"एकदम बारीक काप केस", मी.
"भांग पाडायला ठेवू का?", न्हावी.
"भांग पडला नाही तरी चालेल", मी.
"मशीन लावू का?", न्हावी.
"चालेल", मी.
दरवेळी केस कापायला गेलो की केस कापण्याची सुरुवात या संवादांनी, आणि शेवट,
"ठीक आहेत का?", न्हावी, डोक्याच्या मागे आरसा फिरवत.
"पुढचे केस आणखी कमी चालतील.", मी.
"मग भांग पडणार नाही?", न्हावी. काम संपलं अशा समजुतीत असणाऱ्या सर्व कामगारांचा (मग तो software engineer का असेना) चेहरा अजून काम बाकी आहे हे कळल्यावर एकसारखाच पडतो.
यानंतर या संवादांचा एकसुरीपणा घालवण्यासाठी, मी "मला कुठे मिरवायला जायचंय", "आठवडाभरात भांग पडायला लागेल, तू काप" इथपासून ते "तुला सुरुवातीलाच तर सांगितलं होतं" इथपर्यंत वेगवेगळी उत्तरं देतो तेव्हातेव्हाच्या मन:स्थितीनुसार देतो. सगळ्याचा शेवट न्हाव्याने माझे केस डोकेसपाट करण्यात होतो. असं हे वर्षानुवर्षं चाललं आहे. न्हावी बदलले, न्हाव्याकडची माणसं बदलली, तरी हे संवाद बदलत नाहीत.
परवा मात्र जरा बदल झाला. न्हाव्याचे मन बंड करून उठले असावे. "पुढच्या वेळी तुम्ही ८-१२ सांगा म्हणजे बरोबर कापतो. पहिल्यांदा भांग पाडण्याजोगे केस ठेवायचे आणि नंतर ते कमी करायचे म्हणजे दुप्पट वेळ जातो." मग सावरून घेत तो म्हणाला, "म्हणजे आमचा काय धंदाच आहे, आम्ही इथेच असतो, पण तुम्ही कशाला तुमचे तास वाया घालवता?". "लेका, तू दरवेळी सांगून पहिल्यांदा केस चुकीचे कापतोस, ती चूक कोणाची?" हे तोंडावर आलेले वाक्य मी गिळले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, माझा वेळ वाया जात होता खरे. पण मग इतक्या वर्षांत हे मला का उमगले नाही?
याची गोम न्हाव्याच्या खुर्चीत आहे. या खुर्चीत बसले की डोके अक्षरश: दुसऱ्याकडे गहाण ठेवावे लागते, म्हणजे त्याचे काम संपले. हात, पाय हलवल्यास आपल्यालाच इजा होण्याची शक्यता असते, म्हणजे तेही काम संपले. न्हावी मशीन फरवताना, किंवा कात्री चालवताना कानाचा टवका उडवेल, ही छोटीशी भीती सोडल्यास मनाला आणि शरीराला कुठलेही काम नसल्याने, आपण एकप्रकारच्या ध्यानावस्थेत शिरू लागतो. संसारात कितीही प्रयत्न केले तरीही शक्य नसलेली ही अवस्था इथे विनासायास जमते. एकीकडे डोक्यावरचे ओझे कमी होत जाते, आणि दुसरीकडे डोक्याच्या आतले. तुमचे भाग्य असेल तर समाधीचा अनुभवही येतो. तिथून बाहेर पडताना मन कसे उल्हसित होते. ह्यासाठी तासभराची किंमत काहीच नाही.
"हरकत नाही, तू तुझा वेळ घेत जा", न्हाव्याचा चेहरा आता पारच पडला. मी पुढच्या वेळी ८ - १२ तर सांगणारच नाहीये, उलट १२ - ८ च सांगणार आहे, असा निर्धार करून मी बाहेर पडलो.