Friday, July 15, 2022

एक वर्ष भाज्यांचं

 बटाटा, वांगी, घेवडा, वाल पापडी, वाल पावटा, भेंडी, टॉमॅटो, मुळा, कांदा, पुदिना, मिरची, मेथी, पालक, दुधी भोपळा, भोपळी मिरची, अळू, हळद, कोथिंबीर, चुका, घोळू, मायाळू, राजगिरा, आंबा, फणस, नारळ, भुईमूग, लिंबू, लेट्यूस, बसिल - मी भाजी मंडईबद्दल बोलत नाहीये. ही सगळी नावं आम्ही आमच्या घरी उगवलेल्या पिकवलेल्या भाज्यांची, फळांची नावं आहेत.

पुण्यासारख्या शहरात मिळण्याऱ्या फळांची, भाज्यांची दिवसेंदिवस घसरत चाललेली प्रत, फळ, भाज्या पिकवण्याच्या, साठवणीच्या सदोष आणि धोकादायक पद्धती, त्यातून होणारे आजार हा मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यात दोषारोपांपेक्षा पुण्यासारख्या सुपीक प्रांतात, बारमाही नद्यांमध्ये वसलेल्या शहरात ही स्थिती निर्माण का व्हावी हा प्रश्न आणि त्यावरील उपाय महत्त्वाचे आहेत. कोविडच्या काळात अन्न ही अत्यावश्यक सेवा झाल्याने हे प्रश्न फारच तीव्र झाले. या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, थोडीफार मजा, नेहमीच्या कामातून विरंगुळा म्हणून मी बागेत भाज्या घ्यायला सुरुवात केली.

पुण्यात बंगला आणि त्याभोवती बाग असणं हे भाग्य. या बागेत माझ्या लहानपणीपासून फळझाडं आहेत, आंबा फणस हे त्यातलेच. क्वचित भाज्या घेतलेल्याही मी पाहिल्या आहेत. त्यामुळे बागेत भाज्या घेणं हे मला नवीन नाही. एकदा बी टाकलं की बरंचसं काम निसर्ग करतो त्यामुळे तिथेही सुरुवात करायला फारसं अवघड नाही. शेतासारखं टनावारी उत्पादन, एकरी उत्पादनाच्या अवघड गणितापेक्षा, जे उगेल ते आपलं इतकं साधं गणित ठेवल्याने मातीची प्रत, खतं, बियाण्याची प्रत असल्या भानगडीत पडायला लागलं नाही. बिया लावून बघायच्या, त्यांना नियमित पाणी‌ घालायचं, वेळोवेळी खुरपणी करायची, खतं, कीटकनाशकं घालायची यातून जे येईल ते वापरायचं इतका साधा खेळ सुरु केला. रोजच्या कामातून या सगळ्यासाठी वेळ काढणं अवघड असल्याने एक माळी‌ ठेवला. प्रत्येक झाडानुसार खतं आणि कीटकनाशकं शोधणं, सांभाळणं शक्य नसल्याने साधारण सर्व झाडांना चालतील अशी खतं आणि कीटकनाशकं वापरली. यातून गेलं वर्षभर आम्ही भाज्या घेत आहोत. तीव्र उऩ्हाचे एक दोन महिने सोडता  दर आठवड्यात सरासरी दोनदातरी आम्ही घरातली भाजी स्वयंपाकात वापरतो आहोत. एक दिवस घरी उगवलेल्या पाच भाज्यांचा वापर करून स्वयंपाक केला, त्याची सर पंचपक्वांनाही यायची नाही.

अर्थात् हे जितकं वाटतं तितकं glamorous नाही. बाजारातून आणलेली भाजी आपण हवी तितकी(च) आणू शकतो परंतु बागेत तसं होत नाही. कधी जास्त कधी कमी. अशा भाज्यातून पोटभर स्वयंपाक करणं ही कल्पनेला ताण देणारी कला आहे. कालच पाच वांगी मिळाली, तीन भरल्या वांग्याच्या आकाराची‌, दोन जरा मोठी. मग तीन वांग्यांची भरली वांगी आणि बाकीच्या दोघांची परतून अशी ताटात आली. भोपळी‌ मिरच्या कमी आल्या तर कधी भरीला बटाटे किंवा त्याचं पंचामृत करायला कल्पनाशक्ती पणाला लागते. अनेकदा झाडं मरतात, हाताशी आलेल्या भाज्या अनाकलनीयरित्या नासतात हे सगळं पचवायला लागतं. मुख्या म्हणजे यात आर्थिक नफ्यातोट्याचा विचार केला तर हा आतबट्याचा व्यवहार ठरतो.

भाज्या, फळं ताजी मिळतात. बाजारात अगदी farm fresh वगैरे नावाखाली मिळणाऱ्या भाज्याही किती शिळ्या असतात याचा अंदाज घरी पिकवलेली भाजी झाडावरून काढून ताटात घेतल्याशिवाय कळणार नाही. बहुतेक भाज्या कच्च्या खाल्यातरी चविष्ट लागतात किंबहुना शिजवण्यापेक्षा त्या तशाच खाव्याशा वाटतात इतक्या त्या ताज्या असतात. याव्यतिरिक्त या भाज्यांना उगवताना, वाढताना पाहण्याचं सुख वेगळं! त्यातून आपल्या ज्ञानात पडणारी भर वेगळी. एखादे झाड विपरीत परिस्थितीत वाढताना त्याची लवकर पिकून बिया निर्माण करण्याची‌ चाललेली धडपड पाहिली की आजच्या corporate जगतातील stress चे आकलन होते. असे साक्षात्कार वेगळे!

असो तर हे असं भाजीपुराण. शहरी शेती (urban farming) ही नवी कल्पना मूळ धरू पाहते आहे. इमारतींच्या गच्च्या, तिथली सामाईक मोकळी‌ जागा जी‌ इतरवेळी वापरात नसते ती भाजीपाला उगवण्यासाठी वापरात आणणे अशी साधी कल्पना. त्या कल्पनेच्या अनुषंगाने आमचा स्वल्प प्रयत्न! याची काही क्षणचित्रे.
3 comments:

Anonymous said...

Sundar 👌🏻👌🏻👌🏻😊

Anonymous said...

Mastach 👌🏻👌🏻

Anonymous said...

खरच घरी स्वतः कष्ट घेऊन पिकवलेल्या भाज्या म्हणजे सुख आहे, मस्त 👌👌👍