मेघदूत वाचताना मला काही ठिकाणी अर्थांतरन्यास अलंकाराचा सुंदर वापर केलेला दिसला (पूर्वमेघ ६, १७, उत्तरमेघ २०). पण उत्तरमेघाच्या विसाव्या श्लोकातला वापर विशेष वाटला.
मेघरूपी दूताला अलकानगरीचा रस्ता दाखवून, तिचे आणि तिच्या वैभवाचे वर्णन केल्यावर यक्ष त्याच्या घराचे वर्णन करतो. अलकेच्या वैभवाचे, तेथील यक्षांच्या विलासी जीवनाचे वर्णन करण्यात यक्ष (आणि पर्यायाने कालिदास) इतका गढून जातो की याला आपल्या विरहाचा विसर पडला की काय, दण्ड वाळल्याने मनगटावर आलेले त्याचे बाजूबंद आता मोठे करून घ्यायची वेळ येते की काय, मंदाक्रान्ता मालिनीच्या चालीवर पावले टाकते की काय अशी भीती वाटताना, हा श्लोक येतो, आणि कालिदास म्हणजे काय चीज आहे याचा उलगडा होतो.
हे साधो, ही, ठसवी हृदयी लक्षणे, बोललो मी
द्वारी दोन्ही, शकुन सुचके, देख तू रेखलेली
खात्री होई, बघुनि घर जे काजळे, मद्वियोगे
सूर्यावीना, कमळ आपुली, दाखवी काय शोभा?
सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही जर सूर्य नसेल, तर सूर्यविकासी कमळे फुलत नाहीत त्याप्रमाणे, सर्व सुखसोयी, सुशोभने असतानाही यक्षाच्या घरी मात्र तो नसल्याने शोककळा पसरली आहे. त्यापेक्षाही, यक्ष ही शोककळा हीच खूण म्हणून मेघाला सांगतो, यातून त्याला होत असलेल्या प्रचंड विरहवेदना अतिशय सहजपणे एकाच ओळीत कालिदास सांगून जातो. या अचानक झालेल्या आघाताने वाचक बधीर होऊन जातो.