संदर्भ: शैलेशचा 'साहित्य आणि गणित'
हे शीर्षक मी केवळ 'विरोधाभास' अलंकार साधण्यासाठी वापरलं नसून, मला खरंच वाटतं की चांगल्या साहित्यालादेखील विशिष्ट नियम लागू होतात आणि ते गणिताच्या नियमांप्रमाणेच काटेकोर असतात. ह्या माझ्या लेखाचा उद्देश हे ह्या गणिताचे काठिण्य दाखविणे हाच आहे.
साहित्याचा उद्देश (वाङ्मय या अर्थी) आपले विचार (कुठल्यातरी भाषेत) व्यक्त करणं, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हाच आहे असे मानायला कोणाची हरकत नसावी. म्हणजेच, प्रत्येक साहित्यिक कलाकृती काहीतरी विचार व्यक्त करत असते. ती कृती निर्माण करताना, निर्मात्याच्या मनात 'हे, हे आणि असे असे विचार मला यातून व्यक्त करायचे आहेत' असा हेतू असतो. ती कृती पूर्ण होऊन रसिकांपर्यंत पोहोचली, की त्याबरोबर काही विचार रसिकांपर्यंत जाऊन पोहोचतात. हे विचार आणि मूळ निर्मात्याच्या मनातील विचार ह्यात किती तफावत आहे, यावर त्या निर्मात्याचं यश जोखलं जाऊ शकतं. हे वाङ्मयातलं गणित आहे, विचार मांडण्याचं आणि नंतर ते समजावून घेण्याचं.
शैलेशनीच दिलेलं उदाहरण घेऊ. उगवत्या सूर्याचं वर्णन करताना, लेखकाला त्यातून नक्की काय व्यक्त करायचं आहे ह्यावर लेखक, काय उपमा वापरतो, शब्द, शैली कशी वापरतो हे अवलंबून असते. त्याला उत्साह दाखवायचा असेल तर तो, 'सहस्ररश्मी, आपल्या सहस्र सोनेरी अश्वांचा रथ उधळत पूर्वेच्या महाली दाखल झाला' असे काही म्हणेल. त्याला भव्यता आणि शुचिता, आनंद दाखवायचे असतील तर,
'देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे, जाती यती हर्षुनी,
शार्दुलादिक सर्व दुष्ट दडती, गिर्यंतरी जाऊनी',
असे वर्णन करेल. तेच वैताग, चिडचिड दाखवायची असेल तर, 'पहाटेची साखरझोप लुबाडत, आणि सुंदर स्वप्नांचा चक्काचूर करीत, घरातील दारिद्र्य उघडे करायला आलेल्या सावकारासारखा सूर्य घरात दाखल झाला', असे शब्द वापरेल.
हा जो विचार मांडण्याचा प्रयत्न आहे, तो एखादे प्रमेय सोडवण्याइतका किंवा त्याहूनही अवघड आहे. इथेच वाङ्मयातले गणित चालू होते. हे गणित अंकगणितापेक्षा कितीतरी अवघड आहे. अंकगणितात निदान क्रिया (operators) आणि त्यांची करणसाधने (operands) ह्यांची मर्यादित तरी आहेत, पण् वाङ्मयातल्या क्रिया आणि करणसाधने अमर्याद आहेत, म्हणूनच की काय वाङ्मयाचे गणित ढोबळ वाटण्याची शक्यता आहे. पण, हा ढोबळपणा हा या वाङ्मयीन पद्धतीचा दोष नसून, ती वापरण्याऱ्या साहित्यिक आणि रसिकांच्या उणेपणाचा परिणाम आहे. विविध मूर्त, अमूर्त कल्पना, शब्द यांवर समास, संधी यांसारख्या साध्या हत्यारांपासून, ते वृत्त व अलंकारांसारख्या उच्च प्रतीच्या साधनांचा प्रयोग करून सोडवली जाणारी ही गणिते येरागबाळ्याच्या आवक्यातली नव्हेतच!
या बाबतीतले टिळकांचे मत माझे म्हणणे पूर्ण करेल. टिळक ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना म्हणाले, "ज्ञानेश्वरी ही एखाद्या प्रमेयासारखी आहे. एकदा तुम्हाला प्रमेय कळू लागले की पुढच्या पायऱ्या आपोआप उलगडतात. तशी एकदा ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांशी तुम्ही एकरूप झालात की पुढच्या ओव्या तुम्हाला आपोआप सुचू लागतात."