Saturday, January 21, 2023

कृष्णेपासून पाचगणीपर्यंत

पुण्याची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे पुणे सर्व बाजूंनी टेकड्यांनी, डोंगरांनी वेढलं आहे. पुण्यातून कुठेल्याही बाजूने बाहेर पडलं तरी रस्ता डोंगरटेकड्यांमधूनच जातो. काही डोंगरटेकड्यांना नावं आहेत, काहींना नाहीत, काही माहिती आहेत, काही नाहीत. माथ्यावर एकटं मंदिर, कुठे किल्याची तटबंदी, कुठे लेणी, कुठे जंगलं, कुठे नुसतंच उजाड पठार प्रत्येक डोंगर, प्रत्येक टेकडी स्वत:चं व्यक्तिमत्त्व सांभाळत, मिरवत या रस्त्यांना साथ देत आले आहेत. मी लहान असल्यापासून माझा प्रवासातला एक विरंगुळा म्हणजे या टेकड्या, हे डोंगर पाहणं. त्यांचे माथे, त्यांचे चढ-उतार, आकार, रंग यातून त्यांचं व्यक्तित्त्व उलगडण्याचा प्रयत्न करणं. यातलाच एक विचार म्हणजे, या माथ्यांवर कसं पोचता येईल, त्यांचं अंतरंग कसं असेल याच्या कल्पना लढवणं. मोठा झालो तसं गिर्यारोहणाची ओळख झाली. अनेक गडकिल्ले चढलो, भटकलो. पण प्रत्येकवेळी कोणीतरी अग्रग (आधी जाऊन आलेला) बरोबर असायचा! किंवा आजूबाजूला मार्गदर्शन करणारं कोणीतरी भेटायचंच, किंवा वाटा एवढ्या वापरात असायच्या की वेगळं विचारण्याची गरजच पडायची नाही. त्यामुळे अनोळखी डोंगरटेकड्यांवर स्वत: मार्ग काढत चढणं ही कल्पनाच राहिली. वय वाढत गेलं तशी अनेक गोष्टींबरोबर याचाही विसर पडला.


काही महिन्यांपूर्वी कृष्णाकाठी धोमधरणाच्या तलावाशेजारी राहण्याचा योग आला. जिथे राहत होतो तिथून समोरच एक डोंगराची सोंड वरती पाचगणीपर्यंत पोहोचलेली दिसत होती. बालपणीच्या कल्पना मनात पुऩ्हा उभारून आल्या. या मुक्कामात सकाळी मी आधी एकटा आणि मग सहकुटुंब त्या सोंडेवर चक्कर मारून आलो. असेच चढत गेलो तर पाचगणीपर्यंत
पोहोचता येईल. तसं करून बघावं का असा विचार आम्ही केला. मुलांनाही एव्हाना या कल्पनेची भूरळ पडली होती. सहचारिणीने आपले पद अक्षरश: खरे करण्याचे ठरवले. पुऩ्हा कधीतरी येऊन इथून पाचगणीला गिर्यारोहण करत जाऊ असे बेत आखत आम्ही परतलो. रोजच्या व्यापात तो बेत मागे पडत चालला होता. कमीतकमी वर्षभरतरी हा बेत रहित होणार असं दिसत असताना (म्हणजेच पुऩ्हा कधीही‌ तो खरा होण्याच्या बेतात असताना), अचानक गोष्टी जुळूण आल्या. आम्हा दोघांना सलग सुट्टी मिळाली, मुलांना सुट्टी मिळाली. एका सकाळी न्याहरीच्या वेळेस पुढच्या दोन दिवसांनी होऊ घातलेल्या कृष्णाकाठ ते पाचगणीच्या स्वारीची पूर्ण योजना तयार झाली. इतर गोष्टी हव्या तशा घडत गेल्या आणि आम्ही दोनच महिन्यात पुऩ्हा त्या सोंडेवरून वर चालू लागलो.

Google map वरून थोडा फार अंदाज घेतला होता. मुख्य म्हणजे पूर्ण वाटेवर range असेल अशी शक्यता दाट होती. डोंगराच्या पायथ्याला चोहोबाजूला वस्ती होती. काही बरेवाईट झाले तर फोन, रस्ते, वाहने अगदी सहज नव्हे पण दुर्गमही नव्हते. आम्ही श्री सरोदेंची एक गाडी भाड्याने ठरवली.  पूर्वीच्या ओळखीचा मान राखून असेल कदाचित पण तेही स्वत: आमच्या या योजनेत सामील झाले. काही झाले तर त्यांना जवळच्या रस्त्याने पोचण्याजोग्या ठिकाणी यायच्या सूचना दिल्या होत्या.सापविंचू, वाट चुकणे, दुखापत, थकवा अनेक शंकांची उत्तरं तरीही माहिती नव्हतीच. इतके गडकिल्ले चढून डोंगर दुरुनदेखील जोखण्याचे कसब आपोआप येते. दगडामातीच्या त्या वाटांवरच्या खुणांची ओळख होते. त्या अनुभवाच्या शिदोरीवर आणि देवावर भिस्त ठेवून आम्ही सुरुवात केली. मुलं लहान, अननुभवी पण आईबापावर विश्वास ठेवून निघालेली. असे आम्ही पुऩ्हा ती चढण चढू लागलो.


अर्धीअधिक वाट पटकन सरली आणि चढण चालू झाली. पाण्याची वाट गुरामाणसांनी जाऊन सरावती केली होती. शेणालेंड्यांनी ती ओळख जागोजागी पटत होती. दक्षिणेकडे चढ असल्याने दिवस वर आला तरी दक्षिणायनी सूर्याने फार तापला नव्हता. पण हळूहळू गवत उंच उंच होऊ लागले तशी वाट अचानक पायातून निसटून जाऊ लागली. बऱ्याच वेळा परतण्याची वेळ येणार असे वाटेपर्यंत तिने आपले अस्तित्व प्रकट केले. गवताचे बी कपड्यांतून अंगाला टोचू लागले तरी आम्ही वाटचाल चालूच ठेवली. क्वचित माघार घेऊन वाट बदलत, एकमेकांना प्रोत्साहन देत जवळजवळ तीन तास आम्ही फारसे न थांबता चढत होतो. बऱ्याच डोंगरांवर अगदी माथ्याच्या बाजून उभ्या शिळा असतात त्या सहज चढता येत नाहीत, त्यांना कुठेतरी फट असते ती वळसा घालून शोधून मग माथ्यावर पोचता येते. तसे झाले असते तर पंचाईत होती. पण तसे न होता एक विचित्रच संकट समोर ठाकले. Google map अगदी थोडके अंतर राहिलेले दाखवत असताना, अनेक काटेरी फांद्यांनी आमची वाट अडवली. गवताचे काटे टोचून त्यांचे आता काही वाटत नव्हते. अंगाचा कुठलाही भाग या काट्यांना अपरिचित राहिला नव्हता. पण या काटेरी फांद्या भयानक होत्या, घातक होत्या. जिकडे जावे तिकडे या फांद्या. माघार घेऊनही पुऩ्हा त्या समोर येत होत्या. आमच्याकडे त्या फांद्या मोडायला काहीच हत्यार नव्हते किंवा त्यांच्यापासून रक्षण करण्याचे साधन. अखेर त्या फांद्या या एकाच झाड्यापासून चहूबाजूंनी पसरल्या आहेत असे लक्षात आले. त्याचे पसरणे वडासारखे दिसत होते. त्या अनादि, अनंत झाडाल वळसा घालून जाणे हा एकच उपाय दिसत होता. इथे गवत आमच्या डोक्याहूनही उंच होते. मुले तर गवतात पूर्ण लपत होती. त्यामुळे वाटाही कळेनाशा झाल्या होत्या. आपल्याला पाचगणीपर्यंत न पोचता इथूनच, इतक्या जवळून परत जावे लागणार या कल्पनेने हैराण व्हायला होत होते. पण प्रयत्नांना अखेर यश मिळाले वाट शोधता शोधता ते झाड मागे पडले आणि थोडक्या वेळात आम्ही शेतांमधून चालू लागलो. चार तासांचा वाटचालीनंतर पांगारी गावात पोचलो. एक आजी भेटल्या, त्यांना आम्ही कुठून आलो हे सांगितल्यावर त्यांनी आ वासला. कित्येक वर्षात या वाटेने कोणी माणूस आलागेला नाही असं त्या म्हणाल्या. सरोदेंना location pin पाठवून बोलवून घेतलं. तेही दहाव्या मिनिटाला आमच्या समोर हजर झाले.


आमच्या या विजयाबद्दल 'उस्तादी'त मेजवानी झोडून आम्ही पुण्याच्या वाटेला लागलो तेव्हा चेहऱ्यावर शक्याशक्यतेच्या सीमा ओलांडल्याचा आनंद होता, अंगात काटे, आणि मनात काहीतरी वेगळं केल्याची झिंग.


बालपणीच्या वेडगळ कल्पना, स्वप्नं खरी करण्याचं‌ धाडस कमी लोक करतात. त्या खऱ्या होण्याचं भाग्य थोड्या लोकांना असतं हे The Alchemist मधे मी वाचलं होतं. ते भाग्य थोड्या प्रमाणात का होईन माझ्या वाट्याला सहकुटुंब आलं.

6 comments:

Anonymous said...

फारच मस्त लिहिले आहेस.. सगळं चित्र डोळ्या समोर उभे राहिले

Mugdha said...

मस्त! अनुभव आणि लिखाण दोन्हीही!

ASK said...

👍👍 खुपच भारी👍👍

संसारघाट said...

Khup khup bhari
Vachtana sagla dolyasamor ala
Mastaaaa

Anonymous said...

छान ट्रेक झाला मुलांना बरोबर घेऊन..काहीच ओळखीचं नसताना, वाट शोधायची...मस्तच...

Ashutosh Bapat (आशुतोष बापट) said...

प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!