पुण्यात दुचाकी वाहनांसाठी रस्त्यारस्त्यांवर वाहने लावण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. मुळातच पुण्यात सार्वजनिक वाहतुकीची अवस्था दयनीय आहे (BRTने काही फार सुधारणा होईल असे वाटत नाही. त्याबद्दल वेगळे बोलू.). त्यामुळे स्वत:ची वाहने चालवायला लागणे अपरिहार्य आहे, परिणामत: दिवसेंदिवस पुण्यातील वाहने वाढत आहेत, ती लावण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध नाही, ती चालवण्यासाठी रस्ते कमी पडताहेत, आहेत त्या रस्त्यांची अवस्था काय विचारता, आणि आता वाहने लावण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात तेही २ रुपये प्रति तास या प्रचंड दराने! म्हणजे आई जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देई ना त्यातली गत झाली.
या सगळ्या प्रकारात फायदा कोणाचा झाला? वाहने तयार करणाऱ्या, ती विकणाऱ्या कंपन्या, गॅरेजेस् इ. रस्त्यांवर पार्किगचे ठेके घेणारे ठेकेदार यांचा! ह्या धंद्यांमधून कोणाचं उखळ पांढरं होणार ते वेगळं सांगण्याची गरज नाही. एवढं करून ह्या सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत का हा प्रश्न विचारणं मूर्खपणा!
महानगरपालिकेला जो कर आपण देतो त्यात पथकर नामक एक प्रकार बहुतेक (!) असतो. त्याचप्रमाणे वाहने विकत घेताना त्यावर वाहने चालविली जाणार म्हणून एक कर लावतात. हा पैसा घेतल्यावर तत्संबंन्धी सेवा विनामूल्य देणे महानगरपालिकेला कर्तव्य वाटत नाही काय? जर हे कर नागरिक इमाने इतबारे भरत असतील तर महानगरपालिकेचे पार्किंगसाठी विनामूल्य जागा आणि सेवा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे, त्त्यासाठी मूल्य कसे आकारता येईल? ह्या मूल्यावर सेवाकर/आयकर वगैरे भरला जातो का हा वेगळा विषय!
मुळात पुण्य़ातल्या सर्व वाहतूकविषयक प्रश्नांचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सोपं उत्तर असताना मुद्दाम द्राविडी प्राणायाम कशाला? तरी बरं महानगरपालिका दरवर्षी कोट्यावधींनी अनुदानं 'पुणे महानगर परिवहन महामंडळा' ला (नाव बदललं तरी माणूस बदलत नाही.) देते आहे ती नागरिकांकडून गोळा केलेल्या करांमधूनच! त्यात ह्या बसगाड्यांची तिकिटंही महाग आहेत (जवळजवळ १ रुपया प्रति कि.मी.). इतका पैसा या महामंडळाकडे जात असताना सर्वांना सोयीची सेवा हे मंडळ देऊ का शकत नाही?
तोपर्यंत, मी आपल्या गाडीवरून कुठेही गचके न खाता कार्यालयात पोचलो आहे, हे रस्ते सरळ सपाट आहेत, त्यांचा एकच थर आहे, रस्त्याच्या दोऩी बाजू समान पातळीवर आहेत, सर्व सिग्नल्स् व्यवस्थित चालत आहेत किंवा मला बसस्थानकावर गेल्यावर फार वाट न पाहता बस आली आहे, ती स्थानकासमोर सगळे प्रवासी चढे/उतरे पर्यंत थांबली आहे, वाहक सौजन्यापूर्वक बोलत आहे, सुटे पैसे व्यवस्थित वेळेवर परत देत आहे, मला आणि सर्वच प्रवाशांना बसायला जागा मिळाली आहे. बसायची जागा स्वच्छ आहे असे पसायदान गायला काय हरकत आहे!
No comments:
Post a Comment