Saturday, September 27, 2014

न्हाव्याच्या खुर्चीत

"एकदम बारीक काप केस", मी.
"भांग पाडायला ठेवू का?", न्हावी.
"भांग पडला नाही तरी चालेल", मी.
"मशीन लावू का?", न्हावी.
"चालेल", मी.

दरवेळी केस कापायला गेलो की केस कापण्याची सुरुवात या संवादांनी, आणि शेवट,
"ठीक आहेत का?", न्हावी, डोक्याच्या मागे आरसा फिरवत.
"पुढचे केस आणखी कमी चालतील.", मी.
"मग भांग पडणार नाही?", न्हावी.  काम संपलं अशा समजुतीत असणाऱ्या सर्व कामगारांचा (मग तो software engineer का असेना) चेहरा अजून काम बाकी आहे हे कळल्यावर एकसारखाच पडतो.
यानंतर या संवादांचा एकसुरीपणा घालवण्यासाठी, मी "मला कुठे मिरवायला जायचंय", "आठवडाभरात भांग पडायला लागेल, तू काप" इथपासून ते "तुला सुरुवातीलाच तर सांगितलं होतं" इथपर्यंत वेगवेगळी उत्तरं देतो तेव्हातेव्हाच्या मन:स्थितीनुसार देतो. सगळ्याचा शेवट न्हाव्याने माझे केस डोकेसपाट करण्यात होतो. असं हे वर्षानुवर्षं चाललं आहे. न्हावी बदलले, न्हाव्याकडची माणसं बदलली, तरी हे संवाद बदलत नाहीत.

परवा मात्र जरा बदल झाला. न्हाव्याचे मन बंड करून उठले असावे. "पुढच्या वेळी तुम्ही ८-१२ सांगा म्हणजे बरोबर कापतो. पहिल्यांदा भांग पाडण्याजोगे केस ठेवायचे आणि नंतर ते कमी करायचे म्हणजे दुप्पट वेळ जातो." मग सावरून घेत तो म्हणाला, "म्हणजे आमचा काय धंदाच आहे, आम्ही इथेच असतो, पण तुम्ही कशाला तुमचे तास वाया घालवता?". "लेका, तू दरवेळी सांगून पहिल्यांदा केस चुकीचे कापतोस, ती चूक कोणाची?" हे तोंडावर आलेले वाक्य मी गिळले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, माझा वेळ वाया जात होता खरे. पण मग इतक्या वर्षांत हे मला का उमगले नाही?

याची गोम न्हाव्याच्या खुर्चीत आहे. या खुर्चीत बसले की डोके अक्षरश: दुसऱ्याकडे गहाण ठेवावे लागते, म्हणजे त्याचे काम संपले. हात, पाय हलवल्यास आपल्यालाच इजा होण्याची शक्यता असते, म्हणजे तेही काम संपले. न्हावी मशीन फरवताना, किंवा कात्री चालवताना कानाचा टवका उडवेल, ही छोटीशी भीती सोडल्यास मनाला आणि शरीराला कुठलेही काम नसल्याने, आपण एकप्रकारच्या ध्यानावस्थेत शिरू लागतो. संसारात कितीही प्रयत्न केले तरीही शक्य नसलेली ही अवस्था इथे विनासायास जमते. एकीकडे डोक्यावरचे ओझे कमी होत जाते, आणि दुसरीकडे डोक्याच्या आतले. तुमचे भाग्य असेल तर समाधीचा अनुभवही येतो. तिथून बाहेर पडताना मन कसे उल्हसित होते. ह्यासाठी तासभराची किंमत काहीच नाही.

"हरकत नाही, तू तुझा वेळ घेत जा", न्हाव्याचा चेहरा आता पारच पडला. मी पुढच्या वेळी ८ - १२ तर सांगणारच नाहीये, उलट १२ - ८ च सांगणार आहे, असा निर्धार करून मी बाहेर पडलो.

Saturday, April 12, 2014

साहेबाच्या देशात

सकाळी फिरायला बाहेर पडलो. बऱ्याच दिवसांच्या पावसानंतर बाहेर पडलेल्या सूर्यनारायणानं, लंडनमध्ये आमचं "उबदार स्वागत" केलं होतं. हेथ्रोवर उतरायच्या आधी विमानातून प्रचंड पावसाने धुतल्या गेलेल्या इंग्लंडचं दर्शन झालं होतं. जिथे पहावं तिथं पावसाचं पाणी साचलेलं, नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत होते. पावसाने पूर आला होता. त्या पार्श्वभूमीवर हे स्वागत फारच सुखावह होतं. अशा हवेची मजा घ्यावी‌ म्हणून बाहेर पडलो होतो. मार्च महिना चालू होता, त्यामुळे कितीही ऊन पडलं, ऊन पडलं‌ होतं असं म्हणलं तरीही उत्तम प्रकाश पडला होता, एवढाच त्याचा अर्थ. त्यामुळे सकाळी दहा वाजले तरीही मी थंड हवेची मजा घेत (हे वाक्य ऊष्ण कटीबंधात राहणाऱ्याच्या हातून लिहिलं गेलं आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावं), धुक्याच्या दाट आणि विरळ कवचातून मी रमत गमत चाललो होतो. एक छोटी‌ चढण चढून गेलो, आणि अचानक मी एका छोट्या पण टुमदार खेडेगावाच्या वेशीवर पोहोचलो. माझ्या समोर एक रस्ता "भुऱ्या शांततेचा निशिगंध" परिमाळत सुस्तावून पडला होता. त्याच्या दोहो बाजूला विटकरी रंगाच्या टुमदार, कौलारू बंगल्या धुक्यात भिजत होत्या. उंचच उंच झाडं मखमली शेवाळ्याच्या शाली घेऊन उभी होती. गवतावर दवबिंदूंचे मद्य नुसत्या दर्शनाने बेधुंद करत होते. रस्त्याच्या शेवटी एका बागेत घसरगुंडी, sea-saw, jungle gym आणि टायरचा झोका मुलांची वाट बसले होते. स्थळ-काळाचा भेद करणाऱ्या कुठल्याशा भोवऱ्यातून मी माझ्या लहानपणीच्या लोणावळ्यात नाही ना पोचलो अशी मला शंका आली. माझ्या आठवडाभराच्या इंग्लंडच्या भेटीत मला हे भोवरे सतत झोके देत होते, Didcot parkway च्या रेल्वे स्थानकापासून लोणावळयाच्या रेल्वे स्थानकापर्यंत, Paddington terminal पासून CST पर्यंत, लंडनमधल्या गल्ल्यांमधून मुंबईच्या ‌फोर्ट पर्यंत, वर्तमानातून माझ्या बालपणापर्यंत. हा शेवटचा झोका मात्र क्लेशदायक होता. साहेबानं मागे ठेवलेल्या या जपण्यासारख्या खुणा विद्रुप होत नष्ट होताना पाहत मी मोठा झालो आहे.

इंग्लंडच्या ह्या आठवडाभराच्या वास्तव्यात तिथल्या हवेची रोज नवी रुपं पाहिली. पहिल्या दिवशी सूर्यानं उदार होऊन पूर्ण दिवस उजळून टाकला. हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही‌ Oxford ला जायचं ठरवलं. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणजे काय हे Oxford कडे पाहून कळावं. सगळं शहर नुसतं चालत पालथं घालता येतं. इन, मीन पन्नास चौरस किलोमीटरचा विस्तार असलेल्या ह्या शहरात आधुनिक विज्ञानाची बिजं रोवली गेली, आणि त्यातून निर्माण झालेल्या महाकाय वृक्षानं सारं जग बदलून टाकलं. हा महावृक्ष अजूनही इथं जपला जात आहे. ज्या सुमारास भारतातील नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांचा आणि पर्यायाने ज्ञानाचा ऱ्हास होत होता किंवा झाला होता, तेव्हा Oxford मध्ये चर्चच्या देखरेखीखाली ज्ञानपीठं तयार होत होती, हे लक्षात आल्यावर दु:ख झालं. पुण्यात जसं पुणे विद्यापीठ कुठे असं विचारलं तर नक्की जागा सांगता येते, तसं काहीसं मला Oxford University च्या बाबतीत अपेक्षित होतं. आमच्या "मलध्वज" वागवणाऱ्या तरुण गाईडनं, तुरुतुरु चालत हे Wadham college, हे Christ Churcha असं इमारतींची नावं घेत अख्खं शहर दाखवलं तरीही Oxford University काही दाखवली नाही. मी तिच्यावर फसवणुकीचा गुऩ्हा दाखल करायच्या विचारात असताना, अचानक माझ्या लक्षात आलं, की हे शहर म्हणजेच विद्यापीठ आहे, शहरात विद्यापीठ आणि विद्यापीठात शहर असं काहीतरी. त्याचे वेगवेगळे विभाग, कुठल्याशा संग्रहालयाच्या इमारतीत, कुठल्याशा चर्चमध्ये, कुण्या उमरावाच्या घरात असे विखुरले आहेत. वेगवेगळ्या प्रांतातल्या सरदार, जहागीरदारांनी, स्वत:चे राज्य अबाधित रहावे, ते चालवण्यासाठी शिकलेली माणसे मिळावीत म्हणून, ह्या शहरात त्या त्या प्रांतातल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी colleges बांधली, तिथे विद्वान tutors ठेवले, आणि तत्कालीन चर्चने धर्मसत्ता अबाधित रहावी‌ म्हणून या colleges मध्ये chaplain ठेवले. या उमरावांनी राजांचे वरदहस्त कसे मिळवले. हा इतिहास ऐकताना ज्ञानकमळाचा उगम कुठल्या चिखलात आहे हे ही चांगलेच समजले. सरते शेवटी‌ Ashmolean संग्रहालयात थोडा वेळ घालवून मी परतलो. हे संग्रहालय अफाट आहे. विविध संस्कृतींचे अवशेष, वस्तू, पुतळे तिथे माहितीसहित भौगोलिक आणि कालक्रमानुसार लावून ठेवले आहेत. वेगवेगळ्या संस्कृतींच्या एकत्र येण्याने झालेली निर्मिती अशा पद्धतीने आणि अशा ठिकाणी मांडली आहे, की ती‌ सांस्कृतिक सरमिसळ तिच्या वैशिष्ट्यांसह लगेच लक्षात यावी. माझ्याकडे जे दोन एक तास होते त्यात मी फक्त एक किंवा दोनच दालने पाहू शकलो, एवढे एकेके दालन मोठे आहे. ज्याला त्या विषयांमध्ये रुची आहे त्याने त्या संग्रहालयात कितीही काळ रमावे, आणि पुऩ्हा कुठलाही मोबदला न देता. त्या दानपेटीत काहीही न टाकल्यास कोणाची नजर तुम्हाला ओशाळे करत नाही.

Harry Potter आणि Sherlock Homes या मला आवडलेल्या दोन उत्तम साहित्यकृतींचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे आणि सुदैवाने दोऩ्ही कलाकृतींसंबंधी एकेक प्रदर्शन इंग्लंडमध्ये आहे. Harry Potter च्या सिनेमांमध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू (Props), मुखवटे, प्राणी, वेगवेगळे सेट Warner Brothers च्या Studio त जपले आहेत. Sherlock Homes च्या पुस्तकातील Victorian कालखंड 21 Baker Street ह्या पत्त्यावर उभा केला आहे. ह्या दोऩ्ही कलाकृतींचा आस्वाद कितीही‌ वेळा घेतला तरीही अपुराच. ही दोन प्रदर्शने पाहताना, ह्या कलाकृतींच्या वाचिक अनुभवाला आता प्रत्यक्षाची जोड मिळाली. आपल्याकडे व्योमकेश बक्षी, किंवा नारायण धारपांचे समर्थ यांच्याविषयी अशी‌ प्रदर्शने मांडली तर, किंवा एकेकाळी रस्ते ओस पाडणाऱ्या महाभारत आणि रामायण ह्या मालिकांचे अनुभव असे जिवंत करता आले तर?

अमेरिकेची जननी असल्याने, इंग्लंडचा अनुभव आणि अमेरिकेचा अनुभव यांची तुलना होतेच. अमेरिकेपेक्षा मला इंग्लंडचा अनुभव जास्त जवळचा वाटला. अमेरिकेत माणसांमध्ये थोडा उद्दामपणा जाणवतो, तो इंग्लंडमध्ये मुळीच जाणवला नाही. हे निळ्या, घाऱ्या डोळ्य़ांचे लोक अगत्यशील आहेत, एकेकाळी आपण साऱ्या जगावर राज्य केले याचा कुठलाही ताठा मला जाणवला नाही. उलट हे लोक "इंग्रजाने जिथे जिथे राज्य केले" याऐवजी "इंग्रज जिथे जिथे गेला" असा शब्दप्रयोग हटकून आढळला. अमेरिकेत (विशेषत:‌ California) दुसऱ्याच दिवशी मला आई आपल्या मुलीला कुत्र्याला पट्टा लावतात तसा पट्टा लावून हिंडवत आहे, हे पाहून न्याहरीचा पहिलाच घास अडकला होता.तसे इंग्लंडमध्ये मुळीच झाले नाही. उलट बाबा, आई, त्यांची‌ वेगवेगळ्या वयाची मुले, आजी, आजोबा हे सगळे हॉटेलात, सायकलवरून फिरायला एकत्र दिसत होते. Oxford  मध्ये आमच्या गाईडमागून चालणाऱ्यांत मुलगा, सून, सासू आणि सासरे असेही कुटुंब दिसले. ह्यातल्या कोणालाही थोडा राप चढवून भारतीय पोशाखात दामले, लेले वगैरे आडनावं दिली तर कोणीही सहज फसेल. जागेची टंचाई, प्रचंड आयात आणि महागडी‌ राहणी यामुळे हा देश प्रचंड महाग मात्र आहे. त्यामुळेच की काय पण पुरेसा पैसा दाखवल्याशिवाय इंग्लंडचा VISA मिळत नाही.

इंग्लंडमधून निघताना या देशाने मला रुखरुख लावली, कधीकाळी‌ भारतावर पारतंत्र्य लादलेल्या या देशाचे आत्तचे दर्शन मात्र सुखद होते.


Monday, November 25, 2013

हरवले ते गवसले

नेहमीसारखा कामावरून घरी आलो, कपडे बदलले आणि जरा बसणार तेवढ्यात आठवलं की मित्राला फोन करायचा आहे. कामावरून घरी आल्यावर जिथे नेहमी मोबाईल ठेवतो तिथे सवयीने हात गेला, पण सवयीप्रमाणे मोबाईल मात्र हाताला लागला नाही. इकडे तिकडे ठेवला असेल म्हणून सगळी खोली शोधली पण तरीही तो मिळाला नाही. माझा नंबर वेगवेगळ्या मोबाईलवरून लावून पाहिला तर तो "बंद" किंवा "संपर्कक्षेत्राच्या बाहेर" असल्याचे कळत होते. दुचाकीवरून आल्यावर उतरताना पडला असेल म्हणून घरासमोरचा रस्ता आणि बाग शोधली. तरीही मिळाला नाही. कामावरून निघताना मी फोन केला होता, त्यामुळे तिथून निघेपर्यंत तो होता हे आठवत होतं. म्हणजे रस्त्यातच कुठेतरी पडला होता. जेवून हा १० किलोमीटरचा रस्ता धुंडाळायला मी आणि देवकी निघालो. तास दीडतास रात्री ९ च्या अंधारात (पुणे महानगरपालिकेला रस्त्यावर पुरेसे दिवे लावायला आणि असलेले चालू ठेवायला मनाई आहे.) फेरफटका मारल्यावरही तो सापडला नाही. मोबाईल हरवला हे जवळ जवळ निश्चित झाले. दरम्यान BSNL च्या call center ला संपर्क करून माझा नंबर बंद करता येईल का आणि दुसरे SIM मिळेल का ह्याची चौकशी केली आणि हे सगळे करण्यास मला BSNL च्या कार्यालयात जाण्याशिवाय पर्याय नाही असे कळले. म्हणजे निदान दुसऱ्या दिवसापर्यंत काही करता येणार नाही हे स्पष्ट झाले.

दुसऱ्या दिवशी BSNL मध्ये जाऊन जुने SIM बंद करून नवे SIM घेतले. हा अनुभव अतिशय चांगला होता. BSNL असून त्यांच्या कार्यालयात गेल्यापासून १० व्या मिनिटाला मी नवं SIM घेऊन बाहेर पडलो होतो. आता नव्या मोबाईलचा शोध आणि हरवलेले नंबर गोळा करणे हे मोठं काम पुढे होतं. पण तिथपर्यंत गाडी पोचलीच नाही.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी‌ माझ्या आईला फोन आला आणि त्याने माझा मोबाईल बोटक्लब रोडवरच्या सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या श्री. राठींच्या बंगल्यातील श्री. जहांगीर बेग ह्या रखवालदाराकडे असल्याचं सांगितलं. मी आणि माझे वडिल तिकडे पोचलो. त्याने माझा मोबाईल देताना, तो त्याच्याकडे कसा आला याची हकिगतही सांगितली. मी विधानभवनाचा चौक ओलांडून जात असताना, तो मोबाईल रस्त्यात पडलेला, माझ्यामागून येत असलेल्या श्री. राठींच्या यादव नावाच्या चालकाने पाहिला. त्याने तो उचलला तेव्हा त्यातील बॅटरी इतर कुठेतरी पडली होती. मोबाईल वरील नावांमधून हा मोबाईल कोणाचा आहे, हे कळेल म्हणून त्या भल्या माणसाने बॅटरी मिळवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विधानभवनाकडे धाव घेतली. सुदैवाने ती बॅटरी त्याला तिथे मिळाली. मोबाईल सुरु करून त्यातून त्याला माझ्या आईचा क्रमांक कळला आणि त्याने आईला कळवले. रखवालदार एका ठायी असेल म्हणून त्याने तो रखवालदाराकडे सांभाळायला दिला.

या दोघांच्या प्रामाणिकपणाचे आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाचे कौतुक व्हावे म्हणून हा लेख!

Sunday, September 29, 2013

चारचाकी चालवणं

मी‌ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातलं. पहिल्याच दिवशी शिकवणाऱ्यानं विचारलं, "कुठली गाडी चालविता येते?". "लुना", मी उत्तरलो. कुठून येतात असा चेहरा करून तो म्हणाला, "म्हणजे, कुठली गिअरवाली गाडी चालवता येते?". "कायनेटिक", कुठलीच नाही असं म्हणून पूर्ण इज्जत जाण्यापेक्षा हे बरं होतं. "जरा पाहून घेत जा रे", आतल्या माणसाला उद्देशून म्हणलेलं हे वाक्य मी कानावर घेतलंच नाही. माझाही नाईलाज होता, मला लुना ते चारचाकी ही उडी‌ घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं, म्हणून अक्षरश: उडी मारून मी‌ स्टिअरिंग व्हीलचा ताबा घेतला. हा माणूस मला इथूनच हाकलून देतो का काय अशी‌ भीतीही‌ असं 'पाऊल उचलण्या'मागे होती. "गिअर, क्लच म्हणजे काय हे माहित आहे का? या बाहेर. मी‌ थोडं चालवून दाखवतो, मग तुम्हाला शिकवतो". पुढचा काही काळ गाडीचे वेगवेगळे भाग कुठे कुठे असतात आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे जाणण्यात गेला. मग बॉनेट नावाची अलिबाबाची‌ गुहा उघडण्यात आली. एकूण पहिला दिवस शाळेत जातो तसा नुसतेच नव्या पुस्तकांचे वास घेण्यात गेला. खरी मजा दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली.

शाळेतल्या पुस्तकांमधले पहिले धडे सोपे असतात. पण इथल्या पहिल्या धड्याने अगदी 'बसल्या जागी' घाम काढला. पहिला गिअर टाकून गाडी ‌सुरू करणे हा प्रकार वाटला होता तितका सोपा नव्हता. हळूहळू‌ क्लच सोडत ऍक्सिलरेटर दाबून गाडी‌ पुढे नेणे ही एवढीशी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात महाभयंकर होती. कधी क्लच लवकर सोडला गेल्याने गाडी, असहकार पुकारत असे, तर कधी क्लच आणि ऍक्सिलरेटरचे एकमेकांशी न पटल्याने निषेधाचे आवाज काढत असे. हा निषेध ती कधी‌ उसळी‌ मारून तर कधी बंद चा नारा देऊन व्यक्त करत असे. क्लच कधी सोडायचा हे कळण्यासाठी तो सोडताना बाजूच्या आरशात गाडीची‌ थरथर कधी जाणवते वगैरे गोष्टीही आजमावून पाहिल्या. पण या बाजूच्या आरशात पाहताना मागच्या रस्त्यावरून जाणाऱ्या इतरच आकर्षक गोष्टींकडे लक्ष जात असल्याने तोही प्रयत्न फसला. शेवटी क्लच आणि ऍक्सिलरेटरमध्ये तह झाला असावा, माझी‌ गाडी वाहती‌ झाली. आमच्या शिक्षकाने या तहात मध्यस्थी केल्याचे नंतर माझ्या लक्षात आले. हा पहिला गिअर टाकल्यावर पुढचे गिअर त्यामानाने विनासायास पडले. दुसरा ते तिसरा आणि तिसरा ते दुसरा हा आडमार्गपण सवयीचा बनला.

गाडी चालवण्यापुरते आपल्याला आणखी‌ दोन हात आणि डोक्यामागे दोन डोळे मिळावेत असे वाटू लागते. रस्त्यावर वाहने, माणसं चारही बाजूंनी‌ हालचाल करत असतात. विशेषत: गाडी‌ शिकताना तर रस्त्यावरची सगळी‌ चर सृष्टी आपल्या गाडीवर चहूबाजूंनी धडकायलाच टपलेली आहे असंच वाटत असतं. डावी-उजवीकडून वळणारी गाडी, दहा फुट पलिकडे रस्त्याच्या दुभाजकावरून रस्त्यावर उतरणारा पादचारी, आपल्या डाव्या बाजूला गाडीपासून दोनचार फुट पलिकडे कठड्यावरून रस्त्यावर पाय सोडून बागेत बसल्यासारखा बसलेला माणूस या तशा निरुपद्रवी गोष्टी! पण गाडी‌ शिकताना यातली‌ कुठलीही गोष्ट heart attack ला कारणीभूत होऊ शकते. आपल्या गाडीला रस्त्यारचा एखादा खड्डा, रस्त्यावरून जाणारी दुसरी गाडी किंवा त्या गाडीतील वा गाडीवरचं माणूस, रस्त्यावरची झाडं, भिंती किंवा इतर वस्तू यांबद्दल कधी‌ प्रेम उत्पन्न होईल आणि त्यांना जबरदस्त मिठी मारावी किंवा गेला बाजार निसटतं चुंबन घ्यावं असं वाटेल त्याचा काय भरवसा.

गाडीची ही प्रेमाची आंदोलने, तिच्या स्वभावातील हिंदोळे हळूहळू परिचयाचे होऊ लागले. चाकाच्या मागे बसून बॉनेटच्या पलिकडची अंतरे, आरशातून लांब दिसणाऱ्या जवळच्या वस्तू, डावीकडची रुंदी यांचा अंदाज येऊ लागला. तशी गाडी चालवण्यातली रंगत वाढू लागली. गाडीचंही लोणच्यासारखंच आहे. लोणचं नुकतंच घातलं असेल तर त्यातल्या तिखट, आंबट, तेलकट चवी एखाद्याला जगातून उठवतात पण जसं ते मुरतं तशा याच चवी जेवणाची लज्जत वाढवतात. गाडीचे आचके, गचके नवख्याला आयुष्यातून उठवतील पण जशी त्यांच्याशी ओळख होते तसा रस्ता कधी सरतो ते कळत नाही.

अंधारातून प्रकाशाकडे?

आजच्या सप्तरंगमध्ये (२९ सप्टेंबर २०१३) उत्तम कांबळे यांचा "स्मशानातून स्मशानाकडे" ( हा लेख वाचला. त्या लेखात एका मसणजोग्याची (म्हणजे कोण ते लेखात छान दिलं आहे) वाटचाल, मसणजोगी ते सरकारी नोकरदार ते पुऩ्हा मसणजोगी अशी कशी होते ह्याचे वर्णन केले आहे. मॅट्रिक होऊन कालव्यावर राखणदार म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेल्या ह्या मसणजोग्याची पहिली बायको त्याच्याबरोबर एका ठिकाणी नांदायला तयार होत नाही. एका ठिकाणी राहून, रोजच्या एकसुरी जगण्यापेक्षा तिच्या जातीतल्या इतर बायकांप्रमाणे भीक मागून, इतर फुटकळ वस्तू विकून फिरतीचं जगणं तिला जास्त मानवतं. त्यामुळे ती ह्याच्याबरोबर नांदायला तयार न होता भांडून माहेरी निघून जाते. हे असह्य होऊन तो पुऩ्हा लग्न करतो, पण तिचीही तीच तऱ्हा. शेवटी नोकरी तशीच टाकून तो पुऩ्हा मसणजोगी होतो. लेखक या लेखाच्या शेवटी, "जर ह्या बायकांना योग्य बुद्धी झाली असती, तर अंधाराकडून प्रकाशाकडे गेल्या असत्या" अशा अर्थाचं भाष्य करतो. पूर्वीही अशाच प्रकारची एक कथा वाचलेली आठवली. आता लेखक वगैरे इतर संदर्भ आठवत नाहीत. एका गडावरच्या गुराख्याच्या मुलीचं तिच्याच जातीतल्या पण मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाशी लग्न होतं. पण तिथलं बंदिस्त जगणं असह्य होऊन ती मुलगी माहेरी परत जाते आणि बरोबर नवऱ्यालाही परत नेते. शेवट तसाच आणि शेवटचं भाष्यही तसंच. अशा कथा किंवा असे संवाद वाचले किंवा ऐकले की प्रश्न पडतो, यातला "अंधार" कुठला आणि "प्रकाश" कुठला? मी किंवा माझ्याप्रकारची अनेक माणसं ज्या प्रकारचं जगणं जगत आहेत त्याला प्रकाश आणि ह्या जगण्याशी दूरान्वयेही साम्य नसलेलं जगणं म्हणजे अंधार? या गोष्टी फक्त भाष्य करण्यापुरत्या राहिल्या असत्या तर ठीक पण पुढे अंधारातल्यांना प्रकाशात ओढून घेण्याचे प्रयत्न सुरु होतात.

अंधारातलं म्हणून म्हटलं जाणारं जगणं "अंधारातलं" का म्हणावं? तिथे कुपोषण, रोगराई, अशिक्षितपणा, अपमानास्पद वागणूक वगैरे गोष्टी आहेत म्हणून? पण मग ज्याला प्रकाशातलं जगणं म्हणावं ते तरी काय वेगळं आहे? तिथे कुपोषण असलं तर इथे मुबलक अन्न नसून ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने न घेतल्याने येणारे रोग आहेत; तिथे चाळिशीतच संपून जाणारं आयुष्य असेल तर इथे चाळिशीतच असह्य होणारं आयुष्य आहे; तिथे चार भिंतीतलं शिक्षण नाही तर इथे चार भिंतींपलिकडच्या शिक्षणाची कमतरता आहे. शेवटी माणूस म्हणल्यावर त्यात काही उणं काही अधिक असणारच. षड्रिपुंमुळे निर्माण होणारी दु:ख माणूस आहे तिथे सगळीकडे आहेतच. जोपर्यंत ते जगणं आनंदात, समाधानात जगता येतं आहे, किंवा जिथे आनंदात, समाधानात जगता येत नाही तिथे तो आनंद, समाधान मिळवण्याचे मार्ग खुले आहेत किंवा त्यांचा शोध घ्यायला बंदी नाही, तोपर्यंत ते जगणं कुठल्याही पद्धतीचं का असेना पण ज्याचं त्याला रुचणारं आहे. अशा जगण्याला "अंधार" किंवा "प्रकाश" अशी लेबलं का लावावीत? याचा अर्थ एखाद्याला त्याची जगण्याची पद्धती बदलायला मज्जाव आहे असं नव्हे. तशी इच्छा झाल्यास जरूर बदल करावा, तसं‌ करूनच ज्याचं त्याचं भलं ज्याला त्याला ठरवता येईल.

मला एकदा हरिश्चंद्रगड चढताना, एक म्हातारा भेटला. हातात लाकडाच्या मोळ्या, मूळ पांढरा रंग शोधून मिळणार नाही असे मातीनी तांबडे झालेले कपडे, तोंडातले दात किडलेले किंवा पडलेले, चेहऱ्यावर, हातापायावर जन्मभर मोजून पुरे पडाव्यात इतक्या सुरकुत्या, बरोबर तशीच बायको. बोलताना मी विचारलं, "गडावर कशाला गेला होता?". तो हसत म्हणाला, "गडावरची मजा बघायला". पावसाचे दिवस होते. आम्हीही तशीच मजा पहायला पुण्याहून कित्येक तासांचा प्रवास करून आलो होतो. ते उत्तर देताना त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला त्याचा हेवा वाटला, माझं "प्रकाशाचं" जगणं सोडून त्या म्हाताऱ्याच्या "अंधाऱ्या" जगण्यात प्रवेश करावा असा मोह क्षणभर मला झाला. मी तसं केलं असतं तर आणखी एका लेखकाला "प्रकाशाकडून अंधाराकडे" असा लेख लिहिता आला असता.

Wednesday, September 26, 2012

विलेक्शन


आमची कामवाली हातात एक खोकं घेऊन धापा टाकत आली.
"काय गं, कुठे होतीस? आणि हे हातात काय?" - मी, उशीर झाल्याचा वैताग शब्दांबरोबर बाहेर पडला.
"अहो बाई, तिकडे साबळेची माणसं काचेचे बाऊल वाटताहेत. अख्खी वस्ती लोटलीये. फुकटचं कोण सोडनार, रांगेत लागले म्हणून थोडा उशीर झाला." - तिच्या चेहऱ्यावरून आनंद उतू जात होता.
"कशाबद्दल बाऊल वाटतायत?" - मला पुसटशी शंका आली, पण खात्री‌ करावी म्हणून विचारलं.
"अजून रथसप्तमी व्हायची आहे,  हे संक्रांतीचं वाण म्हणून असंल!" - इतकं कसं माहित नाही यांना, अशा थाटात तिनं मला माहिती पुरवली. हल्ली पुरुष पण हळदीकुंकवं करून वाणं लुटतात हे माहित नव्हतं मला.
"दर वर्षी‌ लुटतात का असं?" - मी आणखी विचारलं.
"आता कॉर्पोरेसनचं विलेक्शन नाही का फुडच्या महिन्यात? म्हणून साबळे. पण दर साल, दोन साली कुठलं तरी विलेक्शन असतंच मग, दर साली ज्याचं विलेक्शन तो लुटतोच." - तिनं माझ्या ज्ञानात भर टाकली. "परवा तर स्टीलच्या ताटल्या वाटल्या कासकरच्या माणसांनी, एकीला एकच देत होते, पण मी सहा आणल्या, घरात सहा खाणारी तोंडं त्यांना सहा नकोत का?"
"कुठून येतात एवढे पैसे यांच्याकडे", मी हजारोंच्या संख्येनं मला काय लुटता येईल याचा विचार करत होते.
"जिंकले की बक्कळ कमवतात की! त्यासाठी आत्ता वाटाय काय झालंय? एवढ्याचं काय त्या कागलानं इथल्या वस्तीतल्या लोकांना काशीयात्रेला नेलं व्हतं तेचा इचार करा. त्यानं तर शंभर पानी पुस्तकबी काडलंय, सगळे फोटो, त्यानं कुणाकुणाला यात्र घडवली, काय काय वाटलं तेचे. आख्या वार्डात हजारोंनी वाटली असतील तसली पुस्तकं!"
"अगं, पण नगरसेवक झाला किंवा अगदी महापौर झाला, एवढं मानधन किंवा पगार थोडीच असतोय" - मी आणखी भाबडेपणाचा आव आणला.
"आता कसं सांगायचं तुम्हाला", माझं सारं अज्ञान पुसायचं‌ ठरवल्यासारखं ती म्हणाली, "ते इथे एवढे रस्ते काय उगीच केले, दिसली कुठलीबी‌ टाचकी गल्ली की‌ ओत डांबर, आमच्या घरापुढचा रस्ता तर आता उंबऱ्याच्या पार वर गेलाय. वरती आन् पाट्या बसवल्या, बाकं, बागा पैसा काय नुसता वाहत येतो."
"हं, म्हणूनच दर पावसाला रस्त्यात डबकी साचतात, की‌ पुऩ्हा नवा थर", मी खोचकपणे बोलले, "पाहिलंस ना आमच्या इथल्या ओढ्याची काय वाट लावली आहे. चॅनेलिंग केलं होतं ती सगळी‌ स्लॅब मागच्या पावसात वाहून गेली, त्यावर दिवसन् रात्र जोरदार आवाज करत पूल बांधला, झोपेचं‌ खोबरं. त्या पुलाच्या कामात उरलेलं चॅनेलिंग गेलं. आता वरच्या वस्तीवरून सगळा कचरा येतो, तो इथे साचतो, डासांचं फावतं, . . . "
"मग तक्रार का नाही करत, नगरसेवकाकडे?" - मला थांबवत ती म्हणाली, "माझ्या घरात पावसाचं पाणी‌ आलं होतं, सगळ्य़ा घरात पाणी, मी लगेच फोन केला त्याला, आला होता पाणी‌ काढायला."
"तक्रार कसली, त्या नगरसेविकेला सांगितलं, तर बया पाठ फिरवून निघून गेली तिथून. आणि काय गं तुझ्या घरातलं पाणी काढायला नगरसेवक कशाला लागतो तुला? तुम्हाला नाही काढता येत?"
फार न बोलता तिनं भांड्यांत हात घातले, मी माझं आवरायला निघाले. आमची कामं करायला थोडाच नगरसेवक येणार होता.

Saturday, March 10, 2012

मदत


मी खुर्चीत बसलो होतो. माझी नऊ महिन्यांची मुलगी सरकत त्या खुर्चीपाशी आली. तिला माझ्या मांडीवर बसायचे असावे असे दिसत होते. खुर्चीच्या खालच्या एका फळीला धरून तिने उभे राहण्याचा प्रयत्न केला. तिचे पाय फरशीवरून घसरले, आणि पुरेसा जोर न देता आल्याने ती‌ घसरून पडली. तिने पुऩ्हा प्रयत्न केला, ती‌ पुऩ्हा पडली. आपल्याला उभे राहणे जमत नसल्याचे दिसताच, तिने माझ्याकडे पहात रडायला सुरुवात केली. मला तिला उचलून घेता येणे सहज शक्य होते, पण मग तिने तिचे प्रयत्न सोडले असते. मला तिचे प्रयत्न करणे थांबवायचे नव्हते, स्वत:च्या प्रयत्नाने ती माझ्या मांडीवर चढलेली मला जास्त आवडले असते. मी तिच्याकडे पाहून तिला पुऩ्हा प्रयत्न करण्यासाठी सुचवू लागलो. मी तिला का उचलून घेत नाही हे कदाचित तिला कळले नसावे. तिने माझ्याकडे निराश होऊन पाहिले आणि दुसऱ्या खेळण्याकडे वळली.

देवा, तूही असाच वागतोस का रे?