शकाचा वापर करून या चित्रांच्याही पलिकडील चित्रे पकडतात. त्यांची ही‌ चित्रे https://shrinivasgadre.com/ या संकेतस्थळावर पहायला मिळतील. ती जरूर पहा.

सौंदर्य निर्माण कसे होते याचे माझ्यापुरते उत्तर लय आणि तालातून असे आहे. ध्वनीला लय आणि तालाच्या सूत्रात गुंफवले की संगीत निर्माण होते. लय आणि तालाच्या अक्षांवर रंगरेषांचे रोपण केले की‌ चित्र निर्माण होते. सृष्टी अशाच अनेक लयबद्ध आणि तालबद्ध, स्थूल आणि सूक्ष्म क्रियांचे "बोलते अर्णव" आहे. प्रचंड हा शब्द कमी पडावा अशा आकाशगंगाच्या युगानुयुगे चालणाऱ्या पुनरावर्ती हालचालींपासून सूक्ष्मतेचा कळस असलेल्या अणूच्या आतील क्षणभंगूर पुनरावर्ती क्रियांपर्यंत सृष्टी अथक कार्यरत असते. या क्रियाच तिला सुंदर बनवतात. मधुराधिपतेरखिलं मधुरं असे त्या मंथनातील अमृत.

 पृथ्वीच्या अंतरंगात लाखो वर्षे चालणाऱ्या लयबद्ध क्रियांमधून घडलेल्या दगडांमध्ये हे सौंदर्य नसते तरच आश्चर्य! या क्रियांची स्मृती दगडात अशी चित्रबद्ध होते. अशा प्रकारे दगडातील देव दाखवणारे श्रीकाका विरळाच!