विस्तीर्ण उद्यान आहे, त्यात वेगवेगळ्या आकारांची, रंगांची आणि वासांची फुलं आहेत, वेगवेगळ्या चवींची फळं आहेत, अनेक आकारांची झाडं आहेत, विविध पक्षी, प्राणी आहेत, झरे, नाले, ओहोळ, धबधबे, जलाशय आहेत. जलाशयांमध्ये विविध आकारांचे, रंगांचे जलचर आहेत. हे सगळं अतिशय सुंदर रचलेलं आहे. तुम्हाला या उद्यानात हवं तिथे हवं तेवढा वेळ फिरण्याची, या उद्यानाचा आनंद घेण्याची मुभा आहे. तुम्ही बागेत फिरायला लागता, तुमच्या स्वभावानुसार अतिसंथ, संथ, मध्यम, जलद किंवा अतिजलद गतीने, किंवा गती बदलत. एखादं फूल, फळ, रचना जे आवडेल तिथे रेंगाळता. दूर काही आकर्षक दिसलं तर जलद गतीने तिथवर जाण्याचा प्रयत्न करता. न आवडलेल्या ठिकाणहून लवकर दूर जायचा प्रयत्न करता. काहीतरी विसरलंय असं लक्षात येताच पुन्हा त्या जागेवर परत येता. अशा विविध प्रकारे या उद्यानात हिंडून आपलं मन रिझवण्याचा प्रयत्न करता. कधी थकता, एखाद्या झाडाखाली विश्रांतीला बसता, झोपीही जाता. कधी निराश होता, कधी कंटाळता, कधी उल्हसित होता, कधी सुखावता. लवकरच लक्षात येतं की हे उद्यान फार विस्तीर्ण आहे, आणि त्याचा आनंद घेणं ही(देखील) तितकीशी सोपी गोष्ट नाही. काहीतरी विचार करून, नियोजनाने या बागेचा आस्वाद घ्यायला हवा. त्यानुसार तुम्ही पुन्हा फिरायला सुरुवात करता. आता तुम्हाला ही बाग आपलीशी वाटू लागते, त्यातली सौंदर्यस्थळे नीट कळून येऊ लागतात. परंतु तरीही काहीतरी उणे आहे असं वाटत राहतं. तेवढ्यात तुम्हाला एक दुसरी व्यक्ती तिथे भेटते. अशी व्यक्ती जी या बागेत तुमच्यापेक्षा खूप जास्त काळ फिरत आहे. त्या व्यक्तीला या उद्यानाची जास्त ओळख आहे. त्या व्यक्तीशी बोलताना, तुम्ही ह्या उणेपणाचा उल्लेख करता. ती व्यक्ती तुम्हाला हाताशी धरून त्या बागेत हिंडवते. त्या व्यक्तीला गवसलेली सौंदर्यस्थळे तुम्हाला दाखवते. एवढेच नव्हे तर अशी स्थळे शोधण्याच्या युक्त्या तुम्हाला शिकवते.
शास्त्रीय संगीताचं तसंच आहे. संगीत हे अतिविस्तीर्ण उद्यान आहे. नव्याने त्यात शिरलेल्या माणसाला काहीच दिसत नाही, किंवा ते अंगावर तरी येतं. हळूहळू तिथे रमाल तसं त्या उद्यानाचा आनंद कसा घ्यायचा हे कळायला लागतं. पण आपल्या पूर्वजांनी या उद्यानाचा सखोल अभ्यास करून त्यातील काही उपवनं, बागा हेरून ठेवल्या आहेत. या उद्यानाचा आनंद कसा घ्यायचा याचं शास्त्र विकसित केलं आहे. नाटक, चित्र, गद्यपद्यादि वाङ्मय ह्यांचा आनंद त्यांच्या निर्मितीनंतर घेता येतो; या रचना बांधताना त्यांचा आनंद घेणं फार अवघड असतं. पण शास्त्रीय संगीत, विशेषत: भारतीय शास्त्रीय संगीत यापासून पूर्ण वेगळं आहे. या शास्त्रात रचना बांधल्या जात असताना त्याचा आनंद घेणं शक्य आहे. शास्त्रीय संगीतात गायकाचं काम हे उद्यानातील जाणकार व्यक्तीसारखं आहे. गायक सुरुवातीला संथ लयीतील रचना निवडून त्या रागाची ओळख करून देतो. त्यातील प्रत्येक सुराची, ते सूर गुंफून तयार होणाऱ्या तानांची ओळख करून देतो. हे करत असताना तो स्वत: त्या रागाचा आनंद घेतो आणि श्रोत्याचा हात (खरंतर कान) धरून त्यालाही हा आनंद देतो, आनंद घ्यायला शिकवतो. एखादी तान, एखादा सूर आवडली तर तो स्वत: तिथे रेंगाळतो, श्रोत्यालाही रेंगाळवतो, आणि त्या जागेचा मनाजोगता आस्वाद घेऊन झाला की दुसरीकडे वळतो. संथ लयीत रागाची ओळख करून दिल्यावर, स्वत: पुन्हा ओळख करून घेतल्यावर, मध्यम किंवा दृत लयीचा वापर करून रागाच्या सीमांपर्यंत घोडदौड करून त्या वेगाचा आनंद घेतो. या सीमा पार करून जवळच्या रागांचाही आस्वाद घेतो आणि देतो. गायक आणि श्रोता यांनी एकत्र केलेली सुरांच्या प्रांतातील ही मुशाफिरी असते. ह्या प्रवासात दोघांना गतीचं भान द्यायला तबला आणि सुरांचं भान द्यायला तंबोरा हवाच. तबला नसेल तर गायकाला त्याचे प्रवाही सूर काळाचं आणि गतीचं भान राहू देणार नाहीत. तंबोरा नसेल तर सुरांची उड्डाणं जमीन सोडायला लावतील. शास्त्रीय संगीताची बांधणी अशी केलेली असते की गायकाला आणि काही प्रमाणात श्रोत्याला विहाराचं पूर्ण स्वातंत्र्य असत. त्यामुळे तोच राग, तीच बंदिश किंवा तोच ख्याल, त्याच गायकाने पुन्हा पुन्हा गायला तरी दरवेळी वेगळा गायला जातो, त्याचा आनंद दरवेळी वेगळा असतो. सुगम संगीत किंवा लोकसंगीत हे theme parks मधल्या rides सारखं किंवा शहरातल्या छोट्या बागांसारखं असतं. आखीव/रेखीव रस्त्यांवरून तुम्ही एकदा फिराल, दोनदा फिराल पण लवकरच त्याचा कंटाळा येईल.
शास्त्रीय संगीत हे असं आहे. नानगृहातील टबातली आंघोळ किंवा जलतरण तलावातील पोहणे नव्हे. एखादा राजहंस ज्याप्रमाणे तलावात विहरत राहतो, त्याप्रमाणे सुरांमध्ये दीर्घकाळ विहरत राहून आनंद घेण्याची कला श्रोत्यालाही आत्मसात करावी लागते.