सकाळी खिडकीच्या पडद्यावर समोरच्या ओढ्याच्या पटावर खंड्या, धोबी आणि वंचक हे नेहमीचे कलाकार आपली कला सादर करून जातात. हा दोन अंकी खेळ उष:पानाची लज्जत वाढवतो. अगदी पहाटे खंड्याची शिट्टी ऐकू येते आणि पडदा उघडतो. समोरच्या गंज लावलेल्या (galvanized) कुंपणावर, त्याच रंगाचे पंख असलेला खंड्या बसलेला दिसतो. नजर एकटक ओढ्यावर लावून बिलकुल हालचाल न करता स्वारी पाण्यातील हालचालीचा वेध घेत असते. भक्ष्य टप्यात आले की क्षणात आपले मोरपंखी निळे रुबाबदार पंख पसरून झेप घेत पाण्यातले सावज चोचीत पकडून पुन्हा उलटून कुंपणावर येईपर्यंत आपल्याला कळतही नाही. ते खाणे गट्टम करून पुन्हा समाधी लागलेली. मधल्या वेळात बराच वेळ सावज दिसले नाही तर चोच साफ करणे, आळस देणे वगैरे कार्यक्रमही चालतात. जसजशी उन्हं चढतील तसा डावीकडे सरकत सरकत खंड्या डाव्या विंगेतून दृष्टीआडा होतो. एव्हाना डावीकडूनच उजवीकडे, एक एक करत, तीन चार वंचकांचं पटावर आगमन झालेलं असतं. हा पक्षी बगळा आणि बदक यांचं मिश्रण आहे. बहुतेक शरीर बगळ्यासारखं आणि पिसं आणि रंग मात्र करड्या बदकासारखं असं असल्यामुळे त्याला ’वंचक’ (वंचना करणारा) म्हणत असावेत. खंड्या एकटा येतो पण वंचक मात्र थव्यानी येतात. खंड्याचा धीर त्याच्यात नसतो पण दोघांचं सावज एकच असतं. त्यांच्या शिकारीच्या लकबी आणि हालचालींमध्ये मांजरांचा भास होतो. मांजरांप्रमाणे ते एकमेकांशी खेळतात, गुरकावतात, पावित्रे घेतात. पुरेसं खाद्य मिळालं की पंख पसरून, पिंगट करड्या पंखांखालच्या पांढऱ्या शुभ्र अंगाचं दर्शन देत डावीकडच्या विंगेत उडून जातात. हे चालू असताना मधेच पोट आणि कंबरेचा भाग पिवळा, आणि काळे, पिंगट करडे पंख असलेल्या छोट्या धोब्याकडे लक्ष जातं. हा पक्षी कधी येतो आणी कधी जातो कळत नाही. पण लग्नाच्या लगबगीत छोटी पोरं जशी मधेमधे नाचत असतात तसा हा ओढ्याच्या काठावर बागडत असतो. मधेच आपले बुड धोब्यानं कपडे आपटावे तसे वर खाली हलवत असतो. ओढ्याला पाणी जास्त असेल तेव्हा हे नाटक जरा जास्त वेळ चालते. व्यासपीठ रिकामे झाले की दिवसाचे भान येते आणि मी कामाच्या रगाड्यात बुडून जातो.
समोरच्या ओढ्यात हे नाटक, तर वरती नारळांच्या आधाराने शिवाशिवीचा खेळ रंगतो. नारळांcया उंच झाडांवर घारींची घरटी असतात. त्यांवर लक्ष ठेवून आकाशात घिरट्या मारत घारी भक्ष्य हेरतात. भक्ष्य टप्यात दिसले की झडप घालून त्या ते खाण्यासाठी आडोसा शोधू लागतात किंवा घरट्य़ाकडे जाऊ लागतात. नेमके तेव्हा धूर्त कावळे, त्यांचा पाठलाग करायला लागतात. घारीसारख्या बलाढ्य आणि क्रूर पक्षाला कावळ्यासारखा सामान्य पक्षी हैराण करून सोडतो. घारीला भक्ष्य मिळाले की कावळ्यापासून वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. एक घार एका कावळ्याला चकवू शकेल कदाचित, पण ती अनेक कावळ्यांपुढे हतबल होते. या घारी एकमेकांना मदत का करत नाहीत कोण जाणे?
बराच वेळ रिकामा असेल तर गच्चीत पक्षांसाठी पोळीचे तुकडे टाकावे, पाणी ठेवावे आणि बघत बसावे. पहिल्यांदा त्यातले मोठे मोठे तुकडे कावळ्यांसारखे मोठे पक्षी घेऊन जातात. कावळे या बाबतीत मोठे चतुर असतात. त्यांना पोळी जशीच्या तशी खायला जड जात असावी. वाळलेली भाकरी काहीजण ज्याप्रमाणे पाण्यात मऊ करून खातात्, त्याप्रमाणे कावळे पोळ्या पाण्यात बुडवून मऊ करून खातात. मग मध्यम आकाराचे तुकडे मध्यम आकाराचे बुलबुल सारखे पक्षी येऊन खातात. त्याहूनही लहान तुकडे मग चिमण्या, फुलचुखे वगैरे लहान पक्षी खातात. मोठ्या आकाराचे तुकडे खाताना मोठ्या पक्षांनी टाकलेले लहान तुकडे अनायासे लहान पक्षांना मिळतात. एवढेच काय तर खाऊन झाल्यावर चोची धुताना जे तुकडे पाण्यात राहतात ते देखील नंतर येणारे पक्षी खाऊन संपवतात.
दिवसभर बागेत वावरणाऱ्या फुलचुख्यांचं वेगळं विश्व तरंगत असतं. शरीराच्या मानाने लांब आणि बारीक चोच असलेले हे पक्षी सतत एका फुलाकडून दुसरीकडे उडत असतात. केवळ पक्षांसारखे दिसतात म्हणून पक्षी म्हणायचं, नाहीतर फुलपाखरंच ती; फुलपाखरांप्रमाणे नाना रंग आणि नाना प्रकारचं नक्षीकाम असणारी. कोणाचे पंख पिवळे, शरीर करडं, कोणाच्या डोक्यावर केशरी पट्टे, कोणी पोपटासारखे पोपटी, कोणी निळे, शेकडो रंग आणि शेकडो तऱ्हा! प्रत्येक फुलावर बसायचं आणि आपण नळातून पाणी प्यायला वाकतो तसं वाकून फुलाच्या देठाला बाहेरून चोच लावून त्यातला मध प्यायचा. लगेच पुढच्या फुलावर. एखाद्या फुलातला मध आवडला म्हणून त्यातलाच मध पीत बसलंय असं नाही. आजुबाजूला काय चालू आहे याची पर्वा नाही.
वास्तविक घरातल्या प्राण्यांप्रमाणे पक्षी काही पाळीव नव्हेत, किंवा त्यांचा काही तसा उपयोगही नाही. स्वच्छंदी लोकांकडून तशाही उपयोगाची अपेक्षा करता येत नाहीच. पण तरीही ते ओढ लावतात. नेहमी दिसणारा खंड्या पहाटे दिसला नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. रोज तोच खंड्या येतो का ते ही माहित नसतं. एखाद दिवस वंचकांची टोळी नाही आली की काळजी वाटू लागते. एकदा मी कुठेतरी लांब गावी, कामासाठी गेलो होतो. मनासारखं काहीच घडत नव्हतं. निराश मनाने, तिथल्या एका झुडपासमोर बसलो असताना, नेहमी घरच्या बागेत आढळणारा एक फुलचुख्या त्या झुडपात दिसला. एखादा घरचा माणूस भेटावा इतका आनंद मला झाला. तो उत्साह घेऊन मी निराशा झटकून कामाला लागलो. काही न बोलता, एकमेकांची काहीही ओळख नसताना हे नातं कसं निर्माण होतं कोण जाणे? अशा वेळी कुसुमाग्रजांची कविता आठवते,
उष:कालचे प्रकाशमंडल येता प्राचीवर,
निळे पाखरू त्यातून कोणी अवतरले सुंदर
आणि तिचा शेवटही आठवतो,
निळ्या अनंता मिळून गेला माझा पक्षी निळा,
रखरखती भवताली आता माध्यान्हीच्या झळा
नोंद: ह्या ओळींवरून मला काही प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही इथे प्रकाशित केल्या आहेत. ह्या कवितेचे बरेच पाठभेद दिसत आहेत. त्यानुसार प्रत्येकजण सुधारणा सुचवतो आहे. प्रत्येक पाठभेदाला स्वत:चा अर्थ आहे. सध्या वर लिहिलेल्या ओळी 'रसयात्रा' या पुस्तकातील १०९ व्या पानावरील कवितेप्रमाणे आहेत.