Saturday, January 23, 2016

मोहरीची रोपं

रमा आणि तिच्या आईने दिवाळीत किल्ला केला. किल्ल्यावर मोहरी पेरली. काही दिवसात मोहरीला फूट आली आणि किल्ल्याला हिरव्या पांघरुणाने शोभा आली, छोटी रमा हरखून गेली. दिवाळी संपली, रमानं किल्ला मोडताना मोहरीची छोटी रोपं असलेली माती एका मोठ्या कुंडीत पसरली. रमा उत्साहाने त्या रोपांना पाणी घाले, काळजी घेई. त्या रोपांचं काय करू आणि काय नको असं तिला होई. पाहता पाहता रोपं मोठी होऊ लागली.

रमाचे वडिल एका मोठ्या कंपनीत कामाला होते. ते तिला ह्या रोपांची काळजी घ्यायला मदत करत. Google वर मोहरीच्या निगराणीबद्दल वाचत, वाचलेल्या माहितीचा वापर करत. त्यांनाही ह्या रोपांनी प्रेम लावलं होतं. रमाच्या आईने मोहरी वाढलीच तर तिच्या पानांची भाजी कशी करायची हे ही पाहून ठेवलं होतं. रोजच्या रगाड्यात हा त्या तिघांचा विरंगुळ्याचा विषय बनला होता.

एका रात्री रमाचे वडिल थोडे उशीरा घरी आले. नेहमी आल्यावर ते रमाशी बोलत, चौकशी करत, मग ते तिघे एकत्र जेवत असत. पण आज काहीतरी वेगळे घडत होते. रमाच्या वडिलांचा चेहरा उतरला होता. ते रमाशी काही न बोलता, कपडे बदलून जेवणाच्या टेबलाकडे गेले. जेवताना आज नेहमीप्रमाणे बोलणं, शाळेतल्या मज्जा सांगणं वगैरे काहीच झालं नाही. रमाला हे काहीतरी वेगळं आहे असं जाणवलं. ती झोपायला गेली पण तिला झोप येई ना! तिचे डोळे मिटले होते, तरी कान आई-बाबांकडे लागले होते. बाबा आईला बढतीची संधी नाही, पगारात कपातही होईल असं काहीतरी सांगत होते. त्यांचा सूर वेगळा, थोडा काळजीचा होता. आईच्याही स्वरात काळजी ऐकू आली. विचार करता करता रमाला झोप लागली.

रविवारी सुट्टीच्या दिवशी रमा आणि तिचे बाबा नेहमीप्रमाणे मोहरीच्या रोपांकडे गेले. पाहतात तर काय काही रोपं सुकायला लागली होती. पाणी तर रोज घातलं जात होतं, मग काय झालं अचानक? रमानी रडवेल्या चेहऱ्याने बाबांकडे पाहिलं. बाबा सुकायला लागलेली रोपं मुळापासून काढून काळजीपूर्वक पाण्यात सोडत होते. “या वाढणाऱ्या रोपांना कुंडीतली माती आणि तिच्या मुरणारं पाणी पुरत नाहीये, आपण ती दुसऱ्या कुंडीत नव्या मातीत लावू, तिकडे रुजली तर छान वाढतील. इथेच राहिली तर ही रोपं मरतीलच पण जी आत्ता चांगली दिसताहेत त्यांचीही वाढ खुरटेल.”, बाबांनी रमाला समजावालं. काही दिवसांनी रमानं पाहिलं तर त्या हलवलेल्या रोपांपैकी काही रोपं छान रुजून वाढू लागली होती.


काही दिवसांनी रमाच्या बाबांनी आईला नोकरी बदलल्याचं सांगितलं. योगायोगानं रमाच्या आईनं मोहरीची भाजी केली होती. रमानं भाजी घेत बाबांना विचारलं, “जशी ती रोपं दुसरीकडे रुजली आणि वाढली, तसेच तुम्हीही नव्या नोकरीत रुजाल का हो?”. जेवणाच्या टेबलावर बऱ्याच दिवसांनी गप्पा फुलल्या होत्या!

No comments: