तळलेल्या बटाट्याच्या फोडी, मेयोनिज, उकडलेलं अर्धं अव्होकॅडो आणि त्यावर चीजमधे टोमॅटोचे तुकडे असं खायला मिळाल्यावर जो आनंद झाला तो काय वर्णावा. सोया सॉस, नुडल्स, तोफू, असं खाऊन अळणी झालेल्या तोंडात जरा चविष्ट काहीतरी पडेल या अपेक्षेनं, रात्री नऊ वाजता 'दो दिवाने टोकियो शहर में' Subway शोधत निघालो होतो. Subway मधे तरी निदान वेगळे सॉस, ब्रेड आणि बऱ्याच भाज्या असं काही मिळेल अशा अपेक्षेनं गिंझामधे हिंडत होतो. त्या गल्ल्यांमध्ये हिंडता हिंडता नऊचे अकरा वाजले, पायाची चाळण व्हायची वेळ आली तरी Subway काही सापडलं नाही. शेवटी, कावळे ओरडून ओरडून थकले, आजूबाजूची दुकानं बंद होत आली. निदान Ice-cream मिळेल या आशेनं हॉटेलकडे परत निघालो. हॉटेलच्या जवळच Denny's Diner नावाचं restaurant दिसलं आणि आत शिरलो. वेटरने menu card दिलं. त्यात प्रत्येक पदार्थाबरोबर त्याचं छायाचित्रही दिलं होतं. जपानमध्ये menu card मध्ये पदार्थांची चित्रंही असतात, एवढंच नव्हे तर काही restaurants मध्ये तर दर्शनी भागात तिथे मिळणाऱ्या पदार्थांचं प्रदर्शन मांडलेलं असतं. परदेशी गिऱ्हाईकांची सोय हे लोक अशीही पाहत असावेत. आम्ही त्या चित्रांमध्ये, (कारण काय लिहिलंय हे वाचता येत नव्हतं) काही शाकाहारी दिसतंय का याचा अंदाज लावू लागलो. जरा शाकाहारी वाटणाऱ्या पदार्थांवर बोट ठेवून वेटरकडून ते शाकाहारी असल्याची खात्री करून घेत होतो. जपानमध्ये नुसतं non-vegetarian असं सांगून चालत नाही, "No meat, No fish" असं बरेच हातवारे करत सांगावं लागतं. ज्याला सांगतो आहोत त्याला ते कळलं तर ठीक, नाहीतर तो दुसऱ्याला बोलावतो, मग त्याला पुऩ्हा सगळे हातवारे वगैरे चालू. या सगळ्या प्रकारात तो नुसतं meat, fish ऐकून meat, fish असलेलेच पदार्थ पुढे करण्याची शक्यता असते, त्याकडे लक्ष द्यावं लागतं. हे सगळे सोपस्कार झाल्यावर, एका वेटरने आम्हाला menu card मधल्या प्रत्येक पानावर एकतरी शाकाहारी पदार्थ दाखवल्यावर मला त्या वेटरमध्ये ब्रह्म दिसल्याचा साक्षात्कार झाला. त्या पदार्थांच्या दर्शनाने पोटातले कावळे जागे होऊन ओरडू लागल्याने, या निर्वाणाची आयती संधी मात्र हुकली. एरवी ज्या बटाट्यांसाठी भारतात एखादी नोटसुद्धा मी टिकवली नसती त्यांच्यासाठी काहीशे येन (म्हणजेही एक नोटच, हा भाग अलाहिदा) मोजून, तृप्त होऊन आम्ही बाहेर पडलो.
इथले वेटर काय, दुकानातले विक्रेते काय ही लोकं कमालीची अगत्यशील आणि नम्र आहेत. कुठल्याही हॉटेलात, दुकानात शिरलं की जिथे असतील तिथून ते आपल्याला स्वागतपर शब्द ऐकवतील, अगत्याने स्वागत करतील, योग्य ती विचारपूस करतील आणि गिऱ्हाईकाचं समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. "ग्राहकाचे समाधान हेच आमचे ब्रीद" वगैरे काही पाट्या लावायची गरजच नाही. हे विक्रेते त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मितातच अशा पाट्या घेऊन वावरत असतात. जपान्यांना याचं काही विशेष वाटत नसलं तरी माझ्यासारख्या पुणेकरासाठी ते आठवं आश्चर्यच. हे दुष्प्राप्य सुख मिळवायला कुठल्याही हॉटेलमध्ये शिरून No meat, No fish चा दशावतारी रंगवायची माझी तयारी आहे. Subway शोधायचा एक प्रयत्न असफल ठरल्यावर, मी पुऩ्हा प्रयत्न करायचं ठरवलं. मी राहत असलेल्या हॉटेलच्या स्वागतकक्षात जाऊन जवळचं Subway कुठे आहे, हे विचारलं. त्या पोरानं मला ते रस्त्याच्या पलिकडेच असल्याचं सांगितलं. "आपण काल एवढी तंगडतोड उगाचच केली का?" असा प्रश्न मनात ठेवून मी धावतच रस्ता ओलांडला, पण तिथे Subway च काय पण त्यातला 'S' सुद्धा दिसला नाही. मी तणतणतच परत आलो, आणि पुऩ्हा विचारलं. तो पोरगा कमालीचा गोंधळला, तो पुऩ्हा पुऩ्हा मला Subway तिथेच आहे हे सांगू लागला. बराच वेळ अशा गोंधळात गेल्यावर एकदम डोक्यात पडलेला प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. मला Subway restaurant हवं होतं आणि हा पठ्ठ्या मला Subway चं station दाखवत होता. जपानमध्ये ही Subway ची stations जागोजागी आहेत. मग त्याने मला जवळच्या Subway चा पत्ता सांगायला सुरुवात केली. त्याचं बोलणं मला समजत नव्हतं, माझं त्याला, पण तरीही तो पोरगा इरेला पेटला होता. त्याने मी भारतीय असल्याचं पाहून एका हिंदी बोलणाऱ्या पोरीला बोलावलं. तिचं जपानी हिंदी, माझं मराठी हिंदी अशी जुगलबंदी काही काळ रंगल्यावर मला Subway चा पत्ता कळला. ते आणि मी सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
Pasmo card घेऊन टोकियोत फिरण्याइतकं सुख नाही. दर दोनचार मिनटाला सुटणाऱ्या subway trains मुळे जवळजवळ कुठे थांबावं लागतच नाही. Subway च्या जाळ्य़ांचा नकाशा हातात असला की टोकियोत कुठेही बिनधास्त फिरा. जमिनीखाली पसरलेल्या अवाढव्य वारुळाची तोंडं जमिनीवर जिकडेतिकडे फुटावीत तशी Subway stations ची तोंडं जिकडेतिकडे जवळच्या पदपथांवर फुटतात आणि त्यांतून जपानी माणसं मुंग्यांसारखी तुरुतुरु धावत असतात. या Subways मध्ये जिकडेतिकडे English पाट्या आहेत म्हणून बरं नाही तर जपानी लोकांचं English शी फारसं सख्य नाही, त्यात उच्चारांमधले फरक. एखाद्या जपानी माणसाला नुसतं बघून त्याला English येत असेल का नाही हा अंदाजच बांधता येत नाही. चांगला शिकला सवरलेला, सुटबुटातला जपानी English च्या बाबतीत ठार अडाणी असू शकतो. "Where is Yoyogi park?", मी एका माणसाला विचारलं. त्यानी आधीच बारीक असलेले डोळे अधिकच बारीक करून, कपाळावरच्या आठ्यांच्या जाळ्यातनं हात फिरवून विचार केला, आणि भयंकर खिन्न होऊन त्याने आपल्याला प्रश्न कळला नाही असे हातवारे केले. एका परदेशी माणसाला आपल्याला मदत करता येत नाही ह्याचं त्याला भयंकर दु:ख झालं असावं. एकूणच, समोरच्या माणसाला गरज असेल, आणि मदत करता आली नाही तर हे लोक भयंकर हळहळतात. टोकियोच्या दाट इमारतींमध्ये ठिकठिकाणी सुंदर बागा आहेत. Yoyogi park ही अशीच एक बाग (खरं तर उपवन), सम्राट मेजी आणि त्याच्या राणीच्या सन्मानार्थ उभारलेलं. ह्या सगळ्या बागांंमध्ये एखादं तळं, तळ्यात कासवं, मासे, भरपूर झाडं आणि या सगळ्याचा नीट आस्वाद घेता यावा म्हणून तयार केलेल्या सुबक मार्गिका, बसायला बाकं आहेत. आपण जगातल्या सर्वात गजबजलेल्या शहरात आहोत याचा पूर्ण विसर पडून मन ताजंतवानं करण्याची जादू या बागांंमध्ये भरलेली आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी असलेली भव्य आणि कमालीची स्वच्छ असलेली देवळंही प्रेक्षणीय आहेत. दिवसभर काम करून संध्याकाळी अशा एखाद्या बागेत किंवा देवळात जावं, सगळा शीण निघून जातो.
टोकियोतला आठवडाभराचा मुक्काम संपवून, मी हानेडा विमानतळावर पोचलो, आणि सिंगापूरमार्गे मुंबईत पोचलो. पाय मुंबईत उतरले तरी मन अजूनही जपान, सिंगापूरमध्येच गुंतलं होतं. Fragile असा शिक्का असलेलं माझं सामान उलट्यापालट्या अवस्थेत मला मिळालं, एअरपोर्टच्या बाहेर पार्कींगवाला पोऱ्या ड्रायव्हरवर खेकसला, चेंबूरच्या Subway मध्ये 'आत्ता फक्त चहा, कोकोच मिळेल, कॉफी मिळणार नाही, चीझ संपलं आहे' वगैरे उद्धट आवाजात ऐकलं. जपान, सिंगापूरमध्ये रमलेलं माझं मन क्षणात मुंबईत आलं, आणि माझ्या जपानवारीची भारतीय सांगता झाली.