Saturday, October 10, 2015

धरण बांधते, माझे मरण कांडिते

कोणे एके काळी सात आकाशापल्याडच्या प्रदेशात एक बुटक्या लोकांची वसाहत होती. वसाहतीची जागा मोठी निराळी. तिथून खाऱ्या पाण्याची नदी वाहत असे आणि जमीन लाल आणि दलदलीसारखी होती. हे बुटकेही विचित्र, त्यांना खाऱ्या पाण्याचीच तहान लागत असे. ती क्षरिता त्यांना भरपूर पाणी पुरवत असे. पण ती नदी त्यांचं सर्वस्व होतं, जीवनवाहिनीच जणू! काळाबरोबर बुटक्यांची वस्तीही वाढू लागली, वस्तीचे गाव आणि हळुहळू शहर झाले. नदीचे पाणी त्यांना पुरेना. बुटके होते हुशार त्यांनी त्या नदीवर धरण बांधून पाणी अडवायचे ठरवले. धरण बांधणार कशाचे? माती अशी दलदलीची, ती नदी काय अडवणार? त्यातल्या एक बुटका जरा जास्त हुशार होता. त्याच्या लक्षात आले की नदीतून कधीकधी थोडा चिकट गाळ येतो, तो किनाऱ्यावर बराच काळ चिकटून बसतो आणि काही काळाने नदीत वाहून जातो. हा गाळ गोळा करून जर आपण बांध घातला तर नदीचे पाणी अडवता येईल. बुटके कामाला लागले, त्यांनी थोडा थोडा करून पुरेसा गाळ गोळा केला आणि नदीवर धरण बांधले. नदीचे पाण्याचा भरपूर साठा झाल्यामुळे बुटक्यांना फार आनंद झाला, किंबहुना नदीत जरा जास्तच पाणी येऊ लागल्यासारखे वाटू लागले. हे वाढीव पाणी वापरण्यासाठी धरणाला दारे आली, धरण आणखी पक्के केले गेले. बुटक्यांना आपल्या कारागिरीचा अभिमान वाटू लागला. ही नदी कुठली, ती कुठून येते आणि कुठे जाते, तिचे प्रयोजन काय तिच्यात हा गाळ येतो कुठून, त्याचे प्रयोजन काय हे प्रश्न त्यांना पडले नाहीत असे नाही, पण सुखाच्या धुंदीत हा विचार बाजूला सरला.
--
जयंत बुट घालण्यासाठी वाकला आणि त्याच्या ओटीपोटातून असह्य कळ गेली. त्याच्या नकळत तो गुरासारखा ओरडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी मूतखड्याचे निदान केले. काही काळ बाहेरचे उपचार करून पाहिले पण उतार पडेना तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे दिसू लागले. एक दिवस त्यांनी लेझरच्या साह्याने मूतखडा काढून टाकला. जयंतला आराम मिळाला.
--
इकडे बुटक्यांच्या गावात, अचानक एक दिवस एक प्रखर दिव्याचा झोत आला आणि त्याने धरण फोडून टाकले, सारे शहर रातोरात उध्वस्त झाले. त्यातनं वाचले ते निसर्गाचा कोप वगैरे म्हणत दैवाला दोष देत इकडे तिकडे फिरताहेत.
--
सुश्रुतसंहितेत खालीलप्रमाणे वर्णन आहे
मूत्राशयो मलाधारः प्राणायतनमुत्तमम् | पक्वाशयगतास्तत्र नाड्यो मूत्रवहास्तु याः||
तर्पयन्ति सदा मूत्रं सरित: सागरं यथा | सूक्ष्मत्वान्नोपलभ्यन्ते मुखान्यासां सहस्रशः||
ज्याप्रमाणे नद्या सागरात (पृथ्वीवर पडणारे) पाणी विसर्जित करतात त्याप्रमाणे शरीरातील पाणी हजारो नाड्यांमधून मुत्राशयात जाते. जर या नाड्यांमध्ये बांध पडला तर माणसाला त्रास होतो, तर ह्या निसर्गरूपी पुरुषाला धरणांनी त्रास होत नसेल काय? माणूस जर तो त्रास दूर करायचा प्रयत्न करतो, तर निसर्गही करत नसेल काय?