एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
आरती प्रभूच्या कविता वाचायला लागल्यावर माझंही असंच झालं आहे. या कवितांनी वेड लावलं आहे. मनातल्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या सीमेवरल्या तरल भावनांचं वर्णन केवळ 'प्रभू'च करू जाणे. 'लव लव करी पातं' मधील कातरता अशीच मुग्ध करणारी.
लव लव करी पातं, मन नाही थाऱ्याला
एकटक पाहू कसं लुकलुक ताऱ्याला
कधीकधी संध्याकाळी मन अस्वस्थ होतं. गवताचं पातं जसं स्थिर राहत नाही तसं मनही अशावेळी विचारांचे झोके घेत राहतं. आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपलं काहीही ऐकायचं नाही असा पण करून, आपल्यालाही सळो की पळो करून सोडतं. बेचैनी वाढत राहते. लहान मुल जसं लहानसहान आवाजाने दचकून इकडे तिकडे पाह्तं तसं पानं जरी सळसळली तरीही उगाचच तिकडे पळतं. बरं यातून सुटका? नाही! बरोबरची माणसं देखील वेड लागलं असंच समजतात, त्यांना कुठे माहीत असतं मनात कुठलं वादळ उठलेलं असतं ते.
चव चव गेली सारी जोर नाही वाऱयाला
सुटं सुटं झालं मन धरू कसं पाऱ्याला
कुणी कुणी नाही आलं फड फड राव्याची
ऋणु झुणु हवा काही गाय उभी दाव्याची
तट तट करी चोळी तुट तुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची
मनाला हातात न येणारा पारा, कुणाची चाहूल लागली की दाव्याला झटका देऊन उभी राहणारी गाय यांच्या उपमा, पडलेल्या वाऱ्यातून दिसणारी बेचैनी, उधळलेल्या मनाला लगाम घालणारी साठीच्या पारुबाईची परिपक्वता या मात्रांच्या तालावर मनाच्या वेळूंतून घुमणारी ही शीळ, मनात पुन्हा वादळ उठायला पुरेशी ठरते.
6 comments:
हो, खरय अगदि.भावना छान रेखाटल्यात.
आशुतोष,
सुरेख लिहीलय ! कविता तर अप्रतिम आहेतच- पण रसग्रहणात्मक वर्णन ही छान आहे.
छान लिहीलं आहे. आरती प्रभूंच्या अजून कविता वाचायला आवडतील. जमल्यास जरुर नोंद.
धन्यवाद भारती, रैना, आणि सुमेधा!
सुरेख, आशुतोष! आरती प्रभूंची कविता गूढार्थानं वेड लावते :) एखादा कवी स्वत:च म्हणतो 'या माझ्या अजाण कवितेच्या वाट्याला का जाताय बाबांनो..' तेव्हा एक अनामिक आकर्षण वाटतंच ना त्याच्या कवितेबद्दल!
*
तुमच्या अभिप्रायातली'ग़ज़ल' आणि विराणीची तुलना आवडली.
आणि गंमत म्हणजे, ऊर्दू शायरीचे गाढे अभ्यासक डॉ. विनय वाईकर यांच्या मते 'साकी' हा पुल्लिंगीच असतो ऊर्दूत.
त्याम्च्याच पुस्तकात एक 'शायरा' पण सापडलीय ऊर्दूतली: 'परवीन शाकिर' नावाची.
तिचा एक शेर:
'मेरे चेहरे पे ग़ज़ल लिखती गईं
शेर कहती हुई आंखे उसकी
फ़ैसला मौजे-हवा ने लिखा
आंधियॉं मेरी बहारें उसकी'
छान! आरती प्रभू हे अनवट कवी आहेत. त्यांची एक एक कविता ही एक स्वतः अनुभवायचा अनुभव असते.
Post a Comment