"काय झालं रे तुला?" - ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या एका मित्रानं विचारलं.
"का? काही नाही" - मी गोंधळून उत्तरलो.
"अरे तुझे केस असे अस्ताव्यस्त का? मला वाटलं काय झालं!".
अशा संवादातून आता केस कापायला झाले आहेत असं कळतं, तसे एखादा सोयीस्कर रविवार पाहून पाय ऩ्हाव्याकडे वळतात.
या रविवारीही सकाळी मी असाच ऩ्हाव्याचा रस्ता धरला. रस्त्यात जाताना काही ओळखीची लोकं भेटली. त्यांना हसून ओळख देऊन पुढे जात होतो, पण त्यांच्या प्रतिक्रिया विचित्र येत होत्या. ते हसताना थोडा खट्याळपणा, कुत्सितपणा जाणवत होता.
सकाळी फिरून येणारे काही ज्येष्ठ नागरीक मला ओलांडून गेले.
"सकाळी सकाळीच! आजकालची तरुण मंडळी काय करतील हे सांगता येत नाही." - ज्ये. ना. १
"पण याला मी कधी असे पाहिलेले आठवत नाही, हे नवीनच दिसते आहे." - ज्ये. ना. २
"मी म्हणतो, होतं असं कधीकधी, हल्ली टेंशन्स पण असतात, त्यातनं अशीही सुटका होते. पण इतर अनेक उपाय असताना, अशा शिकल्यासवरल्या चांगली नोकरी करणाऱ्यांनी हे करावं, अरारा!" - ज्ये. ना. ३
"अहो, मी असं ऐकलं आहे, की खूप सवय झाली की फारसा परिणाम होत नाही म्हणे, मग काहीतरी जोरदार लागतं. त्यामुळेच असेल. म्हणजे, पूर्वी घरातल्या घरात चालत असणार. आपल्याला कुठे कळायला ह्या गोष्टी. आता फारच वाढलं तसं बाहेरही!" - ज्ये. ना. १ एक डोळा मारत, इतरांना टाळ्या देत म्हणाले.
"आणि शिकल्यासवरलेल्यांचं आणि चांगल्या नोकरीचं काय म्हणता, त्या बारामतीच्या नेत्यांचं नाही का तसं . . ." - ज्ये. ना. २
ते कोणाबद्दल बोलताहेत हे मला कळेना, मी ते बोलणं कानाआड करेपर्यंत दुसरे गृहस्थ भेटले.
"काय झालं हो?, खूप दुखतं आहे का?".
"हो ना, कालच ऑपरेशन झालं."
"काय ऑपरेशनपर्यंत गेलं, आणि तरीही अजून चालूच. बरोबर आहे या सवयी अशा सुटत नाहीत. पण आता सोडा बरं का!"
मी काही बोलायच्या आत ते गृहस्थ बरेच पुढे गेले होते. काहीतरी चुकत होतं आणि ते मला कळत नव्हतं. मी कपडे वगैरे तपासले, सगळं व्यवस्थित होतं. आणखी काही कुत्सित नजरा झेलत मी ऩ्हाव्याकडे पोहोचलो. "आज गुळणी लावून आला का, साहेब?" मी खुर्चीत बसता बसता ऩ्हाव्यानं कसलाही मुलाहिजा न बाळगता प्रश्न केला. मी उत्तर देणार इतक्यात आरशात पाहून एकदम प्रकाश पडला. आदल्या दिवशी माझी अक्कलदाढ काढली होती, ती ही ऑपरेशन करून. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं, "आज आणि उद्या बर्फानं गाल शेक, अगदी दिवसातून ४/५ वेळा. कितीही काळजी घेतली तरी दाढेच्या इथे सूज येते." थोडं मिस्किलपणे गालाशेजारी ओंजळ नेत त्यांनी पुस्तीजोडली, "अगदी गाल असा फुगतो." आता त्या मिस्किलपणाचा अर्थ माझ्यापुढे होता. कालपासून न फुगलेला तो गाल आता खालच्या बाजूला फुगला होता, अगदी तंबाखूची गुळणी धरून बसल्यासारखा! त्यात जखमेमुळे जास्त प्रमाणात सुटणाऱ्या लाळेला धरून ठेवण्यासाठी मी ओठही आवळले होते. काल ऑपरेशन करताना ओठाला झालेली जखम मधून मधून उलत होती आणि त्यामुळे ओठांचा भाग लाल होत होता. सगळा गेटअप अगदी जुळून आला होता. मगाशी कानावरून गेलेल्या बोलण्यांचा अर्थ मला आत्ता लागला आणि हसू आले. "अरे, कसली गुळणी, माझ्या दाढेचे ऑपरेशन झाले आहे काल, जरा जपून काम कर तुझं", मी ऩ्हाव्याला सूचना केली. "दाढेचं दुखणं म्हणजे लय बेकार", त्याचा चेष्टेचा स्वर बदलून त्याची जागा सहानुभूतीने घेतली होती, "जाताना रुमाल धरा तिथं म्हणजे गैरसमज नाही होणार".