Saturday, November 02, 2019

दिवाळी

दिवाळी‌ कधी असते, या प्रश्नाचं उत्तर पंचांगाप्रमाणे अश्विन कृष्ण एकादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत असं मिळेल. थोडे अधिक ज्ञानी वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत असं देतील. काही हौशी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दिवाळी साजरी करतील. इंग्रजी Calendar वापरणारे या "वर्षी" दिवाळी कधी आहे याचं उत्तर तारखांमध्ये म्हणजे २७ ऑक्टोबरला वगैरे असं देतील. ते सुट्ट्यांच्या सोयीचं असेल. पण माझं यातल्या कुठल्याही उत्तराने समाधान होत नाही. मला दिवाळीची चाहूल लागते. कोजागिरी पौर्णिमेला शारदाचं टिपूर चांदण्यात केशर, बदाम, पिस्ते घातलेल्या आटीव दुधाने मन तृप्त होतं. घटस्थापनेला घट बसतात. बागेतला फुललेला झेंडू दसऱ्याला तोरणात जाऊन बसतो. इथं काहीतरी बदलायला लागतं. झाडोऱ्यात पिवळी, केशरी रानफुलं दिसतात शेतांमधून तयार होत असणाऱ्या भाताचा दरवळ पसरतो. संध्याकाळी केशरी व्हायला लागतात. काळ्या ढगांना भगव्या मायेचा स्पर्श होतो आणि कधीतरी अचानक एखाद्या संध्याकाळी एक अनामिक पण चिरपरिचित सुगंध हवेत दरवळतो. हीच ती दिवाळीची चाहूल! दिनदर्शिका किंवा पंचांगांच्या रुक्ष कागदांनी कितीही आधी दिवाळी कधी येणार हे जाहीर केलं असलं तरीही ही चाहूल लागल्याशिवाय दिवाळीचा शकुन होत नाही.

ह्या जाणवेल न जाणवेल अशा जाणिवेच्या तरल पातळीवरील सुगंधाने दिवाळीची चाहूल लागते खरी पण नंतरचा प्रत्येक दिवस नवीन सुगंधाची जाणीव करून देतो. दिवाळी हा सण जसा दिव्यांचा, प्रकाशाचा तसा तो सुगंधाचादेखील आहे. दिवाळीची खरेदी होते त्याला नव्याचा वास असतो. नवे कपडे, घराची नवी सजावट, कदाचित घराला लागणारा नवा रंग, दिवाळीची सुरुवातच सुगंधाने होते. जशी दिवाळी जवळ येते, तशी फराळाची तयारी होते. करंज्या, चकल्या, कडबोळी, चिवडे, लाडू, चिरोटे यांच्या घमघमाटाने घर भरून जातं. हे पदार्थ तयार होतानादेखील आपली घ्राणेंद्रिये तृप्त करतात. वेगळी धान्ये, पिठे, इतर साहित्य यांच्यावरील भाजणे, तळणे, मळणे ही प्रत्येक प्रक्रिया त्यातील निरनिराळ्या सुवासांना पाऩ्हा फोडते. गंधोत्सवाचा कळसाध्याय वेलची, जायफळ, केशर यांनी लिहिला गेल्यावर याचसाठी केला होता अट्टाहास हे मनोमनी पटते. फराळाचा प्रत्येक पदार्थ पंचेंद्रिये तृप्त करून जातो.

अभ्यंगस्नान म्हणजे तर पारंपारिक Aroma therapy च. इतर वेळी फक्त पुजेतल्या देवांच्या नशिबी येणारे जलतैलसुगंधीद्रव्यादिसंयुतम् स्नान मर्त्य मानवाच्या नशिबी येते ते दिवाळीच्या दिवसात. त्यातल्या विविध सुवासांनी पुढचे सारे वर्ष सुगंधी होऊन जाते.

दिवाळी संपते आणि वसंतापासून सुरु झालेला गंधोत्सवाची सांगता होऊ लागते. हळूहळू नाकाला प्रामुख्याने थंडपणा या एकाच गोष्टीची जाणीव उरते. गारठलेले नाक वाट पाहत राहते ती पुढील वसंतात सुरु होणाऱ्या गंधोत्सवाची!