मी खुर्चीत बसलो होतो. माझी नऊ महिन्यांची मुलगी सरकत त्या खुर्चीपाशी आली. तिला माझ्या मांडीवर बसायचे असावे असे दिसत होते. खुर्चीच्या खालच्या एका फळीला धरून तिने उभे राहण्याचा प्रयत्न केला. तिचे पाय फरशीवरून घसरले, आणि पुरेसा जोर न देता आल्याने ती घसरून पडली. तिने पुऩ्हा प्रयत्न केला, ती पुऩ्हा पडली. आपल्याला उभे राहणे जमत नसल्याचे दिसताच, तिने माझ्याकडे पहात रडायला सुरुवात केली. मला तिला उचलून घेता येणे सहज शक्य होते, पण मग तिने तिचे प्रयत्न सोडले असते. मला तिचे प्रयत्न करणे थांबवायचे नव्हते, स्वत:च्या प्रयत्नाने ती माझ्या मांडीवर चढलेली मला जास्त आवडले असते. मी तिच्याकडे पाहून तिला पुऩ्हा प्रयत्न करण्यासाठी सुचवू लागलो. मी तिला का उचलून घेत नाही हे कदाचित तिला कळले नसावे. तिने माझ्याकडे निराश होऊन पाहिले आणि दुसऱ्या खेळण्याकडे वळली.
देवा, तूही असाच वागतोस का रे?