गावात कामं करत हिंडल्यामुळे पाय आणि पोटातले कावळे एकाच वेळी ओरडू लागले होते (अशावेळी पाय बोलतात, पण त्यांनी पुढची 'पाय'री गाठली होती). खुन्या मुरलीधराच्या बोळातून जाताना 'पोटोबा' दिसलं. घरची आठवण - असा पोटोबावाल्यांचा दावा आहे, माझा नाही. "घरच्या चवीची सर बाहेरच्या खाद्यपदार्थांना कशी येईल?" हे माझे मत माझ्या बायकोच्या आणि आईच्या (किंबहुना बऱ्याच गृहिणींच्या) स्वयंपाकाची स्तुती करणारे असले तरी ह्या सबबीखाली मी त्यांना बाहेर नेणे टाळतो असा त्यांचा समज असल्याने, त्या ह्या स्तुतीला नम्रपणे, "हा, छोट्याशा गोष्टीची पण स्तुती करतो" वगैरे उत्तरे देतात. असो, तर 'घरची आठवण' येणारे थालीपीठ, पिठलं, फोडणीची पोळी वगैरे ज्या उपाहारगृहात (हा शब्द इथे वापरायला चांगला आहे) मिळते ते कसे आहे ते तरी बघू या कुतुहलापोटी मी आणि माझी बायको आत शिरलो.
चकचकीत सजावट (मराठीत याला आता interior असे म्हणतात.), आत A.C. हॉल, सजावटीला साजेसा गणवेष घातलेले नोकर वगैरे पाहून मी थोडा बावरलो. 'कल्याण'च्या चकचकीत A.C. दुकानात भेळ खाताना बावरलो होतो तितका नाही पण बावरलो. भेळ, पाणीपुरी हे पदार्थ म्हणजे हातगाडीवर, किंवा फारतर या पदार्थांचा आद्य घटक असलेल्या चिंचेच्या पाण्याची पुटं चढलेली असावीत असा भिंतींचा रंग असणाऱ्या दुकानात खाता येतात. तसं असल्याशिवाय त्या पदार्थांची चव लागत नाही आणि समाधानही होत नाही. A.C च्या गारव्यात गार चिंचेच्या पाण्याला आंबट चव असते किंवा पाणीपुरीच्या पाण्याला पुदिन्याचा वास आणि खमंगपणा असतो पण त्यानं मिटक्या मारत खाण्याचं सुख मिळत नाही. अशा पंचतारांकित दुकानात जाताना तसेच कपडे घालावे लागतात. त्यामुळे हे पदार्थ खातानाची निम्मी मजा, पाणीपुरी तोंडात टाकता टाकता फुटली (तशी ती नाही फुटली तर मजा काय?) तर त्या पाण्याने कपडे घाण होतील वगैरे पंचतारांकित चिंतां घालवतात. उरलेली, या पदार्थांच्या पंचतारांकित किंमतींमुळे! रस्त्यावर ज्या पैशात तुडुंब भेळ, पाणीपुरी खाऊन पोट आणि जीभ दोऩ्ही तृप्त होतात, त्याच पैशात इथे तोंडाला पाणीदेखील सुटत नाही.
आम्ही 'पोटोबा'त एका टेबलावर बसलो. तिथल्या पदार्थांच्या यादीत फक्त घरचीच नव्हे तर देशोदेशींची आठवण येईल असेही पदार्थ होते. पण तरीही आपण घरचेच पदार्थ मागवायचे असे आम्ही ठरवले. फोडणीची पोळी, भाकरी वगैरे अतिपरिचयात अवज्ञा झालेले पदार्थ मागवण्याचा धीर झाला नाही आणि बाकी मानाचे पदार्थ जेवणाच्या वेळातच मिळतात असे कळले. त्यातल्या त्यात म्हणून आम्ही थालीपीठ मागवले. नोकरांच्या 'अगत्या'वरून, आणि वागण्यावरून चकचकीत गणवेषाच्या आतला मामला चिरपरिचयाचा पुणेरी आहे हे पाहून थोडा धीर आला. थोड्या वेळाने थालीपीठ आले आणि त्याबरोबर तोंडीलावणे म्हणून लोणी आणि चटणी! ते लोणी खाताना मला थोडं पिठूळ लागले म्हणून एका नोकराला विचारलं, "हे काय आहे?". त्या वाक्यातली खोच लक्षात न घेता त्याने मला, "हे लोणी आहे, ते थालीपीठाला लावून खातात." अशी उपयुक्त माहिती दिली.
"ते मला माहित आहे, पण ते पिठूळ आहे, आणि ते गरम थालीपीठावर टाकले तरी वितळत नाहीये" - मी
"साहेब, लोणी असेच असते" - तो. आमच्या घरच्या आठवणींमध्ये लोण्याची आठवण नसावी, असा त्याचा समज झाला असावा.
"हो बरोबरे, आम्ही घरात मऊ, मुलायम, चटकन वितळणारे जे खातो ते लोणी नसावे" - मी शक्य तितक्या थंड आवाजात म्हणालो.
फार काही लक्ष न देता तो निघून गेला. मी ते थालीपीठ चटणीबरोबर खाऊ लागलो.
थोडा वेळ गेला, आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. थालीपीठाची चवही छान होती, त्यामुळे लोण्य़ावरून लक्ष उडाले होते. तेवढ्यात एक मध्यमवयीन गृहस्थ आमच्या शेजारच्या टेबलावर येऊन बसले. माझे त्यांच्याकडे लक्ष जाताच, त्यांनी माझ्याशी बोलायला सुरूवात केली,
"हे (माझ्या समोरच्या थालपीठाकडे बोट दाखवत) आम्ही आमच्याकडे बनवतो, बरं का!" मगाशी तो नोकर मला लोणी म्हणजे काय ते सांगून गेला, आता हा माणूस मला थालपीठ 'घरीही' बनते हे सांगत होता.
"हो का, आमच्याही घरी बनवतात", या वेळी आपण पडते घ्यायचे नाही असे मीही ठरवले.
"माझी बायको स्वत: धान्य दळून भाजणी घरी बनवते", त्यांनी आपलं गाडं पुढे रेटलं.
"माझीही बायको आणि आई घरीच भाजणी बनवतात. आम्हीही थालीपीठ घरीच बनवून खातो, आज इथे केवळ भूक लागली म्हणून शिरलो." - मीही उत्तरलो.
"म्हणजे, आम्ही मसालेही अगदी घरी बनवतो बरं का!", माझा चेहरा पाहून ते आजोबा पुढचं काही बोलले नाहीत.
मला कुठंतरी गणित चुकल्यासारखं वाटलं. ते गप्प झालेले पाहून, मी आणि माझ्या बायकोने उरलेल्या गप्पा सुरू केल्या. एकीकडे आमचे लक्ष त्या गॄहस्थांकडे होतेच. त्या गृहस्थांनी नोकराला बोलावून आपण फक्त चहा आणि साबुदाणा वडा घेणार असल्याचं सांगितलं. एकूण त्यांचा तिथला वावर, नोकरांना हुकुम सोडण्यातली सहजता, आणि पोटोबाविषयीची आपुलकी पाहून आम्हाला ते मालक आहेत की काय असा संशय आला.
"तुम्ही इथले मालक काय?" - मी त्यांना विचारलं. त्यांनी समाधानपूर्वक होकारार्थी मान हलवली. आत्ता मला मगाचच्या त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागला आणि माझ्या उद्धट बोलण्याबद्दल मी त्यांची माफी मागितली. लगे हाथो माझी लोण्याची मागणी मी वरिष्ठांकडे नेली. त्यांनीही लगेच ते लोणी पाहून नोकराला ते बदलून आणायला सांगितले. पुऩ्हा श्रोता मिळाल्याने,त्यांनी पोटोबा आख्यान पुढे सुरू केले. त्यातून मला तिथले स्वयंपाकघर ३००० स्क्वे. फु. आहे, तिथे मोठे exhaust fans आहेत, A.C. हॉल मध्ये दोन A.C. आहेत, सजावटीला किती खर्च आला वगैरे तपशील कळले. एव्हाना लोणी आले, तेही पिठूळच होते. पण आमचे खाणे संपले होते, त्यामुळे त्याकडे लक्ष न देता आम्ही आजोबांना नमस्कार करून बाहेर पडलो.