Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, August 09, 2026

कर्ण, व्यास आणि कंस: सुवर्णा बर्वे

माझी आत्या, सुवर्णा बर्वे, कविता छान करते. तिला तिच्या आईकडून म्हणजे माझ्या आजीकडून ही देणगी मिळाली असावी. परिचित गाण्यांच्या चालींवर शब्द बसवण्यात त्यांचा हातखंडा. त्यांच्या कविता साधारणत: वृत्तबद्ध किंवा गेय असत. जुन्या मराठीची छाप त्या कवितांवर दिसते. त्या दोघींच्या कविता इथे, त्यांच्या परवानगीने, वेळोवेळी प्रस्तुत करेन. त्या अनुषंगाने त्यांचा परिचयही करून देईन.

या मालिकेतील पहिली कविता: कंस,व्यास आणि कर्ण 

आत्या आठवी ते दहावी गणित, संस्कृत आणि शास्रे यांचे वर्ग घेत असे. विषय कितीही क्लिष्ट असला तरीही मनोरंजक पद्धतीने, सोपा करून सांगण्यात तिची हातोटी होती. भूमितीसारख्या अप्रिय, कंटाळवाण्या विषयावरही तिने मजेशीर कविता केली.

कंस,व्यास आणि कर्ण हे तिघेजण महाभारतातून भूमितीत गेले की भूमितीतून महाभारतातून आले? पण.... एक मात्र खरं की भूमितीतले मार्क कळले की,घरी महाभारत घडायचं.

कर्ण आणि व्यास, महाभारतात सति द्रौपदीस, रडवीति |
कंस मामा राही, मथुरेत बाई देवकी मातेस, कष्ट देई ||

तिघे जण मिळुनी, भूमितीत शिरुनी मज धाई धाई, रडविती |
द्रौपदी,देवकी कृष्णे उद्धरीली, मजला तारण्या कोणी नाही ||

गणिताची साथ ,म्हणून सोडली आता पुन्हा वाटे जाणे नाही!!

Wednesday, September 20, 2006

वृक्ष् आणि वल्ली

(Duke's nose च्या पायथ्याशी)

वसंत फुलला, श्रावण स्रवला, जग हिरवाई ल्याले
मीच अभागी, पर्णहीन का, नैक पानही फुटले
वेणू वाजला, गोपी रंगल्या, तरी कोरडी, का मी?
येई सख्या रे धावत येई, मजला जवळी घेई.

(पुरंदरच्या पायथ्याशी)
पुरंधराच्या पुढ्यात मंडप, सजला पाचूंचा
कूजन मंजूळ करती पक्षी, घन वाजे चौघडा

ल्याली धरती हिरवा शालू, रानफुलांचा साज
नीलगगन वर नटला माळून, इंद्रधनूचा हार

पुराण पंडित गातो मंगल, अष्टक लग्नाचे
फुले धुक्याची घेऊन आली, शुभ आशिर्वचने