Monday, October 19, 2009

पुन्हा चिरोटे - गांधी टोपी वाले!

पहिल्या चिरोट्यांच्या प्रयत्नानंतर पुढच्या दिवाळीत पुन्हा चिरोटे करावेत की काय असा विचार झाला. आधीच्या वर्षी मोडलेली कंबर, मान, मनगटं सुधारली होती. मधल्या वर्षात मी चिरोटे करतो हे ऐकून, ’काय तू चिरोटे करतोस?’ हे वाक्य स्तुती, आश्चर्य, असूया, अविश्वास, खेद(!) अशा वेगवेगळ्या सुरात ऐकून झालं होतं. त्या स्तुतीनं नाही म्हणायला माझा रथ अगदी युधिष्ठिराप्रमाणे एक दोन अंगुळे नाही तरी अर्धा पाव अंगुळे तरी हवेत पोहोचला होता. त्यामुळे यावेळी सोपे प्रकार न करता, तिरंगी गुलाबाच्या आकाराचे चिरोटे करावेत असे मनाने घेतले.

पुन्हा साहित्य जमवून सुरूवात झाली. मध्ये एक वर्ष गेलं‌ होतं. त्यामुळे आठवणी‌ अंधुक झाल्या होत्या. कणीक मळताना पाणी किती घालायचं? कणीक थलथलीत भिजवायची का घट्ट भिजवायची? चिरोटे किती पातळ लाटायचे? ते कितपत गरम तेलावर तळायचे? वगैरे प्रश्न पुऩ्हा पडले. एक गोष्टीबाबत मात्र बिलकुल शंका आली‌ नाही ती म्हणजे साटं कसं‌ करायचं आणि किती‌ लावायचं. वेगवेगळ्या रंगाच्या अकरा पोळ्या एकावर एक ठेवून चिरोटे करावेत असा बेत केला.

चिरोट्यांच्या लाट्या लाटून तेलात सोडायला सुरूवात केली. पहिला चिरोटा तेलात टम्म फुगला. दुसरा फुगला. तिसरा सोडला आणि त्याचे सगळे पदर एक एक करून तेलात स्वतंत्र पोहायला लागले. प्रेयसीला तिच्यासाठी घेतलेला गुलाब गुडघ्यांवर वगैरे बसून देताना त्याच्या पाकळ्या विलग झाल्यावर जे दु:ख प्रियकराला होईल तेच दु:ख मला झाले. एखादेवेळेस असं होतं अशी समजूत काढून मी पुढची लाटी तेलात मोठ्या आशेने सोडली. पण हातातली सत्ता गेली की आघाडीतले पक्ष जसे वेगवेगळा घरोबा करतात त्याप्रमाणे याही‌ चिरोट्याचे पदर सुटे सुटे होऊन तरंगू लागले. त्याच्या पुढच्याची पण तीच कथा! पुढच्या लाटीकडे पाहताना मला या बंडामागची बारभाई लक्षात आली. भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात त्यातली गत. मी उत्साहात दोन पोळ्यांमध्ये साटं थोडं जास्तच लावलं होतं. त्यामुळे कितीही लाटलं तरी तरी हे अकरा पदर एकमेकांत गुंतत नव्हते आणि तळताना साटं वितळून गेलं की सुटे होत होते. मला पराभव दिसू लागला, चेष्टा कानावर ऐकू येऊ लागली, चेष्टेखोर हास्य ऐकू आलं , चिरोट्यांविना फराळाचं ताट दिसू लागलं. ही नामुष्की सहन करण्यापेक्षा हे समोरचं तेल मला पोटात घेईल तर बरं असा विचारही मनात आला.

स्वयंपाकात पदार्थ व्यवस्थित करण्यापेक्षा बिघडलेला पदार्थाचा चांगला वापर करणे मला जास्त चांगले जमते. मी केलेल्या नारळाच्या वड्या पहिल्यांदा कधीच व्यवस्थित होत नाहीत. एकतर त्या थापलेल्या सारणात सुरीच काय पण कुठलंच धारदार हत्यार आत शिरत नाही किंवा सुरी कितीही फिरवली तरी ते पुन्हा एकत्र येतं. मग त्याला जरा दुध, खवा असा ’मस्का’ मारला की वड्या पडतात. शिरा केला तर गच्च गोळा तरी व्हायला लागतो किंवा त्याची लापशी तरी होते. ते सुधारावं लागतं. त्यामुळे या फसलेल्या प्रयोगाचं काय करता येईल असा विचार सुरू केला. साधे चिरोटे करावेत असं ठरवलं. साध्या चिरोट्यांमधे साटं पदरांना समांतर असल्याने ते वेगळे सुटण्याची शक्यता नव्हती. पण अकरा पोळ्यांच्या त्या लाट्या लाटताना सगळा पोळपाट भरून गेला. ती पोळी (चिरोटा म्हणणं मला जड जात होतं) तळून छोट्याशा तळणीची परीक्षा पाहण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून ती पोळी मधे कापून तो चिरोटा तळला. तीन रंग होतेच, त्यात त्याला गांधी टोपीचा आकार आला होता. ऐन निवडणूकीच्या काळात फराळाच्या ताटात तो ’राष्ट्रवादी’ चिरोटा विराजमान झाला. गुलाब नाही तर गांधी टोपी तरी!










साटा
चिरोट्याची‌ ही कहाणी टोपी चिरोटी सुफळ संपूर्ण.

टीप:‌ हे वाचूनही ज्यांना चिरोट्यांच्या वाट्याला जायचे आहे त्यांनी इथे टिचकी‌ मारा.

Friday, October 16, 2009

चिरोटे

"आपल्याकडे दिवाळीच्या फराळात चिरोटे का करत नाहीत?" - मी.
"तूच का नाही करत?" - आई मला चिडवत म्हणाली.
आईने हुशारीने एका दगडात दोन पक्षी मारले होते. चिरोटे जमले नसते तर मी पुन्हा नाव काढले नसते, जमले असते की आयते चिरोटे खायला मिळाले असते. माझ्या इज्जतीचा प्रश्न होता.

आईला चिरोटे कसे करायचे हे विचारायचा प्रश्नच नव्हता. साठेबाईंना पूर्ण शरण जायचं ठरवलं. पुस्तक उघडलं, चिरोट्यांची कृती शोधली. साहित्य जमवलं. कृती वाचून त्या प्रमाणे चिरोटे करायला सुरुवात केली. पहिल्याच वाक्यात ’मैदा, तूप, मीठ एकत्र करून त्याची पोळ्यांसारखी कणीक मळावी’ असं लिहिलं होतं. पहिलाच घास घशात अडकला. पोळ्यांशी संबंध फक्त खाण्यापुरताच असल्याने, ’त्यांची’ कणीक कशी तिंबतात हे कुठे माहित होते? या पुस्तकाच्या सुरुवातीला ’हे पुस्तक ज्यांनी आधी कधीही स्वयंपाक केलेला नाही’ अशांसाठी असल्याचा उल्लेख असल्याने, मोठ्या विश्वासाने ते उचलले होते. आता आली का पंचाईत. पण धीर सोडला नाही. मैदा, तूप आणि मीठ एकत्र करून ते कालवायला सुरुवात केली, बराच वेळ कालवलं तरी काही ते मिश्रण एकजीव होऊन कणीकेजवळ जाईना. अजूनही मैदा पीठाच्या रूपातच होता, फक्त तूपामुळे त्याला थोडा ओशटपणा आला होता इतकेच. मी हैराण! त्या पीठाने भरलेल्या परातीकडे मी विषण्ण नजरेने पहात असताना, माझी बहीण तिथे आली. मोठ्या तपानंतर समोर प्रकट झालेल्या देवाला भक्त ज्या आशेने मनातील ईप्सित सांगतो, त्या आशेने मी तिला माझी समस्या सांगितली. ’अरे, त्यात पाणी कोण घालणार?’ असे मोठ्याने हसत म्हणून ती देवाप्रमाणेच अंतर्धान पावली. घ्या! साठेबाईंनी साहित्यात पाण्याचा उल्लेखच केला नव्हता. ही कणीक भिजवायला पाणी लागते हे कोण सांगणार? आणि म्हणे ’हे पुस्तक ज्यांनी आधी कधीही स्वयंपाक वगैरे, वगैरे ...

एक प्रश्न सुटला. पाणी घ्यायला गेलो आणि दुसरा पुढे दत्त म्हणून उभा! किती पाणी? पण ’आता माघार नाही’ या निर्धाराने, मी तपेलीभर पाणी घेऊन बसलो. कधी पाणी कमी, कधी मैदा कमी असं करता करता एकदाची कणीक मळली गेली. पहिली पोळी लाटून पालथी टाकली तर तिने बंड पुकारून आपला आकारच कमी केला. तो पुन्हा पहिल्यासारखा करायला लाटली तर आपल्या मध्यभागातून तिने पोळपाटाचे अंतरंग दाखवायला सुरुवात केली. अशा अनेक संकटांना तोंड देत कशाबशा त्या पोळ्या लाटून झाल्या. पोळ्या लाटण्याच्या दिव्यातून बाहेर पडल्यावर त्यांना साटं लावणं, त्या एकावर एक ठेवून त्याची सुरळी करणं, काप करणं, ते काप पुन्हा लाटणं वगैरे कामं तर फारच सोपी होती.”आता ते लाटलेले काप तळावेत आणि तळताना त्यावर झऱ्याने तूप उडवावे’ अशी सूचना साठेबाईंनी केली. पण ते तूप उडवताना, ’अपवित्रं पवित्रो वा’ म्हणताना भटजी पाणी उडवतात तसे उडवावे का म्हैस धुताना पाणी उडवतात तसे उडवावे हे सांगायला त्या विसरल्या. शेवटी पाण्यात पडलं की पोहता येतं या न्यायाने पहिला चिरोटा तुपात सोडला आणि पोहू लागला. पोहता पोहता टम्म फुगला आणि माशाच्या कल्ल्यांसारखे त्याला पदरही सुटले.

तब्बल चार तासांच्या मेहनतीनंतर चिरोटे नामक प्रकार तयार झाल्यावर आईच्या ’तूच का नाही करत?’ या उद्गारांचा खरा अर्थ लक्षात आला. नरकचतुर्थीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर फराळ करताना सगळ्यांनी चिरोटे चांगले झाल्याची पावती दिली. कंबर, पाय, मनगटं आणि अर्थात मान असं सगळं मोडून तयार झालेल्या चिरोट्यांना नावं ठेवायची काय बिशाद होती कोणाची!