Sunday, December 13, 2009

पक्षी

आमच्या घरच्या आवारात पक्षांची वर्दळ असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक पक्षी घराच्या आजूबाजूला भेट देऊन जातात. पांढऱ्या पोटाचा आणि लांब चोचीचा खंड्या, हिरव्या पायांचा, बगळा आणि बदकाच्या मधला वंचक, पिवळ्या पोटाचा आणि धोबी कपडे बडवतो तशी आपली शेपटी आपटणारा धोबी, पोपटासारखा पण आकाराने चिमणीएवढा वेडा राघू, पिवळ्या, करड्या पायांचे बगळे, सोनेरी पंखांचा भारद्वाज, असंख्य प्रकारचे, रंगांचे, आकाराचे फुलचुखे, उंच आकाशात उडणाऱ्या आणि तेवढ्याच उंच नारळावर असलेल्या त्यांच्या घरात राहणाऱ्या घारी, डोक्यावर तुरे असलेले, काही चेहऱ्यावर केशरी साज असलेले, काही लाल बुडाचे बुलबुल, शेपटीला मधे फाक असलेले काळ्या रंगाचे कोतवाल, काळा, पांढरा गोड गळा असलेला दयाळ, शेपटीचा छोटासा पिसारा फुलवून नाचणारे नाचण, निळ्या, करड्या चिमण्या, कावळे, पोपट, कोकिळ असे अनेक पक्षी आवारात विहरत असतात. दिवसभर बागेत करमणूक चालू असते.

सकाळी खिडकीच्या पडद्यावर समोरच्या ओढ्याच्या पटावर खंड्या, धोबी आणि वंचक हे नेहमीचे कलाकार आपली कला सादर करून जातात. हा दोन अंकी खेळ उष:पानाची लज्जत वाढवतो. अगदी पहाटे खंड्याची शिट्टी ऐकू येते आणि पडदा उघडतो. समोरच्या गंज लावलेल्या (galvanized) कुंपणावर, त्याच रंगाचे पंख असलेला खंड्या बसलेला दिसतो. नजर एकटक ओढ्यावर लावून बिलकुल हालचाल न करता स्वारी पाण्यातील हालचालीचा वेध घेत असते. भक्ष्य टप्यात आले की क्षणात आपले मोरपंखी निळे रुबाबदार पंख पसरून झेप घेत पाण्यातले सावज चोचीत पकडून पुन्हा उलटून कुंपणावर येईपर्यंत आपल्याला कळतही नाही. ते खाणे गट्टम करून पुन्हा समाधी लागलेली. मधल्या वेळात बराच वेळ सावज दिसले नाही तर चोच साफ करणे, आळस देणे वगैरे कार्यक्रमही चालतात. जसजशी उन्हं चढतील तसा डावीकडे सरकत सरकत खंड्या डाव्या विंगेतून दृष्टीआडा होतो. एव्हाना डावीकडूनच उजवीकडे, एक एक करत, तीन चार वंचकांचं पटावर आगमन झालेलं असतं. हा पक्षी बगळा आणि बदक यांचं मिश्रण आहे. बहुतेक शरीर बगळ्यासारखं आणि पिसं आणि रंग मात्र करड्या बदकासारखं असं असल्यामुळे त्याला ’वंचक’ (वंचना करणारा) म्हणत असावेत. खंड्या एकटा येतो पण वंचक मात्र थव्यानी येतात. खंड्याचा धीर त्याच्यात नसतो पण दोघांचं सावज एकच असतं. त्यांच्या शिकारीच्या लकबी आणि हालचालींमध्ये मांजरांचा भास होतो. मांजरांप्रमाणे ते एकमेकांशी खेळतात, गुरकावतात, पावित्रे घेतात. पुरेसं खाद्य मिळालं की पंख पसरून, पिंगट करड्या पंखांखालच्या पांढऱ्या शुभ्र अंगाचं दर्शन देत डावीकडच्या विंगेत उडून जातात. हे चालू असताना मधेच पोट आणि कंबरेचा भाग पिवळा, आणि काळे, पिंगट करडे पंख असलेल्या छोट्या धोब्याकडे लक्ष जातं. हा पक्षी कधी येतो आणी कधी जातो कळत नाही. पण लग्नाच्या लगबगीत छोटी पोरं जशी मधेमधे नाचत असतात तसा हा ओढ्याच्या काठावर बागडत असतो. मधेच आपले बुड धोब्यानं कपडे आपटावे तसे वर खाली हलवत असतो. ओढ्याला पाणी जास्त असेल तेव्हा हे नाटक जरा जास्त वेळ चालते. व्यासपीठ रिकामे झाले की दिवसाचे भान येते आणि मी कामाच्या रगाड्यात बुडून जातो.

समोरच्या ओढ्यात हे नाटक, तर वरती नारळांच्या आधाराने शिवाशिवीचा खेळ रंगतो. नारळांcया उंच झाडांवर घारींची घरटी असतात. त्यांवर लक्ष ठेवून आकाशात घिरट्या मारत घारी‌ भक्ष्य हेरतात. भक्ष्य टप्यात दिसले की‌ झडप घालून त्या ते खाण्यासाठी आडोसा शोधू लागतात किंवा घरट्य़ाकडे जाऊ लागतात. नेमके तेव्हा धूर्त कावळे, त्यांचा पाठलाग करायला लागतात. घारीसारख्या बलाढ्य आणि क्रूर पक्षाला कावळ्यासारखा सामान्य पक्षी हैराण करून सोडतो. घारीला भक्ष्य मिळाले की‌ कावळ्यापासून वाचवण्यासाठी‌ आटोकाट प्रयत्न करावे लागतात. एक घार एका कावळ्याला चकवू शकेल कदाचित, पण ती अनेक कावळ्यांपुढे हतबल होते. या घारी‌ एकमेकांना मदत का करत नाहीत कोण जाणे?

बराच वेळ रिकामा असेल तर गच्चीत पक्षांसाठी पोळीचे तुकडे टाकावे, पाणी ठेवावे आणि बघत बसावे. पहिल्यांदा त्यातले मोठे मोठे तुकडे कावळ्यांसारखे मोठे पक्षी घेऊन जातात. कावळे या बाबतीत मोठे चतुर असतात. त्यांना पोळी जशीच्या तशी खायला जड जात असावी. वाळलेली‌ भाकरी‌ काहीजण ज्याप्रमाणे पाण्यात मऊ करून खातात्, त्याप्रमाणे कावळे पोळ्या पाण्यात बुडवून मऊ करून खातात. मग मध्यम आकाराचे तुकडे मध्यम आकाराचे बुलबुल सारखे पक्षी येऊन खातात. त्याहूनही लहान तुकडे मग चिमण्या, फुलचुखे वगैरे लहान पक्षी खातात. मोठ्या आकाराचे तुकडे खाताना मोठ्या पक्षांनी टाकलेले लहान तुकडे अनायासे लहान पक्षांना मिळतात. एवढेच काय तर खाऊन झाल्यावर चोची धुताना जे तुकडे पाण्यात राहतात ते देखील नंतर येणारे पक्षी‌ खाऊन संपवतात.

दिवसभर बागेत वावरणाऱ्या फुलचुख्यांचं वेगळं विश्व तरंगत असतं. शरीराच्या मानाने लांब आणि बारीक चोच असलेले हे पक्षी सतत एका फुलाकडून दुसरीकडे उडत असतात. केवळ पक्षांसारखे दिसतात म्हणून पक्षी म्हणायचं, नाहीतर फुलपाखरंच ती; फुलपाखरांप्रमाणे नाना रंग आणि नाना प्रकारचं नक्षीकाम असणारी. कोणाचे पंख पिवळे, शरीर करडं, कोणाच्या डोक्यावर केशरी पट्टे, कोणी पोपटासारखे पोपटी, कोणी निळे, शेकडो रंग आणि शेकडो तऱ्हा! प्रत्येक फुलावर बसायचं आणि आपण नळातून पाणी प्यायला वाकतो तसं वाकून फुलाच्या देठाला बाहेरून चोच लावून त्यातला मध प्यायचा. लगेच पुढच्या फुलावर. एखाद्या फुलातला मध आवडला म्हणून त्यातलाच मध पीत बसलंय असं नाही. आजुबाजूला काय चालू आहे याची पर्वा नाही.

वास्तविक घरातल्या प्राण्यांप्रमाणे पक्षी काही‌ पाळीव नव्हेत, किंवा त्यांचा काही तसा उपयोगही नाही. स्वच्छंदी लोकांकडून तशाही‌ उपयोगाची‌ अपेक्षा करता येत नाहीच. पण तरीही‌ ते ओढ लावतात. नेहमी दिसणारा खंड्या पहाटे दिसला नाही‌ तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. रोज तोच खंड्या येतो का ते ही‌ माहित नसतं. एखाद दिवस वंचकांची‌ टोळी नाही आली की‌ काळजी‌ वाटू‌ लागते. एकदा मी कुठेतरी लांब गावी, कामासाठी‌ गेलो होतो. मनासारखं काहीच घडत नव्हतं. निराश मनाने, तिथल्या एका झुडपासमोर बसलो असताना, नेहमी घरच्या बागेत आढळणारा एक फुलचुख्या त्या झुडपात दिसला. एखादा घरचा माणूस भेटावा इतका आनंद मला झाला. तो उत्साह घेऊन मी निराशा झटकून कामाला लागलो. काही‌ न बोलता, एकमेकांची काहीही ओळख नसताना हे नातं‌ कसं निर्माण होतं कोण जाणे? अशा वेळी‌ कुसुमाग्रजांची‌ कविता आठवते,
उष:कालचे प्रकाशमंडल येता प्राचीवर,
निळे पाखरू त्यातून कोणी‌ अवतरले सुंदर
 आणि तिचा शेवटही आठवतो,
निळ्या अनंता मिळून गेला माझा पक्षी‌ निळा,
रखरखती भवताली आता माध्यान्हीच्या झळा

नोंद: ह्या ओळींवरून मला काही‌ प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही‌ इथे प्रकाशित केल्या आहेत. ह्या कवितेचे बरेच पाठभेद दिसत आहेत. त्यानुसार प्रत्येकजण सुधारणा सुचवतो आहे. प्रत्येक पाठभेदाला स्वत:चा अर्थ आहे. सध्या वर लिहिलेल्या ओळी‌ 'रसयात्रा' या पुस्तकातील १०९ व्या पानावरील कवितेप्रमाणे आहेत.

Monday, October 19, 2009

पुन्हा चिरोटे - गांधी टोपी वाले!

पहिल्या चिरोट्यांच्या प्रयत्नानंतर पुढच्या दिवाळीत पुन्हा चिरोटे करावेत की काय असा विचार झाला. आधीच्या वर्षी मोडलेली कंबर, मान, मनगटं सुधारली होती. मधल्या वर्षात मी चिरोटे करतो हे ऐकून, ’काय तू चिरोटे करतोस?’ हे वाक्य स्तुती, आश्चर्य, असूया, अविश्वास, खेद(!) अशा वेगवेगळ्या सुरात ऐकून झालं होतं. त्या स्तुतीनं नाही म्हणायला माझा रथ अगदी युधिष्ठिराप्रमाणे एक दोन अंगुळे नाही तरी अर्धा पाव अंगुळे तरी हवेत पोहोचला होता. त्यामुळे यावेळी सोपे प्रकार न करता, तिरंगी गुलाबाच्या आकाराचे चिरोटे करावेत असे मनाने घेतले.

पुन्हा साहित्य जमवून सुरूवात झाली. मध्ये एक वर्ष गेलं‌ होतं. त्यामुळे आठवणी‌ अंधुक झाल्या होत्या. कणीक मळताना पाणी किती घालायचं? कणीक थलथलीत भिजवायची का घट्ट भिजवायची? चिरोटे किती पातळ लाटायचे? ते कितपत गरम तेलावर तळायचे? वगैरे प्रश्न पुऩ्हा पडले. एक गोष्टीबाबत मात्र बिलकुल शंका आली‌ नाही ती म्हणजे साटं कसं‌ करायचं आणि किती‌ लावायचं. वेगवेगळ्या रंगाच्या अकरा पोळ्या एकावर एक ठेवून चिरोटे करावेत असा बेत केला.

चिरोट्यांच्या लाट्या लाटून तेलात सोडायला सुरूवात केली. पहिला चिरोटा तेलात टम्म फुगला. दुसरा फुगला. तिसरा सोडला आणि त्याचे सगळे पदर एक एक करून तेलात स्वतंत्र पोहायला लागले. प्रेयसीला तिच्यासाठी घेतलेला गुलाब गुडघ्यांवर वगैरे बसून देताना त्याच्या पाकळ्या विलग झाल्यावर जे दु:ख प्रियकराला होईल तेच दु:ख मला झाले. एखादेवेळेस असं होतं अशी समजूत काढून मी पुढची लाटी तेलात मोठ्या आशेने सोडली. पण हातातली सत्ता गेली की आघाडीतले पक्ष जसे वेगवेगळा घरोबा करतात त्याप्रमाणे याही‌ चिरोट्याचे पदर सुटे सुटे होऊन तरंगू लागले. त्याच्या पुढच्याची पण तीच कथा! पुढच्या लाटीकडे पाहताना मला या बंडामागची बारभाई लक्षात आली. भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात त्यातली गत. मी उत्साहात दोन पोळ्यांमध्ये साटं थोडं जास्तच लावलं होतं. त्यामुळे कितीही लाटलं तरी तरी हे अकरा पदर एकमेकांत गुंतत नव्हते आणि तळताना साटं वितळून गेलं की सुटे होत होते. मला पराभव दिसू लागला, चेष्टा कानावर ऐकू येऊ लागली, चेष्टेखोर हास्य ऐकू आलं , चिरोट्यांविना फराळाचं ताट दिसू लागलं. ही नामुष्की सहन करण्यापेक्षा हे समोरचं तेल मला पोटात घेईल तर बरं असा विचारही मनात आला.

स्वयंपाकात पदार्थ व्यवस्थित करण्यापेक्षा बिघडलेला पदार्थाचा चांगला वापर करणे मला जास्त चांगले जमते. मी केलेल्या नारळाच्या वड्या पहिल्यांदा कधीच व्यवस्थित होत नाहीत. एकतर त्या थापलेल्या सारणात सुरीच काय पण कुठलंच धारदार हत्यार आत शिरत नाही किंवा सुरी कितीही फिरवली तरी ते पुन्हा एकत्र येतं. मग त्याला जरा दुध, खवा असा ’मस्का’ मारला की वड्या पडतात. शिरा केला तर गच्च गोळा तरी व्हायला लागतो किंवा त्याची लापशी तरी होते. ते सुधारावं लागतं. त्यामुळे या फसलेल्या प्रयोगाचं काय करता येईल असा विचार सुरू केला. साधे चिरोटे करावेत असं ठरवलं. साध्या चिरोट्यांमधे साटं पदरांना समांतर असल्याने ते वेगळे सुटण्याची शक्यता नव्हती. पण अकरा पोळ्यांच्या त्या लाट्या लाटताना सगळा पोळपाट भरून गेला. ती पोळी (चिरोटा म्हणणं मला जड जात होतं) तळून छोट्याशा तळणीची परीक्षा पाहण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून ती पोळी मधे कापून तो चिरोटा तळला. तीन रंग होतेच, त्यात त्याला गांधी टोपीचा आकार आला होता. ऐन निवडणूकीच्या काळात फराळाच्या ताटात तो ’राष्ट्रवादी’ चिरोटा विराजमान झाला. गुलाब नाही तर गांधी टोपी तरी!










साटा
चिरोट्याची‌ ही कहाणी टोपी चिरोटी सुफळ संपूर्ण.

टीप:‌ हे वाचूनही ज्यांना चिरोट्यांच्या वाट्याला जायचे आहे त्यांनी इथे टिचकी‌ मारा.

Friday, October 16, 2009

चिरोटे

"आपल्याकडे दिवाळीच्या फराळात चिरोटे का करत नाहीत?" - मी.
"तूच का नाही करत?" - आई मला चिडवत म्हणाली.
आईने हुशारीने एका दगडात दोन पक्षी मारले होते. चिरोटे जमले नसते तर मी पुन्हा नाव काढले नसते, जमले असते की आयते चिरोटे खायला मिळाले असते. माझ्या इज्जतीचा प्रश्न होता.

आईला चिरोटे कसे करायचे हे विचारायचा प्रश्नच नव्हता. साठेबाईंना पूर्ण शरण जायचं ठरवलं. पुस्तक उघडलं, चिरोट्यांची कृती शोधली. साहित्य जमवलं. कृती वाचून त्या प्रमाणे चिरोटे करायला सुरुवात केली. पहिल्याच वाक्यात ’मैदा, तूप, मीठ एकत्र करून त्याची पोळ्यांसारखी कणीक मळावी’ असं लिहिलं होतं. पहिलाच घास घशात अडकला. पोळ्यांशी संबंध फक्त खाण्यापुरताच असल्याने, ’त्यांची’ कणीक कशी तिंबतात हे कुठे माहित होते? या पुस्तकाच्या सुरुवातीला ’हे पुस्तक ज्यांनी आधी कधीही स्वयंपाक केलेला नाही’ अशांसाठी असल्याचा उल्लेख असल्याने, मोठ्या विश्वासाने ते उचलले होते. आता आली का पंचाईत. पण धीर सोडला नाही. मैदा, तूप आणि मीठ एकत्र करून ते कालवायला सुरुवात केली, बराच वेळ कालवलं तरी काही ते मिश्रण एकजीव होऊन कणीकेजवळ जाईना. अजूनही मैदा पीठाच्या रूपातच होता, फक्त तूपामुळे त्याला थोडा ओशटपणा आला होता इतकेच. मी हैराण! त्या पीठाने भरलेल्या परातीकडे मी विषण्ण नजरेने पहात असताना, माझी बहीण तिथे आली. मोठ्या तपानंतर समोर प्रकट झालेल्या देवाला भक्त ज्या आशेने मनातील ईप्सित सांगतो, त्या आशेने मी तिला माझी समस्या सांगितली. ’अरे, त्यात पाणी कोण घालणार?’ असे मोठ्याने हसत म्हणून ती देवाप्रमाणेच अंतर्धान पावली. घ्या! साठेबाईंनी साहित्यात पाण्याचा उल्लेखच केला नव्हता. ही कणीक भिजवायला पाणी लागते हे कोण सांगणार? आणि म्हणे ’हे पुस्तक ज्यांनी आधी कधीही स्वयंपाक वगैरे, वगैरे ...

एक प्रश्न सुटला. पाणी घ्यायला गेलो आणि दुसरा पुढे दत्त म्हणून उभा! किती पाणी? पण ’आता माघार नाही’ या निर्धाराने, मी तपेलीभर पाणी घेऊन बसलो. कधी पाणी कमी, कधी मैदा कमी असं करता करता एकदाची कणीक मळली गेली. पहिली पोळी लाटून पालथी टाकली तर तिने बंड पुकारून आपला आकारच कमी केला. तो पुन्हा पहिल्यासारखा करायला लाटली तर आपल्या मध्यभागातून तिने पोळपाटाचे अंतरंग दाखवायला सुरुवात केली. अशा अनेक संकटांना तोंड देत कशाबशा त्या पोळ्या लाटून झाल्या. पोळ्या लाटण्याच्या दिव्यातून बाहेर पडल्यावर त्यांना साटं लावणं, त्या एकावर एक ठेवून त्याची सुरळी करणं, काप करणं, ते काप पुन्हा लाटणं वगैरे कामं तर फारच सोपी होती.”आता ते लाटलेले काप तळावेत आणि तळताना त्यावर झऱ्याने तूप उडवावे’ अशी सूचना साठेबाईंनी केली. पण ते तूप उडवताना, ’अपवित्रं पवित्रो वा’ म्हणताना भटजी पाणी उडवतात तसे उडवावे का म्हैस धुताना पाणी उडवतात तसे उडवावे हे सांगायला त्या विसरल्या. शेवटी पाण्यात पडलं की पोहता येतं या न्यायाने पहिला चिरोटा तुपात सोडला आणि पोहू लागला. पोहता पोहता टम्म फुगला आणि माशाच्या कल्ल्यांसारखे त्याला पदरही सुटले.

तब्बल चार तासांच्या मेहनतीनंतर चिरोटे नामक प्रकार तयार झाल्यावर आईच्या ’तूच का नाही करत?’ या उद्गारांचा खरा अर्थ लक्षात आला. नरकचतुर्थीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर फराळ करताना सगळ्यांनी चिरोटे चांगले झाल्याची पावती दिली. कंबर, पाय, मनगटं आणि अर्थात मान असं सगळं मोडून तयार झालेल्या चिरोट्यांना नावं ठेवायची काय बिशाद होती कोणाची!

Thursday, September 10, 2009

तोंडच्या वाफा

मी, निखिल, निखिल किंवा रामानंद यापैकी कुणाला वाटलं की एखादी mail येते, "या शनिवारी, तळजाईवर भेटु या." सगळ्यांना शक्य असेल तर त्या दिवशी, तळजाईच्या मंदिराजवळ आम्ही भेटतो. दरवाजा पार करून तळजाई उद्यानात शिरल्यावर, नेहमीची फेरी सुरू होते. आजुबाजुची हिरवळ मनाला प्रफुल्लित करते. पक्षांच्या मंजुळ ताना कानी पडतात. पाय चालायला लागले की जिभा पण चालायला लागतात.

प्रत्येकाच्या मेंदुतली साचलेली द्र्व्य उकळायला लागतात. त्यांच्या वाफा होऊन तोंडावाटे त्या बाहेर पडतात. प्रत्येकाच्या डोक्यातली वेगवेगळी द्रव्य त्यांच्या रंग, वासासकट अशी प्रकट व्हायला लागली की मग त्या भ्रमंतीला चव चढायला लागते. ह्या वाफा जशा एकमेकांत मिसळतील तसा गप्पांना बहर येतो. वारा वाहील तशा वाफा वळतात, मिसळतात, विरळ होतात, थांबतात, पुन्हा चालू होतात. रसायनं उकळाताहेत तितका वेळ तोंडं चालतात. कधी कधी वाट संपते, पाय थकतात, पण तोंडं थकत नाहीत. मग पाय (किंवा गाड्या) कुठल्या तरी उपाहार गृहाची वाट धरतात. फार गर्दी नसेल, एखाद्या चहावर बराच वेळ बोलत बसता येईल अशी जागा जास्त मानवते. गप्पा पुन्हा सुरू. कधी कधी तर गप्पा थांबल्या तरी कोणीच उठायला तयार नसतं. हे गप्पा रंगल्याचं लक्षण!

गप्पांचे विषयही बरेच असतात. सगळे COEP मधले असल्यानं तो विषय चघळायला असतोच. त्यात COEP हा अजायबखाना असल्याने, त्याबद्दलच्या विषयांना अंत नसतो. सगळेच IT companies मधले असल्यानं, तो एक विषय. चहाचे प्रकार, पुण्यातली खाण्याची ठिकाणं, पुस्तकं, ज्योतिष, चित्रपट अशी यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जाईल. मजा अशी की प्रत्येक वेळी कुठला विषय चघळला जाईल हे आधी माहित नसतं. पायवाटा फुटतील तसे विषयही फुटतात. प्रत्येकानं जे वाचलं असेल, पाहिलं असेल, काही घडलं असेल त्याला अशी वाचा फुटते. कोणाला तरी वेळेचं भान येतं, नाहीतर उपाहार गृहाचा पोऱ्या टेबलाभोवती घुटमळायला लागतो, मग आम्ही उठतो. गाड्यांपाशी पुन्हा एक गप्पाष्टक रंगतं. उन्हं फारच त्रास देऊ लागली की गाड्या निघतात, पुन्हा पुढच्या वेळसाठी डोकं भरायला!