Sunday, September 29, 2013

चारचाकी चालवणं

मी‌ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातलं. पहिल्याच दिवशी शिकवणाऱ्यानं विचारलं, "कुठली गाडी चालविता येते?". "लुना", मी उत्तरलो. कुठून येतात असा चेहरा करून तो म्हणाला, "म्हणजे, कुठली गिअरवाली गाडी चालवता येते?". "कायनेटिक", कुठलीच नाही असं म्हणून पूर्ण इज्जत जाण्यापेक्षा हे बरं होतं. "जरा पाहून घेत जा रे", आतल्या माणसाला उद्देशून म्हणलेलं हे वाक्य मी कानावर घेतलंच नाही. माझाही नाईलाज होता, मला लुना ते चारचाकी ही उडी‌ घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं, म्हणून अक्षरश: उडी मारून मी‌ स्टिअरिंग व्हीलचा ताबा घेतला. हा माणूस मला इथूनच हाकलून देतो का काय अशी‌ भीतीही‌ असं 'पाऊल उचलण्या'मागे होती. "गिअर, क्लच म्हणजे काय हे माहित आहे का? या बाहेर. मी‌ थोडं चालवून दाखवतो, मग तुम्हाला शिकवतो". पुढचा काही काळ गाडीचे वेगवेगळे भाग कुठे कुठे असतात आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे जाणण्यात गेला. मग बॉनेट नावाची अलिबाबाची‌ गुहा उघडण्यात आली. एकूण पहिला दिवस शाळेत जातो तसा नुसतेच नव्या पुस्तकांचे वास घेण्यात गेला. खरी मजा दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली.

शाळेतल्या पुस्तकांमधले पहिले धडे सोपे असतात. पण इथल्या पहिल्या धड्याने अगदी 'बसल्या जागी' घाम काढला. पहिला गिअर टाकून गाडी ‌सुरू करणे हा प्रकार वाटला होता तितका सोपा नव्हता. हळूहळू‌ क्लच सोडत ऍक्सिलरेटर दाबून गाडी‌ पुढे नेणे ही एवढीशी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात महाभयंकर होती. कधी क्लच लवकर सोडला गेल्याने गाडी, असहकार पुकारत असे, तर कधी क्लच आणि ऍक्सिलरेटरचे एकमेकांशी न पटल्याने निषेधाचे आवाज काढत असे. हा निषेध ती कधी‌ उसळी‌ मारून तर कधी बंद चा नारा देऊन व्यक्त करत असे. क्लच कधी सोडायचा हे कळण्यासाठी तो सोडताना बाजूच्या आरशात गाडीची‌ थरथर कधी जाणवते वगैरे गोष्टीही आजमावून पाहिल्या. पण या बाजूच्या आरशात पाहताना मागच्या रस्त्यावरून जाणाऱ्या इतरच आकर्षक गोष्टींकडे लक्ष जात असल्याने तोही प्रयत्न फसला. शेवटी क्लच आणि ऍक्सिलरेटरमध्ये तह झाला असावा, माझी‌ गाडी वाहती‌ झाली. आमच्या शिक्षकाने या तहात मध्यस्थी केल्याचे नंतर माझ्या लक्षात आले. हा पहिला गिअर टाकल्यावर पुढचे गिअर त्यामानाने विनासायास पडले. दुसरा ते तिसरा आणि तिसरा ते दुसरा हा आडमार्गपण सवयीचा बनला.

गाडी चालवण्यापुरते आपल्याला आणखी‌ दोन हात आणि डोक्यामागे दोन डोळे मिळावेत असे वाटू लागते. रस्त्यावर वाहने, माणसं चारही बाजूंनी‌ हालचाल करत असतात. विशेषत: गाडी‌ शिकताना तर रस्त्यावरची सगळी‌ चर सृष्टी आपल्या गाडीवर चहूबाजूंनी धडकायलाच टपलेली आहे असंच वाटत असतं. डावी-उजवीकडून वळणारी गाडी, दहा फुट पलिकडे रस्त्याच्या दुभाजकावरून रस्त्यावर उतरणारा पादचारी, आपल्या डाव्या बाजूला गाडीपासून दोनचार फुट पलिकडे कठड्यावरून रस्त्यावर पाय सोडून बागेत बसल्यासारखा बसलेला माणूस या तशा निरुपद्रवी गोष्टी! पण गाडी‌ शिकताना यातली‌ कुठलीही गोष्ट heart attack ला कारणीभूत होऊ शकते. आपल्या गाडीला रस्त्यारचा एखादा खड्डा, रस्त्यावरून जाणारी दुसरी गाडी किंवा त्या गाडीतील वा गाडीवरचं माणूस, रस्त्यावरची झाडं, भिंती किंवा इतर वस्तू यांबद्दल कधी‌ प्रेम उत्पन्न होईल आणि त्यांना जबरदस्त मिठी मारावी किंवा गेला बाजार निसटतं चुंबन घ्यावं असं वाटेल त्याचा काय भरवसा.

गाडीची ही प्रेमाची आंदोलने, तिच्या स्वभावातील हिंदोळे हळूहळू परिचयाचे होऊ लागले. चाकाच्या मागे बसून बॉनेटच्या पलिकडची अंतरे, आरशातून लांब दिसणाऱ्या जवळच्या वस्तू, डावीकडची रुंदी यांचा अंदाज येऊ लागला. तशी गाडी चालवण्यातली रंगत वाढू लागली. गाडीचंही लोणच्यासारखंच आहे. लोणचं नुकतंच घातलं असेल तर त्यातल्या तिखट, आंबट, तेलकट चवी एखाद्याला जगातून उठवतात पण जसं ते मुरतं तशा याच चवी जेवणाची लज्जत वाढवतात. गाडीचे आचके, गचके नवख्याला आयुष्यातून उठवतील पण जशी त्यांच्याशी ओळख होते तसा रस्ता कधी सरतो ते कळत नाही.

अंधारातून प्रकाशाकडे?

आजच्या सप्तरंगमध्ये (२९ सप्टेंबर २०१३) उत्तम कांबळे यांचा "स्मशानातून स्मशानाकडे" ( हा लेख वाचला. त्या लेखात एका मसणजोग्याची (म्हणजे कोण ते लेखात छान दिलं आहे) वाटचाल, मसणजोगी ते सरकारी नोकरदार ते पुऩ्हा मसणजोगी अशी कशी होते ह्याचे वर्णन केले आहे. मॅट्रिक होऊन कालव्यावर राखणदार म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेल्या ह्या मसणजोग्याची पहिली बायको त्याच्याबरोबर एका ठिकाणी नांदायला तयार होत नाही. एका ठिकाणी राहून, रोजच्या एकसुरी जगण्यापेक्षा तिच्या जातीतल्या इतर बायकांप्रमाणे भीक मागून, इतर फुटकळ वस्तू विकून फिरतीचं जगणं तिला जास्त मानवतं. त्यामुळे ती ह्याच्याबरोबर नांदायला तयार न होता भांडून माहेरी निघून जाते. हे असह्य होऊन तो पुऩ्हा लग्न करतो, पण तिचीही तीच तऱ्हा. शेवटी नोकरी तशीच टाकून तो पुऩ्हा मसणजोगी होतो. लेखक या लेखाच्या शेवटी, "जर ह्या बायकांना योग्य बुद्धी झाली असती, तर अंधाराकडून प्रकाशाकडे गेल्या असत्या" अशा अर्थाचं भाष्य करतो. पूर्वीही अशाच प्रकारची एक कथा वाचलेली आठवली. आता लेखक वगैरे इतर संदर्भ आठवत नाहीत. एका गडावरच्या गुराख्याच्या मुलीचं तिच्याच जातीतल्या पण मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाशी लग्न होतं. पण तिथलं बंदिस्त जगणं असह्य होऊन ती मुलगी माहेरी परत जाते आणि बरोबर नवऱ्यालाही परत नेते. शेवट तसाच आणि शेवटचं भाष्यही तसंच. अशा कथा किंवा असे संवाद वाचले किंवा ऐकले की प्रश्न पडतो, यातला "अंधार" कुठला आणि "प्रकाश" कुठला? मी किंवा माझ्याप्रकारची अनेक माणसं ज्या प्रकारचं जगणं जगत आहेत त्याला प्रकाश आणि ह्या जगण्याशी दूरान्वयेही साम्य नसलेलं जगणं म्हणजे अंधार? या गोष्टी फक्त भाष्य करण्यापुरत्या राहिल्या असत्या तर ठीक पण पुढे अंधारातल्यांना प्रकाशात ओढून घेण्याचे प्रयत्न सुरु होतात.

अंधारातलं म्हणून म्हटलं जाणारं जगणं "अंधारातलं" का म्हणावं? तिथे कुपोषण, रोगराई, अशिक्षितपणा, अपमानास्पद वागणूक वगैरे गोष्टी आहेत म्हणून? पण मग ज्याला प्रकाशातलं जगणं म्हणावं ते तरी काय वेगळं आहे? तिथे कुपोषण असलं तर इथे मुबलक अन्न नसून ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने न घेतल्याने येणारे रोग आहेत; तिथे चाळिशीतच संपून जाणारं आयुष्य असेल तर इथे चाळिशीतच असह्य होणारं आयुष्य आहे; तिथे चार भिंतीतलं शिक्षण नाही तर इथे चार भिंतींपलिकडच्या शिक्षणाची कमतरता आहे. शेवटी माणूस म्हणल्यावर त्यात काही उणं काही अधिक असणारच. षड्रिपुंमुळे निर्माण होणारी दु:ख माणूस आहे तिथे सगळीकडे आहेतच. जोपर्यंत ते जगणं आनंदात, समाधानात जगता येतं आहे, किंवा जिथे आनंदात, समाधानात जगता येत नाही तिथे तो आनंद, समाधान मिळवण्याचे मार्ग खुले आहेत किंवा त्यांचा शोध घ्यायला बंदी नाही, तोपर्यंत ते जगणं कुठल्याही पद्धतीचं का असेना पण ज्याचं त्याला रुचणारं आहे. अशा जगण्याला "अंधार" किंवा "प्रकाश" अशी लेबलं का लावावीत? याचा अर्थ एखाद्याला त्याची जगण्याची पद्धती बदलायला मज्जाव आहे असं नव्हे. तशी इच्छा झाल्यास जरूर बदल करावा, तसं‌ करूनच ज्याचं त्याचं भलं ज्याला त्याला ठरवता येईल.

मला एकदा हरिश्चंद्रगड चढताना, एक म्हातारा भेटला. हातात लाकडाच्या मोळ्या, मूळ पांढरा रंग शोधून मिळणार नाही असे मातीनी तांबडे झालेले कपडे, तोंडातले दात किडलेले किंवा पडलेले, चेहऱ्यावर, हातापायावर जन्मभर मोजून पुरे पडाव्यात इतक्या सुरकुत्या, बरोबर तशीच बायको. बोलताना मी विचारलं, "गडावर कशाला गेला होता?". तो हसत म्हणाला, "गडावरची मजा बघायला". पावसाचे दिवस होते. आम्हीही तशीच मजा पहायला पुण्याहून कित्येक तासांचा प्रवास करून आलो होतो. ते उत्तर देताना त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला त्याचा हेवा वाटला, माझं "प्रकाशाचं" जगणं सोडून त्या म्हाताऱ्याच्या "अंधाऱ्या" जगण्यात प्रवेश करावा असा मोह क्षणभर मला झाला. मी तसं केलं असतं तर आणखी एका लेखकाला "प्रकाशाकडून अंधाराकडे" असा लेख लिहिता आला असता.