Sunday, September 29, 2013

चारचाकी चालवणं

मी‌ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातलं. पहिल्याच दिवशी शिकवणाऱ्यानं विचारलं, "कुठली गाडी चालविता येते?". "लुना", मी उत्तरलो. कुठून येतात असा चेहरा करून तो म्हणाला, "म्हणजे, कुठली गिअरवाली गाडी चालवता येते?". "कायनेटिक", कुठलीच नाही असं म्हणून पूर्ण इज्जत जाण्यापेक्षा हे बरं होतं. "जरा पाहून घेत जा रे", आतल्या माणसाला उद्देशून म्हणलेलं हे वाक्य मी कानावर घेतलंच नाही. माझाही नाईलाज होता, मला लुना ते चारचाकी ही उडी‌ घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं, म्हणून अक्षरश: उडी मारून मी‌ स्टिअरिंग व्हीलचा ताबा घेतला. हा माणूस मला इथूनच हाकलून देतो का काय अशी‌ भीतीही‌ असं 'पाऊल उचलण्या'मागे होती. "गिअर, क्लच म्हणजे काय हे माहित आहे का? या बाहेर. मी‌ थोडं चालवून दाखवतो, मग तुम्हाला शिकवतो". पुढचा काही काळ गाडीचे वेगवेगळे भाग कुठे कुठे असतात आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे जाणण्यात गेला. मग बॉनेट नावाची अलिबाबाची‌ गुहा उघडण्यात आली. एकूण पहिला दिवस शाळेत जातो तसा नुसतेच नव्या पुस्तकांचे वास घेण्यात गेला. खरी मजा दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली.

शाळेतल्या पुस्तकांमधले पहिले धडे सोपे असतात. पण इथल्या पहिल्या धड्याने अगदी 'बसल्या जागी' घाम काढला. पहिला गिअर टाकून गाडी ‌सुरू करणे हा प्रकार वाटला होता तितका सोपा नव्हता. हळूहळू‌ क्लच सोडत ऍक्सिलरेटर दाबून गाडी‌ पुढे नेणे ही एवढीशी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात महाभयंकर होती. कधी क्लच लवकर सोडला गेल्याने गाडी, असहकार पुकारत असे, तर कधी क्लच आणि ऍक्सिलरेटरचे एकमेकांशी न पटल्याने निषेधाचे आवाज काढत असे. हा निषेध ती कधी‌ उसळी‌ मारून तर कधी बंद चा नारा देऊन व्यक्त करत असे. क्लच कधी सोडायचा हे कळण्यासाठी तो सोडताना बाजूच्या आरशात गाडीची‌ थरथर कधी जाणवते वगैरे गोष्टीही आजमावून पाहिल्या. पण या बाजूच्या आरशात पाहताना मागच्या रस्त्यावरून जाणाऱ्या इतरच आकर्षक गोष्टींकडे लक्ष जात असल्याने तोही प्रयत्न फसला. शेवटी क्लच आणि ऍक्सिलरेटरमध्ये तह झाला असावा, माझी‌ गाडी वाहती‌ झाली. आमच्या शिक्षकाने या तहात मध्यस्थी केल्याचे नंतर माझ्या लक्षात आले. हा पहिला गिअर टाकल्यावर पुढचे गिअर त्यामानाने विनासायास पडले. दुसरा ते तिसरा आणि तिसरा ते दुसरा हा आडमार्गपण सवयीचा बनला.

गाडी चालवण्यापुरते आपल्याला आणखी‌ दोन हात आणि डोक्यामागे दोन डोळे मिळावेत असे वाटू लागते. रस्त्यावर वाहने, माणसं चारही बाजूंनी‌ हालचाल करत असतात. विशेषत: गाडी‌ शिकताना तर रस्त्यावरची सगळी‌ चर सृष्टी आपल्या गाडीवर चहूबाजूंनी धडकायलाच टपलेली आहे असंच वाटत असतं. डावी-उजवीकडून वळणारी गाडी, दहा फुट पलिकडे रस्त्याच्या दुभाजकावरून रस्त्यावर उतरणारा पादचारी, आपल्या डाव्या बाजूला गाडीपासून दोनचार फुट पलिकडे कठड्यावरून रस्त्यावर पाय सोडून बागेत बसल्यासारखा बसलेला माणूस या तशा निरुपद्रवी गोष्टी! पण गाडी‌ शिकताना यातली‌ कुठलीही गोष्ट heart attack ला कारणीभूत होऊ शकते. आपल्या गाडीला रस्त्यारचा एखादा खड्डा, रस्त्यावरून जाणारी दुसरी गाडी किंवा त्या गाडीतील वा गाडीवरचं माणूस, रस्त्यावरची झाडं, भिंती किंवा इतर वस्तू यांबद्दल कधी‌ प्रेम उत्पन्न होईल आणि त्यांना जबरदस्त मिठी मारावी किंवा गेला बाजार निसटतं चुंबन घ्यावं असं वाटेल त्याचा काय भरवसा.

गाडीची ही प्रेमाची आंदोलने, तिच्या स्वभावातील हिंदोळे हळूहळू परिचयाचे होऊ लागले. चाकाच्या मागे बसून बॉनेटच्या पलिकडची अंतरे, आरशातून लांब दिसणाऱ्या जवळच्या वस्तू, डावीकडची रुंदी यांचा अंदाज येऊ लागला. तशी गाडी चालवण्यातली रंगत वाढू लागली. गाडीचंही लोणच्यासारखंच आहे. लोणचं नुकतंच घातलं असेल तर त्यातल्या तिखट, आंबट, तेलकट चवी एखाद्याला जगातून उठवतात पण जसं ते मुरतं तशा याच चवी जेवणाची लज्जत वाढवतात. गाडीचे आचके, गचके नवख्याला आयुष्यातून उठवतील पण जशी त्यांच्याशी ओळख होते तसा रस्ता कधी सरतो ते कळत नाही.

अंधारातून प्रकाशाकडे?

आजच्या सप्तरंगमध्ये (२९ सप्टेंबर २०१३) उत्तम कांबळे यांचा "स्मशानातून स्मशानाकडे" ( हा लेख वाचला. त्या लेखात एका मसणजोग्याची (म्हणजे कोण ते लेखात छान दिलं आहे) वाटचाल, मसणजोगी ते सरकारी नोकरदार ते पुऩ्हा मसणजोगी अशी कशी होते ह्याचे वर्णन केले आहे. मॅट्रिक होऊन कालव्यावर राखणदार म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेल्या ह्या मसणजोग्याची पहिली बायको त्याच्याबरोबर एका ठिकाणी नांदायला तयार होत नाही. एका ठिकाणी राहून, रोजच्या एकसुरी जगण्यापेक्षा तिच्या जातीतल्या इतर बायकांप्रमाणे भीक मागून, इतर फुटकळ वस्तू विकून फिरतीचं जगणं तिला जास्त मानवतं. त्यामुळे ती ह्याच्याबरोबर नांदायला तयार न होता भांडून माहेरी निघून जाते. हे असह्य होऊन तो पुऩ्हा लग्न करतो, पण तिचीही तीच तऱ्हा. शेवटी नोकरी तशीच टाकून तो पुऩ्हा मसणजोगी होतो. लेखक या लेखाच्या शेवटी, "जर ह्या बायकांना योग्य बुद्धी झाली असती, तर अंधाराकडून प्रकाशाकडे गेल्या असत्या" अशा अर्थाचं भाष्य करतो. पूर्वीही अशाच प्रकारची एक कथा वाचलेली आठवली. आता लेखक वगैरे इतर संदर्भ आठवत नाहीत. एका गडावरच्या गुराख्याच्या मुलीचं तिच्याच जातीतल्या पण मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाशी लग्न होतं. पण तिथलं बंदिस्त जगणं असह्य होऊन ती मुलगी माहेरी परत जाते आणि बरोबर नवऱ्यालाही परत नेते. शेवट तसाच आणि शेवटचं भाष्यही तसंच. अशा कथा किंवा असे संवाद वाचले किंवा ऐकले की प्रश्न पडतो, यातला "अंधार" कुठला आणि "प्रकाश" कुठला? मी किंवा माझ्याप्रकारची अनेक माणसं ज्या प्रकारचं जगणं जगत आहेत त्याला प्रकाश आणि ह्या जगण्याशी दूरान्वयेही साम्य नसलेलं जगणं म्हणजे अंधार? या गोष्टी फक्त भाष्य करण्यापुरत्या राहिल्या असत्या तर ठीक पण पुढे अंधारातल्यांना प्रकाशात ओढून घेण्याचे प्रयत्न सुरु होतात.

अंधारातलं म्हणून म्हटलं जाणारं जगणं "अंधारातलं" का म्हणावं? तिथे कुपोषण, रोगराई, अशिक्षितपणा, अपमानास्पद वागणूक वगैरे गोष्टी आहेत म्हणून? पण मग ज्याला प्रकाशातलं जगणं म्हणावं ते तरी काय वेगळं आहे? तिथे कुपोषण असलं तर इथे मुबलक अन्न नसून ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने न घेतल्याने येणारे रोग आहेत; तिथे चाळिशीतच संपून जाणारं आयुष्य असेल तर इथे चाळिशीतच असह्य होणारं आयुष्य आहे; तिथे चार भिंतीतलं शिक्षण नाही तर इथे चार भिंतींपलिकडच्या शिक्षणाची कमतरता आहे. शेवटी माणूस म्हणल्यावर त्यात काही उणं काही अधिक असणारच. षड्रिपुंमुळे निर्माण होणारी दु:ख माणूस आहे तिथे सगळीकडे आहेतच. जोपर्यंत ते जगणं आनंदात, समाधानात जगता येतं आहे, किंवा जिथे आनंदात, समाधानात जगता येत नाही तिथे तो आनंद, समाधान मिळवण्याचे मार्ग खुले आहेत किंवा त्यांचा शोध घ्यायला बंदी नाही, तोपर्यंत ते जगणं कुठल्याही पद्धतीचं का असेना पण ज्याचं त्याला रुचणारं आहे. अशा जगण्याला "अंधार" किंवा "प्रकाश" अशी लेबलं का लावावीत? याचा अर्थ एखाद्याला त्याची जगण्याची पद्धती बदलायला मज्जाव आहे असं नव्हे. तशी इच्छा झाल्यास जरूर बदल करावा, तसं‌ करूनच ज्याचं त्याचं भलं ज्याला त्याला ठरवता येईल.

मला एकदा हरिश्चंद्रगड चढताना, एक म्हातारा भेटला. हातात लाकडाच्या मोळ्या, मूळ पांढरा रंग शोधून मिळणार नाही असे मातीनी तांबडे झालेले कपडे, तोंडातले दात किडलेले किंवा पडलेले, चेहऱ्यावर, हातापायावर जन्मभर मोजून पुरे पडाव्यात इतक्या सुरकुत्या, बरोबर तशीच बायको. बोलताना मी विचारलं, "गडावर कशाला गेला होता?". तो हसत म्हणाला, "गडावरची मजा बघायला". पावसाचे दिवस होते. आम्हीही तशीच मजा पहायला पुण्याहून कित्येक तासांचा प्रवास करून आलो होतो. ते उत्तर देताना त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला त्याचा हेवा वाटला, माझं "प्रकाशाचं" जगणं सोडून त्या म्हाताऱ्याच्या "अंधाऱ्या" जगण्यात प्रवेश करावा असा मोह क्षणभर मला झाला. मी तसं केलं असतं तर आणखी एका लेखकाला "प्रकाशाकडून अंधाराकडे" असा लेख लिहिता आला असता.

Wednesday, September 26, 2012

विलेक्शन


आमची कामवाली हातात एक खोकं घेऊन धापा टाकत आली.
"काय गं, कुठे होतीस? आणि हे हातात काय?" - मी, उशीर झाल्याचा वैताग शब्दांबरोबर बाहेर पडला.
"अहो बाई, तिकडे साबळेची माणसं काचेचे बाऊल वाटताहेत. अख्खी वस्ती लोटलीये. फुकटचं कोण सोडनार, रांगेत लागले म्हणून थोडा उशीर झाला." - तिच्या चेहऱ्यावरून आनंद उतू जात होता.
"कशाबद्दल बाऊल वाटतायत?" - मला पुसटशी शंका आली, पण खात्री‌ करावी म्हणून विचारलं.
"अजून रथसप्तमी व्हायची आहे,  हे संक्रांतीचं वाण म्हणून असंल!" - इतकं कसं माहित नाही यांना, अशा थाटात तिनं मला माहिती पुरवली. हल्ली पुरुष पण हळदीकुंकवं करून वाणं लुटतात हे माहित नव्हतं मला.
"दर वर्षी‌ लुटतात का असं?" - मी आणखी विचारलं.
"आता कॉर्पोरेसनचं विलेक्शन नाही का फुडच्या महिन्यात? म्हणून साबळे. पण दर साल, दोन साली कुठलं तरी विलेक्शन असतंच मग, दर साली ज्याचं विलेक्शन तो लुटतोच." - तिनं माझ्या ज्ञानात भर टाकली. "परवा तर स्टीलच्या ताटल्या वाटल्या कासकरच्या माणसांनी, एकीला एकच देत होते, पण मी सहा आणल्या, घरात सहा खाणारी तोंडं त्यांना सहा नकोत का?"
"कुठून येतात एवढे पैसे यांच्याकडे", मी हजारोंच्या संख्येनं मला काय लुटता येईल याचा विचार करत होते.
"जिंकले की बक्कळ कमवतात की! त्यासाठी आत्ता वाटाय काय झालंय? एवढ्याचं काय त्या कागलानं इथल्या वस्तीतल्या लोकांना काशीयात्रेला नेलं व्हतं तेचा इचार करा. त्यानं तर शंभर पानी पुस्तकबी काडलंय, सगळे फोटो, त्यानं कुणाकुणाला यात्र घडवली, काय काय वाटलं तेचे. आख्या वार्डात हजारोंनी वाटली असतील तसली पुस्तकं!"
"अगं, पण नगरसेवक झाला किंवा अगदी महापौर झाला, एवढं मानधन किंवा पगार थोडीच असतोय" - मी आणखी भाबडेपणाचा आव आणला.
"आता कसं सांगायचं तुम्हाला", माझं सारं अज्ञान पुसायचं‌ ठरवल्यासारखं ती म्हणाली, "ते इथे एवढे रस्ते काय उगीच केले, दिसली कुठलीबी‌ टाचकी गल्ली की‌ ओत डांबर, आमच्या घरापुढचा रस्ता तर आता उंबऱ्याच्या पार वर गेलाय. वरती आन् पाट्या बसवल्या, बाकं, बागा पैसा काय नुसता वाहत येतो."
"हं, म्हणूनच दर पावसाला रस्त्यात डबकी साचतात, की‌ पुऩ्हा नवा थर", मी खोचकपणे बोलले, "पाहिलंस ना आमच्या इथल्या ओढ्याची काय वाट लावली आहे. चॅनेलिंग केलं होतं ती सगळी‌ स्लॅब मागच्या पावसात वाहून गेली, त्यावर दिवसन् रात्र जोरदार आवाज करत पूल बांधला, झोपेचं‌ खोबरं. त्या पुलाच्या कामात उरलेलं चॅनेलिंग गेलं. आता वरच्या वस्तीवरून सगळा कचरा येतो, तो इथे साचतो, डासांचं फावतं, . . . "
"मग तक्रार का नाही करत, नगरसेवकाकडे?" - मला थांबवत ती म्हणाली, "माझ्या घरात पावसाचं पाणी‌ आलं होतं, सगळ्य़ा घरात पाणी, मी लगेच फोन केला त्याला, आला होता पाणी‌ काढायला."
"तक्रार कसली, त्या नगरसेविकेला सांगितलं, तर बया पाठ फिरवून निघून गेली तिथून. आणि काय गं तुझ्या घरातलं पाणी काढायला नगरसेवक कशाला लागतो तुला? तुम्हाला नाही काढता येत?"
फार न बोलता तिनं भांड्यांत हात घातले, मी माझं आवरायला निघाले. आमची कामं करायला थोडाच नगरसेवक येणार होता.

Saturday, March 10, 2012

मदत


मी खुर्चीत बसलो होतो. माझी नऊ महिन्यांची मुलगी सरकत त्या खुर्चीपाशी आली. तिला माझ्या मांडीवर बसायचे असावे असे दिसत होते. खुर्चीच्या खालच्या एका फळीला धरून तिने उभे राहण्याचा प्रयत्न केला. तिचे पाय फरशीवरून घसरले, आणि पुरेसा जोर न देता आल्याने ती‌ घसरून पडली. तिने पुऩ्हा प्रयत्न केला, ती‌ पुऩ्हा पडली. आपल्याला उभे राहणे जमत नसल्याचे दिसताच, तिने माझ्याकडे पहात रडायला सुरुवात केली. मला तिला उचलून घेता येणे सहज शक्य होते, पण मग तिने तिचे प्रयत्न सोडले असते. मला तिचे प्रयत्न करणे थांबवायचे नव्हते, स्वत:च्या प्रयत्नाने ती माझ्या मांडीवर चढलेली मला जास्त आवडले असते. मी तिच्याकडे पाहून तिला पुऩ्हा प्रयत्न करण्यासाठी सुचवू लागलो. मी तिला का उचलून घेत नाही हे कदाचित तिला कळले नसावे. तिने माझ्याकडे निराश होऊन पाहिले आणि दुसऱ्या खेळण्याकडे वळली.

देवा, तूही असाच वागतोस का रे?

Saturday, January 21, 2012

पुणे मनपा निवडणूक २०१२

आमची कामवाली हातात एक खोकं घेऊन धापा टाकत आली.
"काय गं, कुठे होतीस? आणि हे हातात काय?" - मी, उशीर झाल्याचा वैताग शब्दांबरोबर बाहेर पडला.
"अहो बाई, तिकडे साबळेची माणसं काचेचे बाऊल वाटताहेत. अख्खी वस्ती लोटलीये. फुकटचं कोण सोडनार, रांगेत लागले म्हणून थोडा उशीर झाला." - तिच्या चेहऱ्यावरून आनंद उतू जात होता.
"कशाबद्दल बाऊल वाटतायत?" - मला पुसटशी शंका आली, पण खात्री‌ करावी म्हणून विचारलं.
"अजून रथसप्तमी व्हायची आहे,  हे संक्रांतीचं वाण म्हणून असंल!" - इतकं कसं माहित नाही यांना, अशा थाटात तिनं मला माहिती पुरवली. हल्ली पुरुष पण हळदीकुंकवं करून वाणं लुटतात हे माहित नव्हतं मला.
"दर वर्षी‌ लुटतात का असं?" - मी आणखी विचारलं.
"आता कॉर्पोरेसनचं विलेक्शन नाही का फुडच्या महिन्यात? म्हणून वाबळे. पण दर साल, दोन साली कुठलं तरी विलेक्शन असतंच मग, दर साली ज्याचं विलेक्शन तो लुटतोच." - तिनं माझ्या ज्ञानात भर टाकली. "परवा तर स्टीलच्या ताटल्या वाटल्या कासकरच्या माणसांनी, एकीला एकच देत होते, पण मी सहा आणल्या, घरात सहा खाणारी तोंडं त्यांना सहा नकोत का?"
"कुठून येतात एवढे पैसे यांच्याकडे", मी हजारोंच्या संख्येनं मला काय लुटता येईल याचा विचार करत होते.
"जिंकले की बक्कळ कमवतात की! त्यासाठी आत्ता वाटाय काय झालंय? एवढ्याचं काय त्या कागलानं इथल्या वस्तीतल्या लोकांना काशीयात्रेला नेलं व्हतं तेचा इचार करा. त्यानं तर शंभर पानी पुस्तकबी काडलंय, सगळे फोटो, त्यानं कुणाकुणाला यात्र घडवली, काय काय वाटलं तेचे. आख्या वार्डात हजारोंनी वाटली असतील तसली पुस्तकं!"
"अगं, पण नगरसेवक झाला किंवा अगदी महापौर झाला, एवढं मानधन किंवा पगार थोडीच असतोय" - मी आणखी भाबडेपणाचा आव आणला.
"आता कसं सांगायचं तुम्हाला", माझं सारं अज्ञान पुसायचं‌ ठरवल्यासारखं ती म्हणाली, "ते इथे एवढे रस्ते काय उगीच केले, दिसली कुठलीबी‌ टाचकी गल्ली की‌ ओत डांबर, आमच्या घरापुढचा रस्ता तर आता उंबऱ्याच्या पार वर गेलाय. वरती आन् पाट्या बसवल्या, बाकं, बागा पैसा काय नुसता वाहत येतो."
"हं, म्हणूनच दर पावसाला रस्त्यात डबकी साचतात, की‌ पुऩ्हा नवा थर", मी खोचकपणे बोलले, "पाहिलंस ना आमच्या इथल्या ओढ्याची काय वाट लावली आहे. चॅनेलिंग केलं होतं ती सगळी‌ स्लॅब मागच्या पावसात वाहून गेली, त्यावर दिवसन् रात्र जोरदार आवाज करत पूल बांधला, झोपेचं‌ खोबरं. त्या पुलाच्या कामात उरलेलं चॅनेलिंग गेलं. आता वरच्या वस्तीवरून सगळा कचरा येतो, तो इथे साचतो, डासांचं फावतं, . . . "
"मग तक्रार का नाही करत, नगरसेवकाकडे?" - मला थांबवत ती म्हणाली, "माझ्या घरात पावसाचं पाणी‌ आलं होतं, सगळ्य़ा घरात पाणी, मी लगेच फोन केला त्याला, आला होता पाणी‌ काढायला."
"तक्रार कसली, त्या नगरसेविकेला सांगितलं, तर बया पाठ फिरवून निघून गेली तिथून. आणि काय गं तुझ्या घरातलं पाणी काढायला नगरसेवक कशाला लागतो तुला? तुम्हाला नाही काढता येत?"
फार न बोलता तिनं भांड्यांत हात घातले, मी माझं आवरायला निघाले. आमची कामं करायला थोडाच नगरसेवक येणार होता.

Thursday, December 29, 2011

जपानवारी

तळलेल्या बटाट्याच्या फोडी, मेयोनिज, उकडलेलं अर्धं अव्होकॅडो आणि त्यावर चीजमधे टोमॅटोचे तुकडे असं खायला मिळाल्यावर जो आनंद झाला तो काय  वर्णावा. सोया सॉस, नुडल्स, तोफू, असं खाऊन अळणी झालेल्या तोंडात जरा चविष्ट काहीतरी‌ पडेल या अपेक्षेनं, रात्री नऊ वाजता 'दो दिवाने टोकियो शहर में' Subway शोधत निघालो होतो. Subway मधे तरी‌ निदान वेगळे सॉस, ब्रेड आणि बऱ्याच भाज्या असं काही मिळेल अशा अपेक्षेनं गिंझामधे हिंडत होतो. त्या गल्ल्यांमध्ये हिंडता हिंडता नऊचे अकरा वाजले, पायाची चाळण व्हायची‌ वेळ आली तरी‌ Subway काही‌ सापडलं नाही. शेवटी, कावळे ओरडून ओरडून थकले, आजूबाजूची दुकानं बंद होत आली. निदान Ice-cream मिळेल या आशेनं हॉटेलकडे परत निघालो. हॉटेलच्या जवळच Denny's Diner नावाचं restaurant दिसलं आणि आत शिरलो. वेटरने menu card दिलं. त्यात प्रत्येक पदार्थाबरोबर त्याचं छायाचित्रही दिलं होतं. जपानमध्ये menu card मध्ये पदार्थांची चित्रंही असतात, एवढंच नव्हे तर काही restaurants मध्ये तर दर्शनी भागात तिथे मिळणाऱ्या पदार्थांचं प्रदर्शन मांडलेलं असतं. परदेशी गिऱ्हाईकांची सोय हे लोक अशीही पाहत असावेत. आम्ही त्या चित्रांमध्ये, (कारण काय लिहिलंय हे वाचता येत नव्हतं) काही शाकाहारी दिसतंय का याचा अंदाज लावू लागलो. जरा शाकाहारी वाटणाऱ्या पदार्थांवर बोट ठेवून वेटरकडून ते शाकाहारी असल्याची खात्री करून घेत होतो. जपानमध्ये नुसतं non-vegetarian असं सांगून चालत नाही, "No meat, No fish" असं बरेच हातवारे करत सांगावं लागतं. ज्याला सांगतो आहोत त्याला ते कळलं तर ठीक, नाहीतर तो दुसऱ्याला बोलावतो, मग त्याला पुऩ्हा सगळे हातवारे वगैरे चालू. या सगळ्या प्रकारात तो नुसतं meat, fish ऐकून meat, fish असलेलेच पदार्थ पुढे करण्याची शक्यता असते, त्याकडे लक्ष द्यावं लागतं. हे सगळे सोपस्कार झाल्यावर, एका वेटरने आम्हाला menu card मधल्या प्रत्येक पानावर एकतरी शाकाहारी पदार्थ दाखवल्यावर मला त्या वेटरमध्ये ब्रह्म दिसल्याचा साक्षात्कार झाला. त्या पदार्थांच्या दर्शनाने पोटातले कावळे जागे होऊन ओरडू लागल्याने, या निर्वाणाची आयती संधी मात्र हुकली. एरवी ज्या बटाट्यांसाठी भारतात एखादी नोटसुद्धा मी टिकवली नसती त्यांच्यासाठी काहीशे येन (म्हणजेही एक नोटच, हा भाग अलाहिदा) मोजून, तृप्त होऊन आम्ही बाहेर पडलो.

इथले वेटर काय, दुकानातले विक्रेते काय ही लोकं कमालीची अगत्यशील आणि नम्र आहेत. कुठल्याही हॉटेलात, दुकानात शिरलं की जिथे असतील तिथून ते आपल्याला स्वागतपर शब्द ऐकवतील, अगत्याने स्वागत करतील, योग्य ती विचारपूस करतील आणि गिऱ्हाईकाचं समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. "ग्राहकाचे समाधान हेच आमचे ब्रीद" वगैरे काही पाट्या लावायची गरजच नाही. हे विक्रेते त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मितातच अशा पाट्या घेऊन वावरत असतात. जपान्यांना याचं काही विशेष वाटत नसलं तरी माझ्यासारख्या पुणेकरासाठी ते आठवं आश्चर्यच. हे दुष्प्राप्य सुख मिळवायला कुठल्याही हॉटेलमध्ये शिरून No meat, No fish चा दशावतारी रंगवायची माझी तयारी आहे. Subway शोधायचा एक प्रयत्न असफल ठरल्यावर, मी पुऩ्हा प्रयत्न करायचं ठरवलं. मी राहत असलेल्या हॉटेलच्या स्वागतकक्षात जाऊन जवळचं Subway कुठे आहे, हे विचारलं. त्या पोरानं मला ते रस्त्याच्या पलिकडेच असल्याचं सांगितलं. "आपण काल एवढी तंगडतोड उगाचच केली का?" असा प्रश्न मनात ठेवून मी धावतच रस्ता ओलांडला, पण तिथे Subway च काय पण त्यातला 'S' सुद्धा दिसला नाही. मी तणतणतच परत आलो, आणि पुऩ्हा विचारलं. तो पोरगा कमालीचा गोंधळला, तो पुऩ्हा पुऩ्हा मला Subway तिथेच आहे हे सांगू लागला. बराच वेळ अशा गोंधळात गेल्यावर एकदम डोक्यात पडलेला प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. मला Subway restaurant हवं होतं आणि हा पठ्ठ्या मला Subway चं ‌station दाखवत होता. जपानमध्ये ही Subway ची stations जागोजागी आहेत. मग त्याने मला जवळच्या Subway चा पत्ता सांगायला सुरुवात केली. त्याचं बोलणं मला समजत नव्हतं, माझं त्याला, पण तरीही तो पोरगा इरेला पेटला होता. त्याने मी भारतीय असल्याचं पाहून एका हिंदी बोलणाऱ्या पोरीला बोलावलं. तिचं जपानी हिंदी, माझं मराठी हिंदी अशी जुगलबंदी काही काळ रंगल्यावर मला Subway चा पत्ता कळला. ते आणि मी सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

Pasmo card घेऊन टोकियोत फिरण्याइतकं सुख नाही. दर दोनचार मिनटाला सुटणाऱ्या subway trains मुळे जवळजवळ कुठे थांबावं लागतच नाही. Subway च्या जाळ्य़ांचा नकाशा हातात असला की टोकियोत कुठेही बिनधास्त फिरा. जमिनीखाली पसरलेल्या अवाढव्य वारुळाची तोंडं जमिनीवर जिकडेतिकडे फुटावीत तशी Subway stations ची तोंडं जिकडेतिकडे जवळच्या पदपथांवर फुटतात आणि त्यांतून जपानी माणसं मुंग्यांसारखी तुरुतुरु धावत असतात. या Subways मध्ये जिकडेतिकडे English पाट्या आहेत म्हणून बरं नाही तर जपानी लोकांचं English शी फारसं सख्य नाही, त्यात उच्चारांमधले फरक. एखाद्या जपानी माणसाला नुसतं बघून त्याला English येत असेल का नाही‌ हा अंदाजच बांधता येत नाही. चांगला शिकला सवरलेला, सुटबुटातला जपानी English च्या बाबतीत ठार अडाणी‌ असू शकतो. "Where is Yoyogi park?", मी एका माणसाला विचारलं. त्यानी आधीच बारीक असलेले डोळे अधिकच बारीक करून, कपाळावरच्या आठ्यांच्या जाळ्यातनं हात फिरवून विचार केला, आणि भयंकर खिन्न होऊन त्याने आपल्याला प्रश्न कळला नाही असे हातवारे केले. एका परदेशी माणसाला आपल्याला मदत करता येत नाही ह्याचं त्याला भयंकर दु:ख झालं असावं. एकूणच, समोरच्या माणसाला गरज असेल, आणि मदत करता आली नाही तर हे लोक भयंकर हळहळतात. टोकियोच्या दाट इमारतींमध्ये ठिकठिकाणी सुंदर बागा आहेत. Yoyogi park ही अशीच एक बाग (खरं तर उपवन), सम्राट मेजी आणि त्याच्या राणीच्या सन्मानार्थ उभारलेलं. ह्या सगळ्या बागांंमध्ये एखादं तळं, तळ्यात कासवं, मासे, भरपूर झाडं आणि या सगळ्याचा नीट आस्वाद घेता यावा म्हणून तयार केलेल्या सुबक मार्गिका, बसायला बाकं आहेत. आपण जगातल्या सर्वात गजबजलेल्या शहरात आहोत याचा पूर्ण विसर पडून मन ताजंतवानं करण्याची जादू या बागांंमध्ये भरलेली आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी असलेली भव्य आणि कमालीची स्वच्छ असलेली देवळंही प्रेक्षणीय आहेत. दिवसभर काम करून संध्याकाळी‌ अशा एखाद्या बागेत किंवा देवळात जावं, सगळा शीण निघून जातो.

टोकियोतला आठवडाभराचा मुक्काम संपवून, मी हानेडा विमानतळावर पोचलो, आणि सिंगापूरमार्गे मुंबईत पोचलो. पाय मुंबईत उतरले तरी मन अजूनही जपान, सिंगापूरमध्येच गुंतलं होतं. Fragile असा शिक्का असलेलं माझं सामान उलट्यापालट्या अवस्थेत मला मिळालं, एअरपोर्टच्या बाहेर पार्कींगवाला पोऱ्या ड्रायव्हरवर खेकसला, ‌चेंबूरच्या Subway मध्ये 'आत्ता फक्त चहा, कोकोच मिळेल, कॉफी मिळणार नाही, चीझ संपलं आहे' वगैरे उद्धट आवाजात ऐकलं. जपान, सिंगापूरमध्ये रमलेलं माझं मन क्षणात मुंबईत आलं, आणि माझ्या जपानवारीची भारतीय सांगता झाली.

Friday, September 02, 2011

मज तुझी आठवण येते

एखाद्या दिवशी उठल्यावर कुठलं गाणं आठवावं याला काही नियम आहे का? आज मला 'भय इथले संपत नाही' आठवलं.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी‌ गातो, तू मला शिकवलेली गीते

त्याच्या पहिल्या कडव्याच्या शेवटच्या ओळी आहेत,
झाडाशी बसलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया|

मला या सगळ्या ओळी‌ कुठे तरी Bible शी संबंधीत आहेत असं वाटलं.' तू मला शिकवलेली गीते', मधल्या गीते या शब्दावरून Psalms आठवलं, आणि मग Boney M चं

By the rivers of Babylon, there we sat down
ye-eah we wept, when we remembered Zion.
When the wicked
Carried us away in captivity
Required from us a song
Now how shall we sing the lord's song in a strange land (Psalms 137)
कोणाला या दोन गाण्यांमध्ये साम्य वाटेल काहींना नाही, दिवसाची सुरुवात तर चांगली झाली. :)