बंगलोरहून कूर्गला गाडीने निघालो होतो. निघताना सगळ्यांनी "चन्नपट्टणला थांबून लाकडी खेळणी पाहून जा" असे बजावले असल्याने चन्नपट्टणच्या पाट्या कुठे दिसतात का हे पाहत आम्ही निघालो होतो. कूर्गला जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे सांगून ठेवले होते. चन्नपट्टणला पोहोचेपर्यंत जरा उशीर झाला होता त्यामुळे खेळणी पाहून लगेच निघू असा विचार करून गावात शिरलो. त्यादिवशी तिथल्या emporium ला सुट्टी होती असं गावात गेल्यावर कळलं. Emporium शिवाय इतर कुठे खेळणी घेऊ नका असाही सल्ला मिळाला असल्याने आमचा हिरमोड झाला. पण तेवढ्यात कुणीतरी अमूक अमूक ठिकाणी जा, तुम्हाला खेळणी मिळतील असं सांगितलं. छोट्या गल्ल्यांतून गाडी जात नसल्याने चालत तिथवर गेलो, तर ते ठिकाण म्हणजे खेळणी बनवण्याचा कारखानाच निघाला. एक वयस्क कारागीर आत बारीक नळ्यांना आकार देत बसला होता. आम्हाला पाहून त्याने एक फोन केला आणि कारखान्याचे मालक जेवून यईपर्यंत दहा मिनिटे आम्हाला बसण्यास सांगितले. आम्ही बसलो होतो ती अगदी छोटी खोली होती. तिथे खूपसे वेगवेगळ्या आकाराचे, करंगळी इतक्या जाडीपासून दंडाच्या जाडीचे आणि करंगळीच्या पेराच्या लांबीपासून दंडाच्या लांबीपर्यंतचे, लाकडी दंड, गोळे, विटा रचून ठेवले होते. तीन मोटारी, त्यांचे पट्टे, त्यावर जोडायचे वेगवेगळ्या आकारांचे लोखंडी दंड, आकार देण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पटाशी, टोकदार हत्यारे, वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्या असं सामान होतं. जमिनीवर सगळीकडे भुसा पडला होता. दोन-तीन कारागीरांना एकावेळी काम काम करता येईल इतकीच साधने आणि जागा असलेला तो कारखाना! वेळ जात होता, तसतसा आमचा धीर सुटत चालला होता. कूर्गला वाढलेले ताट डोळ्यासमोर दिसू लागले होते. पण तेवढ्यात मालक आले. जेवण झाल्यामुळे हालचाली सुस्तावल्या होत्या. आम्ही कुठून आलो, का आलो ही चौकशी केली. त्यातून ते खेळणी फक्त emporiumलाच विकतात हे कळले आणि आमचा उत्साह संपला. एवढे लांबून आलो आहोत आणि अनायासे कारखान्यात आहोत, तर खेळणी घेता आली नाही तरी खेळणी कशी करतात हे तरी पाहू, म्हणून मी त्यांना एखादे खेळणे करून दाखवण्याची विनंती केली. अशी विनंती त्यांना फारसे कोणी करत नसावे. अतिशय आनंदाने ते कामाला लागले. माझ्याबरोबर माझी मुलगी होती, तिच्यासाठी त्यांनी बांगड्या बनवायला घेतल्या.
एका मोटारीवर एक लाकडी दंड चढवून मोटार सुरु केली. मुलीच्या मनगटाचा आकार पाहून त्या आकाराची पटाशी घेऊन दंडासमोर धरली, तशी तो दंड आतून पोकळ होऊ लागला. उरलेल्या दंडाला त्याने दुसऱ्या पटाशीचा वापर करून गोलाकार दिला. असा अर्धा गोल केल्यावर तो उलटा करून दुसरी बाजू गोल केली. लिहायला लागला नाही त्याच्या कितीतरी जास्त वेळ या सगळ्याला लागला. एक दोन लाकडाचे दंड कुचके निघाले, काही वेळा बांगड्या तयार होता होता फाटल्या. बांगड्या तयार झाल्यावर मुलीला कुठला रंग आवडतो हे विचारून त्या रंगाच्या लाखेच्या कांड्या फिरत्या बांगडीवर घासून त्या रंगवल्या आणि त्यालाच तेलात भिजलेले केवड्याचे पान लावून चकाकी आणली. मोटारीच्या पट्ट्याबरोबर त्याच्या तोंडाचाही पट्टा चालला होता. हे सामान कसे करतात, कुठले लाकूड वापरतात, परदेशात कुठले सामान जाते, इथे कुठले विकतात वगैरे बरीच माहिती त्यांनी दिली. मगाचचे वयस्क गृहस्थ हे या मालकाचे वडील, ते तिथेच आकाशचक्राची (giant wheel) खेळण्यातली प्रतिकृती करत होते. करंगळीएवढ्या छोट्या काड्या घेऊन त्यांना आसाचे आकार देऊन रंगवण्याचे काम चालू होते. त्यांनी हा कारखाना सुरु केला तेव्हा वीजेशिवाय हाताने किंवा पायाने चक्री फिरवून हे काम चाले. तिथपासून काय बदलत गेले, आणि आता प्लास्टिकमुळे या खेळण्यांची मागणी कशी कमी झाली आहे. भारतातल्या कुठल्याही कारागीराप्रमाणे चीनी स्वस्त आणि बनावट वस्तूंच्या नावे बोटे मोडून झाली. कुठल्याही पारंपारिक कारागीराप्रमाणे आता या कलेची लोकांना कशी किंमत नाही हेही सांगून झाले. म्हाताऱ्या कारागिराच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी पडली होती.
बांगड्या करून झाल्यावर त्यांनी इतर वस्तू दाखवायला सुरुवात केली. लाकडी मण्यांच्या माळा, Tower of Hanoi सारखा लाकडी चकत्यांचा विदूषक, फुलदाण्या, लेखणी ठेवायला उभट भांडे, करकोचा वगैरे अनेक खेळणी त्यांनी उत्साहाने दाखवली. इथे कारखान्यात आलात म्हणून ही तुम्हाला बघायला मिळतायत नाहीतर ही परदेशीच विकली जातात, इथल्या emporium मध्ये नाही, हेही सांगून झाले. आमच्या डोळ्यातील चमक पाहून हे गिऱ्हाईक पटलं आहे हे त्यांना जाणवलं आणि एखाद्या मुरब्बी व्यापाऱ्याच्या कौशल्याने त्यांनी आम्हाला बराच माल विकला, आणि आम्हीही आनंदाने तो विकत घेतला, काही आमच्यासाठी, काही इतरांना देण्यासाठी!
बराच वेळ झाला होता, निरोप घेता घेता मी विचारलं. "इतर कलांप्रमाणे ही कलाही संपत चालली आहे, त्याला मागणी नाही, पुरेसं उत्पन्न मिळत नाही, असं तुम्ही म्हणता तर मग इतर कारागिरी करायला का सुरुवात करत नाही?". मी जरा भीतभीतच त्यांना विचारलं. "कलाकार फक्त पोट भरण्यासाठी कला जोपासत नाही, कला जोपासता यावी, कलेतील कसब वाढावे, केलेचे ज्ञान पूर्णत्वाला जावे म्हणून तो कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी करतो.", मला अतिशय अनपेक्षित उत्तर त्यांनी दिलं. त्यांच्यातल्या मगाचच्या व्यापाऱ्याचा मागमूस आता चेहऱ्यावर नव्हता. त्याची जागा एका फकिरानं घेतली होती. नजर कुठेतरी दूर हरवली होती. कलोपासक, कलेला जीवन वाहून टाकलेल्या वगैरे कलेच्या नावावर सवलती लाटण्याची दुकानं चालवणाऱ्या मंडळींच्या बुभुक्षित नजरेपेक्षा ही फारच वेगळी होती. "खरा कलाकार तो", तर्जनी वर करून ते पुढे म्हणाले. "त्याने करून ठेवलेल्या कामाची नक्कल करणारे इथले आम्ही. त्या एका कलाकारानं केलेलं काम नकलायला सुतार, लोहार, सोनार, तांबट, चित्रकार, गायक, नट, वादक, शिल्पकार, नर्तक असे किती तरी प्रकारचे कलाकार लागतात, पण तरीही नक्कल अपुरीच राहते. हेच पहाना, त्यानं विश्व निर्माण केलं. असे कितीतरी लहान मोठे गोळे, चकत्या, भिंगऱ्या निर्माण करून अवकाशात लावले.", आजूबाजूला पडलेले वेगवेगळ्या आकारातले लाकडी गोळे दाखवत ते म्हणाले. भुश्याकडे हात दाखवत त्यांनी पुढचे म्हणणे पूर्ण केले, "पण आम्ही गाड्यावारी वाया घालवतो तसा एकही कण त्याने वाया नाही घालवला. सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणाचा त्याने उपयोग केला आहे. ते कसे केले, हे कोडेतरी सुटेपर्यंत माझी या कारागिरीतून सुटका नाही." एवढे थोडे बोलून ते शांत झाले. म्हाताराही त्याचे काम सोडून हे थोडके प्रवचन समाधानाने ऐकत होता. आपला शिकवण अगदीच वाया गेली नाही, हे त्याला मनापासून पटले असावे. त्या एवढ्याशा खोलीत, आजूबाजूच्या यंत्रांच्या आवाजात एक गंभीर शांतता दाटली होती. त्या दोघांना त्या शांततेत सोडून, आणि त्यातली थोडीशी विकत घेतलेल्या खेळण्यांत साठवून आम्ही कूर्गकडे निघालो.
3 comments:
वाह वा बढ़िया
खूप छान,डोळ्यासमोर चन्नपट्टण ,तो कारखाना,ते बापलेक उभे राहिले
सुंदर!
वर्णन सुंदरच. पण अशा अनेक कला लुप्त होत आहेत याची जाणीव करून दिलीत ती महत्वाची.
खूप छान वर्णन आहे.
Post a Comment