Sunday, September 28, 2025

गवसले ते हरवले

 थंडी वाजली म्हणून सवयीने दोन पांघरुणे एकाला एक जोडून अंगावर घेतली. आतल्या गोधडीचा मऊपणा अंगाला जाणवला. एकदम लहानपण आठवलं. थंडीचा उबदारपणा आपल्याला पहिल्यांदा कधी जाणवला? ते आता स्मृतीच्या पानांमध्ये हरवून गेले आहे. पण, थंडीत पहाटे सायकलवरून शाळेत जाताना घातलेल्या स्वेटरची, हातमोज्यांची, रात्री अंगावर पांघरलेल्या दुलईची ऊब अजून आठवते आहे. गुलाबी थंडी अंगावर पांघरल्यावरचे सुखावणे अजून आठवते आहे. पण आताशा ते जाणवते कमी! ते सुख कुठेतरी हरवले आहे.  शिशिरातली थंडी अंगाभोवतीच फिरते आहे पण तिचा ऊबदारपणा मनापर्यंत पोहोचतच नाहीये, मधेच कुठेतरी लुप्त होतो आहे सरस्वतीसारखा! हे मला चार दोन वर्षांपूर्वी जाणवायला सुरुवात झाली. त्याआधी तो मनापर्यंत कधी पोहोचला होता हे आठवतच नव्हतं. त्यानंतर आज पुऩ्हा थंडीचा ऊबदार मऊ स्पर्श जाणवला. मन सुखावले. हरवलेले काहीतरी‌ पुऩ्हा गवसले. कशामुळे? म्हणजे लहानाचे मोठे होताना आणखी काहीतरी हरवले आहे. काय आणि कसे?

Monday, July 14, 2025

एक हायकू गुलाबासाठी


कधीतरी अचानक

बागेला आनंद होतो

मग फुलदाण्याही फुलतात बिचाऱ्या 

पावसाळ्यात जरा ऊन पडलं की फुलं उमलतात. मग फुलदाण्यांनापण ताजी फुले मिळतात. ते पाहून सुचलेली ही हायकू! AI ला सांगितलं तर ते लिहून देईल पण कल्पना सुचणं त्याच्या नशीबात नाही. फुलदाण्यांसारखंच तेही बिचारं!

Friday, May 09, 2025

हे घे

गीतरामायणात "दशरथा,  घे हे पायसदान" असे शब्द असलेले एक गाणे आहे.  ते गाणे हमखास अंताक्षरीत ' द' चे गाणे म्हणून गायले जाई आणि त्यातील शब्दांचा क्रम "घे हे" असा आहे का "हे घे" असा आहे याबद्दल हमखास वाद होई. पायसदानासाठी "हे" हे सर्वना गीतरामायणात "दशरथा,  घे हे पायसदान" असे शब्द असलेले एक गाणे आहे.  ते गाणे हमखास अंताक्षरीत ' द' चे गाणे म्हणून गायले जाई आणि त्यातील शब्दांचा क्रम "घे हे" असा आहे का "हे घे" असा आहे याबद्दल हमखास वाद होई. पायसदानासाठी "हे" हे सर्वनाम आहे का पायसदान देण्याच्या क्रियेसाठी यावरून त्याचा क्रम निश्चित करणे वगैरे वाद होऊन खेळणाऱ्या लोकांच्या वादपटुत्त्वावर ते गाणे घ्यायचे की नाही ते ठरे. या लेखाच्या शीर्षकाचा संबंध खेळाशी आहे पण अंताक्षरीशी नाही आणि गीतरामायणातील गाण्याशी नाही पण अर्थाशी मात्र आहे.

सदर खेळाचा शोध २० एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुपीक वेळी निव्वळ वेळ घालवणे या गरजेतून झाला. त्याअर्थी त्याचे अंताक्षरीशी जवळचे नाते आहे. हा खेळ चालता येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला खेळता येतो. यामुळे तो सर्वसमावेशक (inclusive) आणि वैश्विक आहे परंतु कोकणातली सुपारीची, काजूची बाग ही त्याची जन्मभूमी असल्याने त्याचे नाते कोकणाशी आणि तेथील लाल मातीशी घट्ट बांधले आहे. या खेळाची सुरुवात बागेत चक्कर मारण्यापासून होते. चक्कर मारतामारत बागेत पडलेल्या सुपाऱ्या, काजूच्या बिया, काहीच नाही‌ तर जमिनीतून वर आलेले कंद वेचावेत. ओंजळी आणि खिसे भरले किंवा कंटाळा आला की ते एकमेकांकडे "हे घे" असा उच्चारव करीत फेकावेत. ज्या व्यक्तीला उद्देशून ती हाळी‌ असेल त्याला हवेतून भिरभिरत येणाऱ्या त्या वस्तूच्या आवाजानेच ती हाळी आपल्यासाठी आहे हे कळते. व्याकरणाच्या नियमांचा विचार करण्याइतका वेळच मिळत नाही. तो करण्यात वेळ घालवल्यास कपाळमोक्ष होऊन "संप्राप्ते संनिहिते काले . . . " या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय येतो. त्यादृष्टीने हा खेळ अध्यात्मिकही आहे. हातातील फेकण्यायोग्य किंवा झेलण्यायोग्य वस्तू संपल्या तर त्या पुऩ्हा गोळा करण्यासाठी बागेत हिंडावे. हा खेळ कितीही काळ चालतो. पोटातील कावळे ओरडू लागले किंवा हातपाय बोलू लागले की आपल्याकडे गरगरत येणाऱ्या वस्तू चुकवत बागेतून खेळाडू बाहेर पडू लागले की हा खेळ संपतो.

हा खेळ डोक्यापेक्षा हातपाय चालवण्याचा असल्याने आणि त्यात डोके चालवण्यापेक्षा गमावण्याची‌ भीती जास्त असल्याने या खेळाचे नाव "हे घे"‌ असावे का "घे हे"‌ असावे असा वाद अजून उत्पन्न झालेला नाही. कदाचित भविष्यातील इतिहासकार, ज्यांना डोके चालवण्यात जास्त रस असेल, ते हा वाद निर्माण करतील अथवा व्यापारी व्यापारासाठी "हे घे" आणि "घे हे"‌ असे दोन वेगवेगळे खेळही निर्माण करतील. तोवर या बिनखर्चिक बिनडोक खेळाची मजा आपण घ्यावी असा आग्रह आहे. बागेच्या मालकाने खेळासाठी मैदान उपलब्ध केल्याबद्दल त्याला कृतज्ञता म्हणून वेचलेल्या सुपाऱ्या, काजूबिया वगैरे जरूर परत द्याव्यात ही विनंती.