मी, निखिल, निखिल किंवा रामानंद यापैकी कुणाला वाटलं की एखादी mail येते, "या शनिवारी, तळजाईवर भेटु या." सगळ्यांना शक्य असेल तर त्या दिवशी, तळजाईच्या मंदिराजवळ आम्ही भेटतो. दरवाजा पार करून तळजाई उद्यानात शिरल्यावर, नेहमीची फेरी सुरू होते. आजुबाजुची हिरवळ मनाला प्रफुल्लित करते. पक्षांच्या मंजुळ ताना कानी पडतात. पाय चालायला लागले की जिभा पण चालायला लागतात.
प्रत्येकाच्या मेंदुतली साचलेली द्र्व्य उकळायला लागतात. त्यांच्या वाफा होऊन तोंडावाटे त्या बाहेर पडतात. प्रत्येकाच्या डोक्यातली वेगवेगळी द्रव्य त्यांच्या रंग, वासासकट अशी प्रकट व्हायला लागली की मग त्या भ्रमंतीला चव चढायला लागते. ह्या वाफा जशा एकमेकांत मिसळतील तसा गप्पांना बहर येतो. वारा वाहील तशा वाफा वळतात, मिसळतात, विरळ होतात, थांबतात, पुन्हा चालू होतात. रसायनं उकळाताहेत तितका वेळ तोंडं चालतात. कधी कधी वाट संपते, पाय थकतात, पण तोंडं थकत नाहीत. मग पाय (किंवा गाड्या) कुठल्या तरी उपाहार गृहाची वाट धरतात. फार गर्दी नसेल, एखाद्या चहावर बराच वेळ बोलत बसता येईल अशी जागा जास्त मानवते. गप्पा पुन्हा सुरू. कधी कधी तर गप्पा थांबल्या तरी कोणीच उठायला तयार नसतं. हे गप्पा रंगल्याचं लक्षण!
गप्पांचे विषयही बरेच असतात. सगळे COEP मधले असल्यानं तो विषय चघळायला असतोच. त्यात COEP हा अजायबखाना असल्याने, त्याबद्दलच्या विषयांना अंत नसतो. सगळेच IT companies मधले असल्यानं, तो एक विषय. चहाचे प्रकार, पुण्यातली खाण्याची ठिकाणं, पुस्तकं, ज्योतिष, चित्रपट अशी यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जाईल. मजा अशी की प्रत्येक वेळी कुठला विषय चघळला जाईल हे आधी माहित नसतं. पायवाटा फुटतील तसे विषयही फुटतात. प्रत्येकानं जे वाचलं असेल, पाहिलं असेल, काही घडलं असेल त्याला अशी वाचा फुटते. कोणाला तरी वेळेचं भान येतं, नाहीतर उपाहार गृहाचा पोऱ्या टेबलाभोवती घुटमळायला लागतो, मग आम्ही उठतो. गाड्यांपाशी पुन्हा एक गप्पाष्टक रंगतं. उन्हं फारच त्रास देऊ लागली की गाड्या निघतात, पुन्हा पुढच्या वेळसाठी डोकं भरायला!