Sunday, February 07, 2010

रीटा, च्या आणि केळफा

कधी‌ नव्हे ते गेल्या दोन तीन महिन्यांत लागोपाठ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायचा योग आला. हे तीनही‌ मराठी चित्रपट होते हे विशेष! आणि तीनही‌ चित्रपट पाहणं हा सुखद अनुभव होता.

रीटाचा विषय वेगळा होता, त्याबद्दल मतभेद असतील पण  त्याविषयाची हाताळणी फारच प्रसन्न आणि प्रगल्भ वाटली. विशेषत: पल्लवी‌ जोशीचा अभिनय 'एकदम चाबूक', अगदी‌ जागेवर उभे राहून आणि जोरदार टाळ्या वाजवून दाद देण्याइतका. (मी काही‌ खुर्चीवरून उठून पुढे जाऊन इतर काही करू शकत नाही‌ ;) तेव्हा इतकंच!) तिचं‌ सुरूवातीला खिडकीवर उलटं‌ 'रीटा' लिहून आपण वेड्याच्या इस्पितळात असलो तरी‌वेडे नाही‌ हे दाखवण्याच्या प्रसंगातून पुढे किती‌ छान दिग्दर्शनाचा नमुना पहायला मिळणार आहे याची झलक मिळाली. पुढे उत्तरोत्तर कथा फुलत गेली अगदी शेवटच्या प्रसंगापर्यन्त. रेणुका शहाणेचं‌ कौतुक करावं तेवढं थोडंच! वास्तविक असा विषय असताना चित्रपट उत्तान/बीभत्स करणं काही‌ अवघड नव्हतं, ('कभी अलविदा ना कहना' आठवतोय?) पण तरीही तो अतिशय संयतपणे चित्रित झाला आहे. रीटाची असे असामान्य नाते जपण्यासाठी होणारी ओढाताण, तरीही त्यातले पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आणि ते पावित्र्य सिद्ध करण्याचा तिचा अट्टाहास, त्या प्रयत्नात तिचं झालेलं पतन आणि त्या जाणीवेनं स्वत:वरचा आलेला राग आणि मानसिक आघात, याबरोबरीने वेगवेगळ्य़ा पातळ्यांवर घरच्या वातावरणाचा होणारा परिणाम फार सुन्दर चित्रित झाला आहे. चित्रपट पाहिल्यावर जसं मन रितं होतं तसंच चांगली कलाकृती पाहिल्याच्या आनंदाने भरतंही.

सुमित्रा भावे आणि मंडळीच्या साच्यातल्या 'एक कप च्या' हा दुसरा चित्रपट. वास्तुपुरूष, देवराई, वळू वगैरे यादीत फिट्ट बसणारा! तिथे वेगळा संघर्ष. सगळ्या कलाकारांनी‌ काम छान केलं आहे. फक्त एकच कोंकणातल्या मराटीचे हेल नीट जमलेले नाहीत असं वाटलं. एखाद्या सामान्य माणसाला आपल्या तत्त्वांसाठी काय संघर्ष करावा लागतो, आनी‌हे करत असताना त्याला घरातले सगळे कशी साथ आणि सहकार करतात हे पाहून आपल्यालाही उभारी येते. विशेषत: यात 'साता समिंदरापार ब्रह्म्याची सृष्टी' या ओवीचा फारच छान उपयोग केला आहे. हे पूर्ण काव्य कोणाला माहीत असेल तर मला देऊ शकेल का?

तिसरा चित्रपट 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'. दादासाहेब फाळके यांनी‌ काढलेल्या पहिल्या मराठी‌ (आणि भारतीय़) चित्रपटाच्या निर्मितीची कथा. प्रसन्न सादरीकरण, योग्य तंत्रांचा वापर आणि अर्थातच अभिनय यामुळे चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. कथा जितकी मनोरंजक आहे तितकाच चित्रपटही देखणा झाला आहे. कमीतकमी दोन बादल्या अश्रू गाळण्याची‌ ताकद कथेत असूनही तो लोभ टाळला आहे. फाळके यांनी हा चित्रपट करण्य़ासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांचा संघर्ष हसत खेळत दाखवला आहे, पण त्यातलं गांभीर्य तसुभरही कमी न होऊ देता. कदाचित दादासाहेबांच्या स्वभावानुसार ही संट त्यांनीही अशीच हसत खेळत पेलली असतील. ऑस्करचे आव्हान हा चित्रपट पेलू शकेल अशी आशा वाटते, त्यासाठी शुभेच्छा!

एकही‌ गाणं नसणं हे या तिघांचंही आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल.  चित्रपट पाहिल्यावर मला नको नको वाटत असताना गेल्या काही दशकांतल्या बहुसंख्य भयानक चित्रपटांची आठवण झाली. भयानक कपडेपट, भयानक नाच आणि गाणी, भयानक संकलन, भयानक दिग्दर्शन अशा अनेक भयानक गोष्टींनी भरलेले ते भयानक चित्रपट! लक्ष्या, सराफ यांच्या इनोदी चित्रपटांची परंपरा अजूनही भरत आणि मकरंद चालवत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे चित्रपट असणं आल्हाददायक आहे. कसदार कथा आणि तिला साजेसं दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, पार्श्वसंगीत, आणि जोडीला उत्कृष्ट सादरीकरण, संकलन इत्यादी तांत्रिक बाबी ह्या चांगल्या गोष्टींचं महत्त्व पटवण्यासाठी मधला भयानक चित्रपटांचा कालखंड एखाद्या वाईट स्वप्नासारखा आला अशी समजूत करायला हरकत नाही. असेच चांगले चांगले चित्रपत मराठीत निर्माण व्हावेत आणि ते आम्हाला पहायला मिळावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ता.क. हे लिहून झाल्यावर 'नटरंग' पाहिला पण या यादीत तो नको :)

No comments: