पुन्हा साहित्य जमवून सुरूवात झाली. मध्ये एक वर्ष गेलं होतं. त्यामुळे आठवणी अंधुक झाल्या होत्या. कणीक मळताना पाणी किती घालायचं? कणीक थलथलीत भिजवायची का घट्ट भिजवायची? चिरोटे किती पातळ लाटायचे? ते कितपत गरम तेलावर तळायचे? वगैरे प्रश्न पुऩ्हा पडले. एक गोष्टीबाबत मात्र बिलकुल शंका आली नाही ती म्हणजे साटं कसं करायचं आणि किती लावायचं. वेगवेगळ्या रंगाच्या अकरा पोळ्या एकावर एक ठेवून चिरोटे करावेत असा बेत केला.
चिरोट्यांच्या लाट्या लाटून तेलात सोडायला सुरूवात केली. पहिला चिरोटा तेलात टम्म फुगला. दुसरा फुगला. तिसरा सोडला आणि त्याचे सगळे पदर एक एक करून तेलात स्वतंत्र पोहायला लागले. प्रेयसीला तिच्यासाठी घेतलेला गुलाब गुडघ्यांवर वगैरे बसून देताना त्याच्या पाकळ्या विलग झाल्यावर जे दु:ख प्रियकराला होईल तेच दु:ख मला झाले. एखादेवेळेस असं होतं अशी समजूत काढून मी पुढची लाटी तेलात मोठ्या आशेने सोडली. पण हातातली सत्ता गेली की आघाडीतले पक्ष जसे वेगवेगळा घरोबा करतात त्याप्रमाणे याही चिरोट्याचे पदर सुटे सुटे होऊन तरंगू लागले. त्याच्या पुढच्याची पण तीच कथा! पुढच्या लाटीकडे पाहताना मला या बंडामागची बारभाई लक्षात आली. भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात त्यातली गत. मी उत्साहात दोन पोळ्यांमध्ये साटं थोडं जास्तच लावलं होतं. त्यामुळे कितीही लाटलं तरी तरी हे अकरा पदर एकमेकांत गुंतत नव्हते आणि तळताना साटं वितळून गेलं की सुटे होत होते. मला पराभव दिसू लागला, चेष्टा कानावर ऐकू येऊ लागली, चेष्टेखोर हास्य ऐकू आलं , चिरोट्यांविना फराळाचं ताट दिसू लागलं. ही नामुष्की सहन करण्यापेक्षा हे समोरचं तेल मला पोटात घेईल तर बरं असा विचारही मनात आला.
स्वयंपाकात पदार्थ व्यवस्थित करण्यापेक्षा बिघडलेला पदार्थाचा चांगला वापर करणे मला जास्त चांगले जमते. मी केलेल्या नारळाच्या वड्या पहिल्यांदा कधीच व्यवस्थित होत नाहीत. एकतर त्या थापलेल्या सारणात सुरीच काय पण कुठलंच धारदार हत्यार आत शिरत नाही किंवा सुरी कितीही फिरवली तरी ते पुन्हा एकत्र येतं. मग त्याला जरा दुध, खवा असा ’मस्का’ मारला की वड्या पडतात. शिरा केला तर गच्च गोळा तरी व्हायला लागतो किंवा त्याची लापशी तरी होते. ते सुधारावं लागतं. त्यामुळे या फसलेल्या प्रयोगाचं काय करता येईल असा विचार सुरू केला. साधे चिरोटे करावेत असं ठरवलं. साध्या चिरोट्यांमधे साटं पदरांना समांतर असल्याने ते वेगळे सुटण्याची शक्यता नव्हती. पण अकरा पोळ्यांच्या त्या लाट्या लाटताना सगळा पोळपाट भरून गेला. ती पोळी (चिरोटा म्हणणं मला जड जात होतं) तळून छोट्याशा तळणीची परीक्षा पाहण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून ती पोळी मधे कापून तो चिरोटा तळला. तीन रंग होतेच, त्यात त्याला गांधी टोपीचा आकार आला होता. ऐन निवडणूकीच्या काळात फराळाच्या ताटात तो ’राष्ट्रवादी’ चिरोटा विराजमान झाला. गुलाब नाही तर गांधी टोपी तरी!


साटा चिरोट्याची ही कहाणी टोपी चिरोटी सुफळ संपूर्ण.
टीप: हे वाचूनही ज्यांना चिरोट्यांच्या वाट्याला जायचे आहे त्यांनी इथे टिचकी मारा.