Saturday, August 28, 2010

प्रकाश नारायण संत

आम्ही नातेवाईकांकडे गेलेलो. आता नातेवाईकांकडे जाणार म्हणजे एक नंबर काम. दिवसभर काही काम न करता नुसत्या चकाट्या. म्हणजे त्या घरातली माणसं काही बाही कामं करत असणार, बायका स्वयंपाकघर हे ते बघणार, एकोणीसवेळा चहा, सरबत असलं काही विचारणार, पुरुष, कामावर जाणार, खरेदी हे ते बघणार; सुट्टी असलीच तर ते पण आपल्याबरोबर असणार चकाट्या पिटायला. पण आपण मात्र लोळत, गप्पा मारत, दिलेला चहा पित, काहीतरी चघळत, झालंच तर कुठे पत्ते हे ते खेळ, अंगणात भटक, असा दिवस घालवणार. दुपारच्या वेळी आजुबाजूच्या बिट्ट्यांच्या आया त्यांना घरी घेऊन जाणार तेव्हा तर मग दुपार खायला की काय ते उठणार. मग आपण काकांना मदत करू का म्हणून विचारणार.
"काका, तुम्हाला काही मदत हवी का?"
"मदत बिदत कसलं ते, सोड, सुट्टीची‌ मजा कर. कामं होतायत पटपट." - काका एकीकडे झाडाला आळं करत म्हणणार.
"मला कंटाळा यायलाय".
"असं म्हणतोस, बरं मग हे खुरपं घे आणि त्या शेजारच्या झाडाला आळं कर जा" - काकांना पण बरं वाटणार कोणीतरी सोबत म्हणल्यावर. पण तेवढ्यात काकू येणार, मला लाडू विचारत, आणि मला खुरप्यासकट झाडाच्या मुळाशी हात घातलेला पाहून काकांवर ओरडणार.
"सुट्टीला म्हणून आलाय तो आणि तुम्ही एकदम खुरपं दिलंत त्याच्या हातात. आपण एक दिवसभर खळ नसल्यासारखं कामं करणार, स्वस्थ बसायचं नाव नाही घेणार, आता त्या पोराला पण. सुट्टीचे चार दिवस तरी त्याला मजा करायला नको? . . ." - काकूचा लांबच लांब पट्ट सुरू होणार. काकांनी सोडलेल्या "अगं पण", "तोच तर", "ऐकून घे" वगैरे छोट्या पुड्या ह्या पट्ट्यापुढे हवेत कुठल्या कुठे उडून जाणार. माझं बखोटं‌ धरून काकू मला ओढत विहिरीकडे नेणार, माझे हातपाय धुणार, आणि लाडूची‌ वाटी माझ्या हातात देऊन माझ्या तोंडावर हात फिरवत, "गरीब बिचारं ते सोनं माजं" असं हे ते म्हणत मला घरात घेऊन जाणार. ह्या सगळ्या प्रकारात ते म्याड खुरपं समजूतदारपणे माझ्या हातातून निसटून कुठेतरी पडलेलं असणार आणि काकूचा पट्टा पार त्या झाडाच्या मुळापासून ते स्वयंपाकघरापर्यंत लांबलेला असणार. काकांना तो कडक वाटला तरी‌ मला मात्र तो एकदम मऊ वाटणार, काकूनं नेसलेल्या सुती लुगड्य़ासारखा!
तर असं ते काका, मामा, आज्जीकडे सुट्टीत रहायला जाणं. घरात असा आळस यायचं कामच नाय. जरा पडलेला दिसलो की आई बाजारात पाठवणार, बाबा काहीतरी काम सांगणार, नाहीतर उगाच पाढे, परवचा असं झेंगट मागं लावून देणार, कधी रागावणार, धपाटा घालणार. ते सगळं दुसरीकडे नसणार, तरी पण आपण तिथून आपल्या घरी कधी‌ जातो असं होणार, आणि आपल्या घरात शिरताच 'आई' म्हणून ओरडणार.

तर आत्तापण असाच कुणा मामाकडे, काकाकडे म्हणून गेलेलो आणि अशाच पट्ट्याला धरून घरात आलेलो, म्याडसारखा एका हातात वाटी आणि दुसऱ्या हातात लाडू धरून. तो लाडूपण म्याडसारखा कधी तोंडात गेलेला ते पण नाही कळलं. नकळत पुस्तकाच्या एका कपाटासमोर उभारलेलो, यातलं कुठलं वाचायला घ्यावं याचा विचार करत. आमच्या वर्गात बाईंनी‌ नाटकात काम करण्यासाठी‌ पोरांना हात वर करायला सांगितल्यावर जशी सगळी‌ पोरं मी, मी‌ करत हात वर करतात तसं सगळी‌ पुस्तकं मी, मी करताहेत असं वाटायलेलं. मी पटकन एक पुस्तक काढलं, 'वनवास' - प्रकाश नारायण संत! मुखपृष्ठावर हिरव्या रंगाच्या गोंधळात एक मुलगा गुडघ्याला मिठी‌ मारून, एका गुडघ्यावर गाल टेकवून, म्याडसारखा बसलेला. त्या हिरव्या रंगांच्या गोंधळासारखाच गोंधळ त्या मुलाच्या मनात असणार, आणि गुडघ्याला मिठी मारून तो मुलगा त्या गोंधळात हरवून गेलेला असणार असं वाटायला लागलेलं. म्हणजे तो मुलगा आणि मी यात काहीच फरक नसणार. माझ्याही मनात असाच हिरवा गोंधळ, आणि मी‌ त्यात कधीकधी‌ हरवून जाणार, बऱ्याचदा संध्याकाळी, राखाडी संध्याकाळ आणि तो हिरवा गोंधळ आणि मी त्या दोऩ्हींत विरघळलेला. आई मला शिंगं फुटायला लागली असं काही म्हणते तसंच त्या मुलाचं पण झालेलं असणार, न दिसणारी, हिरवी शिंगं!
तर असा तो 'वनवास' घेऊन बसलेलो. त्या मुलाचं नाव लंपन हे मला चांगलंच कळलेलं आणि माझंही नाव लंपन आहे असं वाटायला लागलेलं. जसं पुस्तक वाचायला लागलो तसा माझ्यातला लंपनही मला दिसायला लागलेला. म्हणजे मी वाचत होतो तो लंपन वेगळा, आणि दिसत होता तो लंपन वेगळा पण तरीही एकच असं काही म्याडसारखं वाटायला लागलेलं. तो लंपन त्याच्या आज्जीकडे कानडी मित्रांसोबत आणि माझा लंपन माझ्या कोण कोण आत्या, मामी, आजी अशांकडे, कधी फणस, आंबा असल्या झाडांवर सतराशे छत्तीस पानं आणि फांद्यांमध्ये शत्रूपासून लपून बसलेला, कधी मारुतीच्या देवळाभोवतीच्या कट्ट्यावर दरबार भरवून राज्याची हालहवाल पाहणारा, कधी गच्चीवर तोफा लावून किल्ल्यावरचा हल्ला परवणारा, कधी गळलेले छोटे फणस, नारळ असं काय काय गोळा करून प्राजक्ताच्या बियांच्या मोहरांच्या बदल्यात व्यापार करणारा, कधी आजूबाजूच्या पोरांबरोबर गारगोट्या, सागरगोटे, आगपेट्यांची पाकिटं असं काहीबाही गोळा करत तासंतास भटकणारा. तो शत्रू तरी म्याडसारखा एकोणीसशे चौतीस वेळा मार खाऊन पळालेला असणार, त्या व्यापारात नफा, तोटा असलं काही नसणार, आणि तो दरबार कोणाच्या दमदार हाकेबरोबर एकदम बरखास्त होणार. तशाच एका सणसणीत हाकेबरोबर माझा लंपन गायब झालेला आणि समोर काकू उभी! "जेवायला येतोस का म्हणून विचारायला आले, तर तू आणि कुठे तंद्री लावलीस? आणि हे काय अजून लाडू नाहीच संपवलास? चल संपव तो आणि वाटी‌ दे मला". तिला मी एकदम डोळे मोठ्ठे करून, तोंडाकडे चाललेल्या हातात अर्धा खाल्लेला लाडू धरून, शून्यात का काय म्हणतात त्यात बघत, इष्टॉप म्हणल्यावर पुतळा झाल्यासारखा बसलेला दिसत असणार. पण त्या शून्यात बघत असलेला लंपन तिला दिसायला नाही. त्यामुळे हे ही कळायला नाही की तो लाडू घेतलेला हात तोंडाकडे जाता जाता असा अर्ध्यावरच का थांबलेला ते.

मग ते पुस्तक मी सोडायला नाही. खाता, पिता, झोपता तो लंपन आणि मी. पुऩ्हा कंटाळा वगैरे म्हणायचं देखील काम नाही. मी त्या लंपनला सोडायला नाही आणि 'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत' अशा पुस्तकांमधून माझ्या थेट मनात जाऊन बसलेला लंपन मला सोडायला नाही.
--

मी 'वनवास' नक्की कधी वाचलं ते आठवत नाही, पण मी सातवी ते दहावीत असताना कधीतरी वाचलं असावं. लंपनचं भावविश्व अतिशय नेटकेपणाने आणि वाङ्मयीन अचूकतेने या पुस्तकांमधून व्यक्त होतं, आणि मनाला भावतं. कानडी-मराठी‌ मुलुख, तिथली भाषा आणि माणसं आपली होऊन जातात. नंतर त्यांची 'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत' वाचली. मराठीत इतक्या सुंदर ललित कथा फार थोड्या आहेत. या चार पुस्तकांपलिकडे हे लिखाण झालं नाही याचं दु:ख न संपणारं आहे तितकाच या पुस्तकांमधून मिळणारा आनंदही‌ न संपणारा आहे. प्रकाश नारायण संतांना ही‌ माझी‌ नम्र श्रद्धांजली.

2 comments:

paamar said...

I guessed what this article is about when I read the word 'myaad' :) Nice one. I also love these books.

Rekha J said...

पण पुस्तक संपल तरी लंपन काही मनातून जात नाही. त्याच १८ * १८ आणि म्याड म्हणन खूप भारी वाटत.
लंपनच भावविश्व संतानी खूप अगदी सही रंगवलंय. लंपन आणि सुमी....त्यांचे आजोबा...सगळच मनाला भुरळ पडतात.