Saturday, October 10, 2015

धरण बांधते, माझे मरण कांडिते

कोणे एके काळी सात आकाशापल्याडच्या प्रदेशात एक बुटक्या लोकांची वसाहत होती. वसाहतीची जागा मोठी निराळी. तिथून खाऱ्या पाण्याची नदी वाहत असे आणि जमीन लाल आणि दलदलीसारखी होती. हे बुटकेही विचित्र, त्यांना खाऱ्या पाण्याचीच तहान लागत असे. ती क्षरिता त्यांना भरपूर पाणी पुरवत असे. पण ती नदी त्यांचं सर्वस्व होतं, जीवनवाहिनीच जणू! काळाबरोबर बुटक्यांची वस्तीही वाढू लागली, वस्तीचे गाव आणि हळुहळू शहर झाले. नदीचे पाणी त्यांना पुरेना. बुटके होते हुशार त्यांनी त्या नदीवर धरण बांधून पाणी अडवायचे ठरवले. धरण बांधणार कशाचे? माती अशी दलदलीची, ती नदी काय अडवणार? त्यातल्या एक बुटका जरा जास्त हुशार होता. त्याच्या लक्षात आले की नदीतून कधीकधी थोडा चिकट गाळ येतो, तो किनाऱ्यावर बराच काळ चिकटून बसतो आणि काही काळाने नदीत वाहून जातो. हा गाळ गोळा करून जर आपण बांध घातला तर नदीचे पाणी अडवता येईल. बुटके कामाला लागले, त्यांनी थोडा थोडा करून पुरेसा गाळ गोळा केला आणि नदीवर धरण बांधले. नदीचे पाण्याचा भरपूर साठा झाल्यामुळे बुटक्यांना फार आनंद झाला, किंबहुना नदीत जरा जास्तच पाणी येऊ लागल्यासारखे वाटू लागले. हे वाढीव पाणी वापरण्यासाठी धरणाला दारे आली, धरण आणखी पक्के केले गेले. बुटक्यांना आपल्या कारागिरीचा अभिमान वाटू लागला. ही नदी कुठली, ती कुठून येते आणि कुठे जाते, तिचे प्रयोजन काय तिच्यात हा गाळ येतो कुठून, त्याचे प्रयोजन काय हे प्रश्न त्यांना पडले नाहीत असे नाही, पण सुखाच्या धुंदीत हा विचार बाजूला सरला.
--
जयंत बुट घालण्यासाठी वाकला आणि त्याच्या ओटीपोटातून असह्य कळ गेली. त्याच्या नकळत तो गुरासारखा ओरडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी मूतखड्याचे निदान केले. काही काळ बाहेरचे उपचार करून पाहिले पण उतार पडेना तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे दिसू लागले. एक दिवस त्यांनी लेझरच्या साह्याने मूतखडा काढून टाकला. जयंतला आराम मिळाला.
--
इकडे बुटक्यांच्या गावात, अचानक एक दिवस एक प्रखर दिव्याचा झोत आला आणि त्याने धरण फोडून टाकले, सारे शहर रातोरात उध्वस्त झाले. त्यातनं वाचले ते निसर्गाचा कोप वगैरे म्हणत दैवाला दोष देत इकडे तिकडे फिरताहेत.
--
सुश्रुतसंहितेत खालीलप्रमाणे वर्णन आहे
मूत्राशयो मलाधारः प्राणायतनमुत्तमम् | पक्वाशयगतास्तत्र नाड्यो मूत्रवहास्तु याः||
तर्पयन्ति सदा मूत्रं सरित: सागरं यथा | सूक्ष्मत्वान्नोपलभ्यन्ते मुखान्यासां सहस्रशः||
ज्याप्रमाणे नद्या सागरात (पृथ्वीवर पडणारे) पाणी विसर्जित करतात त्याप्रमाणे शरीरातील पाणी हजारो नाड्यांमधून मुत्राशयात जाते. जर या नाड्यांमध्ये बांध पडला तर माणसाला त्रास होतो, तर ह्या निसर्गरूपी पुरुषाला धरणांनी त्रास होत नसेल काय? माणूस जर तो त्रास दूर करायचा प्रयत्न करतो, तर निसर्गही करत नसेल काय?

Friday, May 01, 2015

एका वजनाची गोष्ट

रविवारची संध्याकाळ, मी बागेत चक्कर मारायला चाललो होतो. एक गृहस्थ समोरून येताना दिसले. नेहमीप्रमाणे मी हात हलवून, हसून मी ओळख दिली, त्यापलिकडे आमची ओळखही नाही, त्यांनीही ओळखीचे स्मित केले. नैमित्तिक उपचार आटोपल्यामुळे मी पुढे निघालो. पण या गृहस्थांनी मला हाक मारून थांबवले, "आपण बऱ्याचदा एकमेकांना पाहतो, पण आपली ओळख नाही", या प्रास्ताविकाने सुरु झालेली गाडी, नाव, गाव वगैरे नेहमीचे थांबे करीत, "काय करता आपण?" इथे येऊन पोचली.
"मी Database internals developer आहे", मी खरे उत्तर सांगितले, जे फार थोड्या लोकांना कळते.
गृहस्थांचा चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव!
"मी System programmer आहे", मी तेच वेगळ्या पद्धतीने सांगितले.
"म्हणजे software मध्ये का?", स्वत:च्या चेहऱ्यावरचा प्रश्नांच्या गुंत्यातून सुटलेली त्यांची नजर माझ्या सुटलेल्या पोटावर स्थिरावली.
"हं, वाटलंच मला, व्यायाम वगैरे करायला वेळ नसेल मिळत".
"हो ना, म्हणूनच आज फिरायला जातो आहे. सुट्टीचा तेवढाच सदुपयोग", गाडीला नकोसे वळण मिळालेले पाहून मी तिथून काढता पाय घेतला.

मी लहानपणापासूनच तसा दुधातुपाचं खाऊन ते अंगावर मिरवणारा माणूस. लहानपणीही कोणी मला बारक्या म्हणून हाक मारलेली आठवत नाही. मुलांबरोबर मी माझेही कपडे वाढत्या मापाने आणतो, बैठ्या कामामुळे पोट सुटलं आहे, गाल डोळ्यांची भेट घ्यायला आतूरलेले आहेत, हनुवटीला जोड मिळाली आहे, इ. गोष्टी समोरच्याच्या डोळ्यात जरा भरतात. लोक "तब्येत सुधारतीये हं" किंवा "लग्न मानवलेलं दिसतंय" वगैरे म्हणतात.

एक गृहस्थ जरा आणखी पुढे गेले. मी एकदा नेहमीच्या भेळवाल्याकडे दोन प्लेटनंतरची तिसरी प्लेट रिकामी करत होतो. त्या दिवशी भेळ जास्तच रंगल्यामुळे, नेहमीपेक्षा एखादी प्लेट जास्त मागवावी असा विचार करत असताना माझ्या समोरचे एक गृहस्थ भेळ खाऊन जाता जाता माझ्या अंगावर कुठल्याशा वजन कमी करण्याच्या course चे पत्रक टाकून गेले. जास्तीचीच काय पण होती ती सुद्धा प्लेट घशाखाली उतरेना!

रोडावला त्याला पाप्याचे पितर । वाढला अंगाने ढेरपोट्या ।।
लोक जैसा ओक धरिता धरवेना । त्यजुनिया जन ओरपावे ।।

तुकारामांनी हादेखील अभंग लिहून ठेवला असता तर माझ्यासारख्या लोकांवर किती उपकार झाले असते, पण त्यांनाही गाथेच्या वजनाची चिंता पडली असावी. आजपर्यंत यांपैकी कोणी लोक माझ्या घरापर्यंत पोचले नव्हते. घराबाहेरचं संकट टाळता येतं, घरातलं नाही.

पण आता हे संकट घरात येऊन पोचलं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून घरी आलो, तर हे बागेत भेटलेले गृहस्थ एका तरुणाबरोबर माझ्या घरी आलेले दिसले. समोर चहाचे रिकामे झालेले कप पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडतोय तोच ते मलाच भेटायला आल्याचं त्यांनी जाहीर केलं.
"हा माझा मुलगा", त्यांनी ओळख करून दिली.
"अरे वा, काय करतो, software मध्ये का?", त्याच्याही सुटू लागलेल्या पोटाकडे पाहत मी माफक सूड घेतला.
"पूर्वी software मध्ये होता, आता आहारतज्ञ म्हणून काम करतो.", गृहस्थ.
"Nutritionist", मुलाने सुधारणा केली.
"म्हणलं तुमची गाठ घालून द्यावी, तुम्हाला मदत होईल.", माझ्या पोटाकडे कटाक्ष टाकत ते गृहस्थ म्हणाले. "software मध्ये राहून वाढलेले स्वत:चे वजन कमी करण्यासाठी त्याने हा अभ्यास सुरू केला आणि आता तो इतरांना पण मदत करतो."
"आम्ही introductory session नी सुरुवात करतो. म्हणजे carbohydrates, proteins वगैरेंची ओळख करून देऊन सुरुवात करतो आणि शेवटी तुम्हाला तुमचा diet chart करून देतो. तो पाळला की वजन कसे हा हा म्हणता उतरते.", आहारतज्ञांनी त्या शब्दाचा सूड घेत माहिती पुरवली. मला एकदम शाळेत जाऊन बसल्यासारखं वाटलं.
"तुम्ही आहार ठरवताना वात, पित्त, कफ या गुणांचा विचार करता का?", मी गुगली टाकायचा आयुर्वेदिक प्रयत्न केला, पण तो no ball ठरला.
"छे! छे ते सगळं बकवास आहे, आम्ही latest research चा विचार करून आहार ठरवतो. यानंतर fats, metabolism, muscles, proteins हे इंग्लिश शब्द आणि त्यांना जोडायला मराठी व्याकरण वापरून त्यानं एक लांबलचक व्याख्यान दिलं. माझ्या पोटातले कावळेदेखील तेच ओरडताहेत असा मला भास होऊ लागला. तो जे बोलला सगळ्याचा सारांश मी रोज खात असलेलं अन्न निकस असून (हे निकस अन्न खाऊन कावळे एवढे ओरडतात, मग सकस खाल्लं तर?) डॅमवे कंपनी अत्यंत सकस अन्न पावडरी आणि गोळ्यांच्या स्वरूपात विकते, ते मी घेवून वजन कमी करावे. त्या गोळ्यांच्या किंमती ऐकून कमी होणाऱ्या वजनात खिशाचेच वजन जास्त असेल अशी मला शंका आली. ज्या अन्नावर आमच्या कित्येक पिढ्या (आणि त्यांच्या पोटातले कावळे) पोसल्या आणि चांगली सोन्याची फुलं डोक्यावर पाडून स्वर्गलोकी गेल्या त्या अन्नाला हा कालचा पोर माझ्याच घरात बसून निकस वगैरे म्हणत होता. पण इथे तात्विक वाद घालून उपयोग नाही हे माझ्या ध्यानात आलं. काहीतरी झटपट मार्ग हवा होता.
"तुमच्याकडे EMI ची सोय आहे का?", पैशाचे सोंग दिसले नाही की सगळे नाटकच बाद होते.
"EMI, EMI, हप्त्याने खरेदी करण्याची सोय, आहे का?", त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून मी स्पष्ट केले.
त्या दिवसानंतर हे बापलेक माझ्या मागे बडा घर पोकळ वासा असे काहीसे सांगत हिंडतात असे ऐकिवात आले आहे. हा गैरसमज सध्यातरी माझ्या फायद्याचा आहे. घरात आलेलं संकट पोकळ वाश्यामुळे सध्यातरी टळलं आहे.