Thursday, April 13, 2006

भय इथले संपत नाही.

परवा कौस्तुभने मला 'भय इथले' (महाश्वेता चे शीर्षकगीत) ऐकायला दिले. मी तसे ते पूर्वी बऱ्याच वेळा हे गाणे ऐकले होते, पण पुन्हा ऐकल्यावर नकळतच त्या गाण्यात पूर्ण बुडून गेलो.

संध्याकाळची वेळ. सूर्यास्त होतोय. भगव्या संधीप्रकाशात क्षितिजापर्यंतची जमीन न्हायली आहे. त्याचवेळी चंद्राचं प्रतिबिंब वाहत्या झऱ्यांत पडलं आहे. झाडाखाली बसलेला मी, मला स्वतःलाच विसरतो. ते वातावरण आणि मी यांच्यातील नात्याची मला नव्याने ओळख होते. मी त्या झाडाशी तन्मय होऊन ती स्थिती अनुभवू लागतो.

याच वेळी अनाकलनीय हूरहूर मनाचा ताबा घेते. कोणाची तरी आठवण यायला लागते. विरहार्त मन कासावीस होतं. पण ही हूरहूर, हे कासावीस होणं हवहवसं असतं, पण तरीही त्रासदायक. त्या सुगंधी आठवणींनी मन भरून जातं, आणि उरते प्रचंड असहायता. ग्रेससारखा कवी या अवस्थेला शब्दांत बांधतो -

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवीली गीते

हे झरे चंद्र सजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
- ग्रेस

यक्षाने मेघासमोर आळवलेले मेघदूत हे ही असेच स्तोत्र नाही काय?

मी या गीताचा अर्थ लावायचा बराच काळ प्रयत्न करत होतो. यातल्या रूपकांचे अर्थ काही केल्या सापडत नव्हते. किंवा जे लागलेसे वाटत होते, ते सर्वत्र लागू होत नव्हते. पहिलं कडवं नीट वाचल्यावर मला कळलं, हया कवितेत गूढ काहीच नाही, हे साधे शब्दचित्र आहे. अगदी 'औदुम्बर' इतके साधे, पण तरीही नितांत सुंदर. बाकी कडवी ही, या शब्दचित्राने प्रभावित झालेली भावचित्रे आहेत. सीता दोनदा वनवासात गेली, त्यापैकी दुसऱ्या वनवासाचा उल्लेख दुसऱ्या कडव्यात आहे. यावेळी तिच्यासोबत रामाच्या आठवणीच होत्या. या आठवणींचे रूपक म्हणून शेल्याचा वापर केला आहे. तिची या आठवणींनी जी अवस्था केली असेल तशीच अवस्था कवीला इथे अभिप्रेत असावी.

अशा कित्येक अस्वस्थ संध्याकाळी मी या गीताच्या साथीने साजऱ्या केल्या आहेत, तरीही,
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
हेच खरे!


पूर्ण कविता मला इथे मिळली

4 comments:

Vishal K said...

वा आशुतोष,
मीसुध्दा हे गाणं मिळाल्यापासून नियमित ऐकतोय. पण त्याचा गर्भितार्थ एवढा सुंदर आहे याचा कधी विचार केला नव्हता. आज उलगडा झाला. धन्यवाद.
तुझे लेख छान आहेत. असंच लिहीत राहा.
btw, नंदननं सुरु केलेल्या बुक टॅगिंगचा खेळात तुला टॅग केलंय. वेळ मिळाल्यास लिही.

Kaustubh said...

सुंदर लिहिलं आहेस आशुतोष.

TheKing said...

Indeed cool article!

Btw, where can I get this song? Had heard ages ago..

Anonymous said...

Athavanitaligani या साईटवर मिळेल. लताबाईंच्या आवाजात आहे. अप्रतिम. मला अर्थ कळला नाही तरी गाणे आवडते.
डॉ. अस्मिता फडके,पुणे.