माझं नाव राज्याच्या गुणवत्ता यादीत आलं होतं. अभिनंदनाला आलेल्या लोकांना देण्यासाठी भरपूर पेढे घरी आणले होते. आमच्या मांजरांनी काही माझं अभिनंदन केलं नाही तरीही त्यांना यथेच्छ पेढे मिळाले. त्यांनीही कसलाही विचार न करता पेढ्यांवर ताव मारला. एरवी मांजरं खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ असतात. त्यांचं पोट भरलं की ती थांबतात. स्वतःचं पोट बिघडलं, सर्दी झाली किंवा काही त्रास झाला तर कोणतं गवत खायचं याची निसर्गदत्त जाण त्यांना असते. त्यामुळे आमच्या मांजरांसाठी आम्हाला कधी पशुवैद्याकडे (Vet) जावं लागलंच नाही. आमच्या घरी जर एखाद्या मुलाने मांजरांसारखे एकापाठोपाठ एक पेढे फस्त केले असते, तर त्यांना भरपूर ओरडा बसला असता. मांजरांच्या बाबतीत आमचा दृष्टिकोन वेगळा होता. आम्हाला वाटलं, त्यांना पचतंय म्हणूनच ती खातायत आणि उद्या काही त्रास झालाच, तर त्यांना स्वतःवर उपचार कसे करायचे हे माहिती आहेच! तसंही कोणाच्या उंचावलेल्या भुवयांची तमा मांजरं थोडीच बाळगतात.
पण आमचा हा समज लवकरच खोटा ठरला. एका मांजराचे अंगावरचे केस गळू लागले, तर दुसऱ्याला दिसेनासं झालं—ते ठार आंधळं झालं. आम्ही तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीअंती समजलं की दोघांनाही मधुमेह झाला आहे. लवकरच त्यांनी प्राण सोडले. माझ्या त्या यशाच्या आठवणींच्या मागे एक कायमचं शल्य उरलं.
नंतर एकदा मी माझा सहकारी जॉन याच्याशी याबद्दल बोललो. जॉन स्वतः एक मोठा मांजरप्रेमी असून त्याला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे. त्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली—मांजरांना मुळात 'गोड' चव कळतच नाही! त्यांना प्रथिनांची (Proteins) ओढ असते. पेढे दुधाचे बनलेले असल्यामुळे त्यातील प्रथिनांसाठी ती हापापल्यासारखी पेढे खात होती. त्या पेढ्यात साखर आहे आणि ती आपल्यासाठी विष ठरू शकते, याची त्यांना साधी पुसटशी कल्पनाही नव्हती. हे कळल्यावर माझं मन थोडं हलकं झालं. त्या काळी जर आम्हाला हे माहित असतं, तर आम्ही त्यांना चुकूनही पेढा दिला नसता, तयांचा रुसवा सहन करूनही!
या घटनेमुळे जुन्या दोन आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तेव्हा 'कॅट फूड'चा जमाना नव्हता, त्यामुळे आम्ही मांजरांना सुकट द्यायचो. ते साठवायला सोपं असायचं आणि दीर्घकाळ टिकायचं. आम्ही स्वतः मासे खाणारे नसल्यामुळे आम्हाला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तिथेही आम्ही मांजरांच्या 'उपजत बुद्धी'वरच विसंबून राहिलो. मांजरं ती खारवलेली मासळी आवडीने खायची, पण नंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. डॉक्टरांनी सांगितलं की मासळी टिकवण्यासाठी लावलेलं मीठ त्यांना बाधत होतं. त्यानंतर आम्ही बिनमिठाची मासळी आणू लागलो आणि तो प्रश्न मिटला. दुसरी आठवण मात्र अधिक भीषण आहे. आमच्या नारळाच्या झाडांना आम्ही एक विशिष्ट खत घातलं होतं. त्यात माशांचे खवले आणि काही रासायनिक द्रव्ये होती. एका मांजराने माशांच्या वासाने ते खवले खाल्ले आणि त्यासोबत ते रसायनही पोटात गेलं. ते खत त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं. मांजरांना त्यांचं अन्न नीट कळतं, हा आमचा विश्वास तिसऱ्यांदा मोडीत निघाला होता.
आजकाल आपण ऐकतो की प्राण्यांनाही मानवासारखेच व्याधी जडू लागल्यात. पाळीव कुत्र्यांना 'ब्लड प्रेशर'चा त्रास होतोय, आमची मांजरं मधुमेहाने गेली, तर प्राणिसंग्रहालयातील वाघांना हृदयाचे विकार होतायत. उद्या कदाचित झेब्रालाही अल्सर होईल! निसर्गात मुक्त वावरताना त्यांची उपजत प्रवृत्ती (Instincts) त्यांचं रक्षण करते. पण एकदा का हे प्राणी मानवी संपर्कात आले, की त्यांची ती नैसर्गिक बुद्धी फारशी कामाला येत नाही. मानवी सहवासात आपण त्यांना नकळत असं काही 'विष' देतोय, ज्याच्याशी लढण्याची निसर्गदत्त ताकद त्यांच्याकडे नाही. माणूस स्वतः निर्माण केलेल्या कृत्रिम परिस्थितीशी जुळवून घेताना मेटाकुटीला आलाय, तरीही त्याला मुक्या प्राण्यांना त्याच चौकटीत ओढायचं आहे. याला आपण 'माया' म्हणू शकत नाही. त्यांना आपल्यासारखं बनवण्याचा हट्ट धरण्यापेक्षा, त्यांच्या मर्यादा समजून घेऊन आपणच त्यांच्याकडून काही शिकता आलं तर बघावं.

