एखाद्या मोठ्या सुटीतल्या आळसावलेल्या दुपारी, उन्हात जायला बंदी म्हणून घरात कंटाळलेली आम्ही मुलं कंटाळा आल्याने आजीच्या मागे लागत असू. मग ती तिचे ठेवणीतले खेळ शिकवत असे. एका दुपारी तिने दुकान मांडायला सांगितलं. “दुकानात विकायला ठेवायला आमच्याकडे काहीच नाही”, “आणि दुकानात द्यायला पैसे, ते कुठून आणायचे?”, “दुकान मांडणार कुठे?”, “आणि गिऱ्हाईक कोण?”, आम्ही नेहमीप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आजीकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असत, तशी ती आजही होती. तिने आम्हाला अंगणात हिंडून गळालेले कोवळे फणस, छोटे नारळ, काळी पडून गळालेली सिताफळं, जास्वंदीची वाळलेली फुले असं काहीबाही गोळा करून त्याचे वेगवेगळे ढीग करायला सांगितले. “हा तुमचा दुकानात विकायचा माल आणि हे तुमचे पैसे.”, प्राजक्ताच्या मूठभर बिया पुढे करत ती म्हणाली. त्या सोनेरी मोहरांनी आम्ही क्षणात कितीतरी श्रीमंत झालो. व्हरांड्यात बाजार भरला. लवकरच त्यात गोगलगायीचे शंख, रगीबेरंगी खडे अशा मौल्यवान गोष्टी, दगडावर केलेली वनीषधी अशा वेगवेगळ्या गोष्टींची भर पडली. घटका-दोन घटका सरल्या आणि बाजारातील माल संपू लागला, रोकड गायब होऊ लागली आणि बाजारपेठा बळकावण्यासाठी युद्धाला तोंड लागलं. व्हरांड्याची रणभूमी व्हायच्या आत आजीने Ice-cream वर दोन्ही गटांमध्ये तह घडवून आणला आणि सेना आपापल्या शिबिरांमध्ये झोपायला रवाना केली. नंतर बऱ्याच सुट्ट्यांमध्ये हा बाजार रंगला, बदलत्या ऋतूनुसार, मुलांनुसार त्याला वेगवेगळे रंगही चढले. पुढे सुट्ट्या लागणं संपलं आणि बाजारही.
माझ्या मुलीला दिवाळीची सुट्टी लागली, दुपारी कंटाळा आला म्हणून तिनी भुणभुण सुरू केली. “चल, अंगणात जाऊ” म्हणून आम्ही नारळ, फणस, फुलं, पानं गोळा करत हिंडू लागलो. तुळशीवृंदावनाशी बाजार भरला. वारशाने पुढे जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मृत्यूपत्राची वाट पहावी लागत नाही, नाही का?
No comments:
Post a Comment