Friday, April 27, 2018

शास्त्रीय संगीताचा आनंद

विस्तीर्ण उद्यान आहे, त्यात वेगवेगळ्या आकारांची, रंगांची आणि वासांची फुलं आहेत, वेगवेगळ्या चवींची फळं आहेत, अनेक आकारांची झाडं आहेत, विविध पक्षी, प्राणी आहेत, झरे, नाले, ओहोळ, धबधबे, जलाशय आहेत. जलाशयांमध्ये विविध आकारांचे, रंगांचे जलचर आहेत. हे सगळं अतिशय सुंदर रचलेलं आहे. तुम्हाला या उद्यानात हवं तिथे हवं तेवढा वेळ फिरण्याची, या उद्यानाचा आनंद घेण्याची मुभा आहे. तुम्ही बागेत फिरायला लागता, तुमच्या स्वभावानुसार अतिसंथ, संथ, मध्यम, जलद किंवा अतिजलद गतीने, किंवा गती बदलत. एखादं फूल, फळ, रचना जे आवडेल तिथे रेंगाळता. दूर काही आकर्षक दिसलं तर जलद गतीने तिथवर जाण्याचा प्रयत्न करता. न आवडलेल्या ठिकाणहून लवकर दूर जायचा प्रयत्न करता. काहीतरी विसरलंय असं लक्षात येताच पुन्हा त्या जागेवर परत येता. अशा विविध प्रकारे या उद्यानात हिंडून आपलं मन रिझवण्याचा प्रयत्न करता. कधी थकता, एखाद्या झाडाखाली विश्रांतीला बसता, झोपीही जाता. कधी निराश होता, कधी कंटाळता, कधी उल्हसित होता, कधी सुखावता. लवकरच लक्षात येतं की हे उद्यान फार विस्तीर्ण आहे, आणि त्याचा आनंद घेणं ही(देखील) तितकीशी सोपी गोष्ट नाही. काहीतरी विचार करून, नियोजनाने या बागेचा आस्वाद घ्यायला हवा. त्यानुसार तुम्ही पुन्हा फिरायला सुरुवात करता. आता तुम्हाला ही बाग आपलीशी वाटू लागते, त्यातली सौंदर्यस्थळे नीट कळून येऊ लागतात. परंतु तरीही काहीतरी उणे आहे असं वाटत राहतं. तेवढ्यात तुम्हाला एक दुसरी व्यक्ती तिथे भेटते. अशी व्यक्ती जी या बागेत तुमच्यापेक्षा खूप जास्त काळ फिरत आहे. त्या व्यक्तीला या उद्यानाची जास्त ओळख आहे. त्या व्यक्तीशी बोलताना, तुम्ही ह्या उणेपणाचा उल्लेख करता. ती व्यक्ती तुम्हाला हाताशी धरून त्या बागेत हिंडवते. त्या व्यक्तीला गवसलेली सौंदर्यस्थळे तुम्हाला दाखवते. एवढेच नव्हे तर अशी स्थळे शोधण्याच्या युक्त्या तुम्हाला शिकवते.

शास्त्रीय संगीताचं तसंच आहे. संगीत हे अतिविस्तीर्ण उद्यान आहे. नव्याने त्यात शिरलेल्या माणसाला काहीच दिसत नाही, किंवा ते अंगावर तरी येतं. हळूहळू तिथे रमाल तसं त्या उद्यानाचा आनंद कसा घ्यायचा हे कळायला लागतं. पण आपल्या पूर्वजांनी या उद्यानाचा सखोल अभ्यास करून त्यातील काही उपवनं, बागा हेरून ठेवल्या आहेत. या उद्यानाचा आनंद कसा घ्यायचा याचं शास्त्र विकसित केलं आहे. नाटक, चित्र, गद्यपद्यादि वाङ्मय ह्यांचा आनंद त्यांच्या निर्मितीनंतर घेता येतो; या रचना बांधताना त्यांचा आनंद घेणं फार अवघड असतं. पण शास्त्रीय संगीत, विशेषत: भारतीय शास्त्रीय संगीत यापासून पूर्ण वेगळं आहे. या शास्त्रात रचना बांधल्या जात असताना त्याचा आनंद घेणं शक्य आहे. शास्त्रीय संगीतात गायकाचं काम हे उद्यानातील जाणकार व्यक्तीसारखं आहे. गायक सुरुवातीला संथ लयीतील रचना निवडून त्या रागाची ओळख करून देतो. त्यातील प्रत्येक सुराची, ते सूर गुंफून तयार होणाऱ्या तानांची ओळख करून देतो. हे करत असताना तो स्वत: त्या रागाचा आनंद घेतो आणि श्रोत्याचा हात (खरंतर कान) धरून त्यालाही हा आनंद देतो, आनंद घ्यायला शिकवतो. एखादी तान, एखादा सूर आवडली तर तो स्वत: तिथे रेंगाळतो, श्रोत्यालाही रेंगाळवतो, आणि त्या जागेचा मनाजोगता आस्वाद घेऊन झाला की दुसरीकडे वळतो. संथ लयीत रागाची ओळख करून दिल्यावर, स्वत: पुन्हा ओळख करून घेतल्यावर, मध्यम किंवा दृत लयीचा वापर करून रागाच्या सीमांपर्यंत घोडदौड करून त्या वेगाचा आनंद घेतो. या सीमा पार करून जवळच्या रागांचाही आस्वाद घेतो आणि देतो. गायक आणि श्रोता यांनी एकत्र केलेली सुरांच्या प्रांतातील ही मुशाफिरी असते. ह्या प्रवासात दोघांना गतीचं भान द्यायला तबला आणि सुरांचं भान द्यायला तंबोरा हवाच. तबला नसेल तर गायकाला त्याचे प्रवाही सूर काळाचं आणि गतीचं भान राहू देणार नाहीत. तंबोरा नसेल तर सुरांची उड्डाणं जमीन सोडायला लावतील. शास्त्रीय संगीताची बांधणी अशी केलेली असते की गायकाला आणि काही प्रमाणात श्रोत्याला विहाराचं पूर्ण स्वातंत्र्य असत. त्यामुळे तोच राग, तीच बंदिश किंवा तोच ख्याल, त्याच गायकाने पुन्हा पुन्हा गायला तरी दरवेळी वेगळा गायला जातो, त्याचा आनंद दरवेळी वेगळा असतो. सुगम संगीत किंवा लोकसंगीत हे theme parks मधल्या rides सारखं किंवा शहरातल्या छोट्या बागांसारखं असतं. आखीव/रेखीव रस्त्यांवरून तुम्ही एकदा फिराल, दोनदा फिराल पण लवकरच त्याचा कंटाळा येईल.

शास्त्रीय संगीत हे असं आहे. नानगृहातील टबातली आंघोळ किंवा जलतरण तलावातील पोहणे नव्हे. एखादा राजहंस ज्याप्रमाणे तलावात विहरत राहतो, त्याप्रमाणे सुरांमध्ये दीर्घकाळ विहरत राहून आनंद घेण्याची कला श्रोत्यालाही आत्मसात करावी लागते.

Saturday, September 30, 2017

चन्नपट्टणचा कारागीर

बंगलोरहून कूर्गला गाडीने निघालो होतो. निघताना सगळ्यांनी "चन्नपट्टणला थांबून लाकडी खेळणी पाहून जा" असे बजावले असल्याने चन्नपट्टणच्या पाट्या कुठे दिसतात का हे पाहत आम्ही निघालो होतो. कूर्गला जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे सांगून ठेवले होते. चन्नपट्टणला पोहोचेपर्यंत जरा उशीर झाला होता त्यामुळे खेळणी पाहून लगेच निघू असा विचार करून गावात शिरलो. त्यादिवशी तिथल्या emporium ला सुट्टी होती असं गावात गेल्यावर कळलं. Emporium शिवाय इतर कुठे खेळणी घेऊ नका असाही सल्ला मिळाला असल्याने आमचा हिरमोड झाला. पण तेवढ्यात कुणीतरी अमूक अमूक ठिकाणी जा, तुम्हाला खेळणी मिळतील असं सांगितलं. छोट्या गल्ल्यांतून गाडी जात नसल्याने चालत तिथवर गेलो, तर ते ठिकाण म्हणजे खेळणी बनवण्याचा कारखानाच निघाला. एक वयस्क कारागीर आत बारीक नळ्यांना आकार देत बसला होता. आम्हाला पाहून त्याने एक फोन केला आणि कारखान्याचे मालक जेवून यईपर्यंत दहा मिनिटे आम्हाला बसण्यास सांगितले. आम्ही बसलो होतो ती अगदी छोटी खोली होती. तिथे खूपसे वेगवेगळ्या आकाराचे, करंगळी इतक्या जाडीपासून दंडाच्या जाडीचे आणि करंगळीच्या पेराच्या लांबीपासून दंडाच्या लांबीपर्यंतचे, लाकडी दंड, गोळे, विटा रचून ठेवले होते. तीन मोटारी, त्यांचे पट्टे, त्यावर जोडायचे वेगवेगळ्या आकारांचे लोखंडी दंड, आकार देण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पटाशी, टोकदार हत्यारे, वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्या असं सामान होतं. जमिनीवर सगळीकडे भुसा पडला होता. दोन-तीन कारागीरांना एकावेळी काम काम करता येईल इतकीच साधने आणि जागा असलेला तो कारखाना! वेळ जात होता, तसतसा आमचा धीर सुटत चालला होता. कूर्गला वाढलेले ताट डोळ्यासमोर दिसू लागले होते. पण तेवढ्यात मालक आले. जेवण झाल्यामुळे हालचाली सुस्तावल्या होत्या. आम्ही कुठून आलो, का आलो ही चौकशी केली. त्यातून ते खेळणी फक्त emporiumलाच विकतात हे कळले आणि आमचा उत्साह संपला. एवढे लांबून आलो आहोत आणि अनायासे कारखान्यात आहोत,  तर खेळणी घेता आली नाही तरी खेळणी कशी करतात हे तरी पाहू, म्हणून मी त्यांना एखादे खेळणे करून दाखवण्याची विनंती केली. अशी विनंती त्यांना फारसे कोणी करत नसावे. अतिशय आनंदाने ते कामाला लागले. माझ्याबरोबर माझी मुलगी होती, तिच्यासाठी त्यांनी बांगड्या बनवायला घेतल्या.

एका मोटारीवर एक लाकडी दंड चढवून मोटार सुरु केली. मुलीच्या मनगटाचा आकार पाहून त्या आकाराची पटाशी घेऊन दंडासमोर धरली, तशी तो दंड आतून पोकळ होऊ लागला. उरलेल्या दंडाला त्याने दुसऱ्या पटाशीचा वापर करून गोलाकार दिला. असा अर्धा गोल केल्यावर तो उलटा करून दुसरी बाजू गोल केली. लिहायला लागला नाही त्याच्या कितीतरी जास्त वेळ या सगळ्याला लागला. एक दोन लाकडाचे दंड कुचके निघाले, काही वेळा बांगड्या तयार होता होता फाटल्या. बांगड्या तयार झाल्यावर मुलीला कुठला रंग आवडतो हे विचारून त्या रंगाच्या लाखेच्या कांड्या फिरत्या बांगडीवर घासून त्या रंगवल्या आणि त्यालाच तेलात भिजलेले केवड्याचे पान लावून चकाकी आणली. मोटारीच्या पट्ट्याबरोबर त्याच्या तोंडाचाही पट्टा चालला होता. हे सामान कसे करतात, कुठले लाकूड वापरतात, परदेशात कुठले सामान जाते, इथे कुठले विकतात वगैरे बरीच माहिती त्यांनी दिली. मगाचचे वयस्क गृहस्थ हे या मालकाचे वडील, ते तिथेच आकाशचक्राची (giant wheel) खेळण्यातली प्रतिकृती करत होते. करंगळीएवढ्या छोट्या काड्या घेऊन त्यांना आसाचे आकार देऊन रंगवण्याचे काम चालू होते. त्यांनी हा कारखाना सुरु केला तेव्हा वीजेशिवाय हाताने किंवा पायाने चक्री फिरवून हे काम चाले. तिथपासून काय बदलत गेले, आणि आता प्लास्टिकमुळे या खेळण्यांची मागणी कशी कमी झाली आहे. भारतातल्या कुठल्याही कारागीराप्रमाणे चीनी स्वस्त आणि बनावट वस्तूंच्या नावे बोटे मोडून झाली. कुठल्याही पारंपारिक कारागीराप्रमाणे आता या कलेची लोकांना कशी किंमत नाही हेही सांगून झाले. म्हाताऱ्या कारागिराच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी पडली होती.

बांगड्या करून झाल्यावर त्यांनी इतर वस्तू दाखवायला सुरुवात केली. लाकडी मण्यांच्या माळा, Tower of Hanoi सारखा लाकडी चकत्यांचा विदूषक, फुलदाण्या, लेखणी ठेवायला उभट भांडे, करकोचा वगैरे अनेक खेळणी त्यांनी उत्साहाने दाखवली. इथे कारखान्यात आलात म्हणून ही तुम्हाला बघायला मिळतायत नाहीतर ही परदेशीच विकली जातात, इथल्या  emporium मध्ये नाही, हेही सांगून झाले. आमच्या डोळ्यातील चमक पाहून हे गिऱ्हाईक पटलं आहे हे त्यांना जाणवलं आणि एखाद्या मुरब्बी व्यापाऱ्याच्या कौशल्याने त्यांनी आम्हाला बराच माल विकला, आणि आम्हीही आनंदाने तो विकत घेतला, काही आमच्यासाठी, काही इतरांना देण्यासाठी!

बराच वेळ झाला होता, निरोप घेता घेता मी विचारलं. "इतर कलांप्रमाणे ही कलाही संपत चालली आहे, त्याला मागणी नाही, पुरेसं उत्पन्न मिळत नाही, असं तुम्ही म्हणता तर मग इतर कारागिरी करायला का सुरुवात करत नाही?". मी जरा भीतभीतच त्यांना विचारलं. "कलाकार फक्त पोट भरण्यासाठी कला जोपासत नाही, कला जोपासता यावी, कलेतील कसब वाढावे, केलेचे ज्ञान पूर्णत्वाला जावे म्हणून तो कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी करतो.", मला अतिशय अनपेक्षित उत्तर त्यांनी दिलं. त्यांच्यातल्या मगाचच्या व्यापाऱ्याचा मागमूस आता चेहऱ्यावर नव्हता. त्याची जागा एका फकिरानं घेतली होती. नजर कुठेतरी दूर हरवली होती. कलोपासक, कलेला जीवन वाहून टाकलेल्या वगैरे कलेच्या नावावर सवलती लाटण्याची दुकानं चालवणाऱ्या मंडळींच्या  बुभुक्षित नजरेपेक्षा ही फारच वेगळी होती. "खरा कलाकार तो", तर्जनी वर करून ते पुढे म्हणाले. "त्याने करून ठेवलेल्या कामाची नक्कल करणारे इथले आम्ही. त्या एका कलाकारानं केलेलं काम नकलायला सुतार, लोहार, सोनार, तांबट, चित्रकार, गायक, नट, वादक, शिल्पकार, नर्तक असे किती तरी प्रकारचे कलाकार लागतात, पण तरीही नक्कल अपुरीच राहते. हेच पहाना, त्यानं विश्व निर्माण केलं. असे कितीतरी लहान मोठे गोळे, चकत्या, भिंगऱ्या निर्माण करून अवकाशात लावले.", आजूबाजूला पडलेले वेगवेगळ्या आकारातले लाकडी गोळे दाखवत ते म्हणाले. भुश्याकडे हात दाखवत त्यांनी पुढचे म्हणणे पूर्ण केले, "पण आम्ही गाड्यावारी वाया घालवतो तसा एकही कण त्याने वाया नाही घालवला. सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणाचा त्याने उपयोग केला आहे. ते कसे केले, हे कोडेतरी सुटेपर्यंत माझी या कारागिरीतून सुटका नाही." एवढे थोडे बोलून ते शांत झाले. म्हाताराही त्याचे काम सोडून हे थोडके प्रवचन समाधानाने ऐकत होता. आपला शिकवण अगदीच वाया गेली नाही, हे त्याला मनापासून पटले असावे. त्या एवढ्याशा खोलीत, आजूबाजूच्या यंत्रांच्या आवाजात एक गंभीर शांतता दाटली होती. त्या दोघांना त्या शांततेत सोडून, आणि त्यातली थोडीशी विकत घेतलेल्या खेळण्यांत साठवून आम्ही कूर्गकडे निघालो.

Sunday, November 27, 2016

सुटीतला बाजार

एखाद्या मोठ्या सुटीतल्या आळसावलेल्या दुपारी, उन्हात जायला बंदी म्हणून घरात कंटाळलेली आम्ही मुलं कंटाळा आल्याने आजीच्या मागे लागत असू. मग ती तिचे ठेवणीतले खेळ शिकवत असे. एका दुपारी तिने दुकान मांडायला सांगितलं. “दुकानात विकायला ठेवायला आमच्याकडे काहीच नाही”, “आणि दुकानात द्यायला पैसे, ते कुठून आणायचे?”, “दुकान मांडणार कुठे?”, “आणि गिऱ्हाईक कोण?”, आम्ही नेहमीप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आजीकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असत, तशी ती आजही होती. तिने आम्हाला अंगणात हिंडून गळालेले कोवळे फणस, छोटे नारळ, काळी पडून गळालेली सिताफळं, जास्वंदीची वाळलेली फुले असं काहीबाही गोळा करून त्याचे वेगवेगळे ढीग करायला सांगितले. “हा तुमचा दुकानात विकायचा माल आणि हे तुमचे पैसे.”, प्राजक्ताच्या मूठभर बिया पुढे करत ती म्हणाली. त्या सोनेरी मोहरांनी आम्ही क्षणात कितीतरी श्रीमंत झालो. व्हरांड्यात बाजार भरला. लवकरच त्यात गोगलगायीचे शंख, रगीबेरंगी खडे अशा मौल्यवान गोष्टी, दगडावर केलेली वनीषधी अशा वेगवेगळ्या गोष्टींची भर पडली. घटका-दोन घटका सरल्या आणि बाजारातील माल संपू लागला, रोकड गायब होऊ लागली आणि बाजारपेठा बळकावण्यासाठी युद्धाला तोंड लागलं. व्हरांड्याची रणभूमी व्हायच्या आत आजीने Ice-cream वर दोन्ही गटांमध्ये तह घडवून आणला आणि सेना आपापल्या शिबिरांमध्ये झोपायला रवाना केली. नंतर बऱ्याच सुट्ट्यांमध्ये हा बाजार रंगला, बदलत्या ऋतूनुसार, मुलांनुसार त्याला वेगवेगळे रंगही चढले. पुढे सुट्ट्या लागणं संपलं आणि बाजारही.

माझ्या मुलीला दिवाळीची सुट्टी लागली, दुपारी कंटाळा आला म्हणून तिनी भुणभुण सुरू केली. “चल, अंगणात जाऊ” म्हणून आम्ही नारळ, फणस, फुलं, पानं गोळा करत हिंडू लागलो. तुळशीवृंदावनाशी बाजार भरला. वारशाने पुढे जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मृत्यूपत्राची वाट पहावी लागत नाही, नाही का?

Saturday, January 23, 2016

मोहरीची रोपं

रमा आणि तिच्या आईने दिवाळीत किल्ला केला. किल्ल्यावर मोहरी पेरली. काही दिवसात मोहरीला फूट आली आणि किल्ल्याला हिरव्या पांघरुणाने शोभा आली, छोटी रमा हरखून गेली. दिवाळी संपली, रमानं किल्ला मोडताना मोहरीची छोटी रोपं असलेली माती एका मोठ्या कुंडीत पसरली. रमा उत्साहाने त्या रोपांना पाणी घाले, काळजी घेई. त्या रोपांचं काय करू आणि काय नको असं तिला होई. पाहता पाहता रोपं मोठी होऊ लागली.

रमाचे वडिल एका मोठ्या कंपनीत कामाला होते. ते तिला ह्या रोपांची काळजी घ्यायला मदत करत. Google वर मोहरीच्या निगराणीबद्दल वाचत, वाचलेल्या माहितीचा वापर करत. त्यांनाही ह्या रोपांनी प्रेम लावलं होतं. रमाच्या आईने मोहरी वाढलीच तर तिच्या पानांची भाजी कशी करायची हे ही पाहून ठेवलं होतं. रोजच्या रगाड्यात हा त्या तिघांचा विरंगुळ्याचा विषय बनला होता.

एका रात्री रमाचे वडिल थोडे उशीरा घरी आले. नेहमी आल्यावर ते रमाशी बोलत, चौकशी करत, मग ते तिघे एकत्र जेवत असत. पण आज काहीतरी वेगळे घडत होते. रमाच्या वडिलांचा चेहरा उतरला होता. ते रमाशी काही न बोलता, कपडे बदलून जेवणाच्या टेबलाकडे गेले. जेवताना आज नेहमीप्रमाणे बोलणं, शाळेतल्या मज्जा सांगणं वगैरे काहीच झालं नाही. रमाला हे काहीतरी वेगळं आहे असं जाणवलं. ती झोपायला गेली पण तिला झोप येई ना! तिचे डोळे मिटले होते, तरी कान आई-बाबांकडे लागले होते. बाबा आईला बढतीची संधी नाही, पगारात कपातही होईल असं काहीतरी सांगत होते. त्यांचा सूर वेगळा, थोडा काळजीचा होता. आईच्याही स्वरात काळजी ऐकू आली. विचार करता करता रमाला झोप लागली.

रविवारी सुट्टीच्या दिवशी रमा आणि तिचे बाबा नेहमीप्रमाणे मोहरीच्या रोपांकडे गेले. पाहतात तर काय काही रोपं सुकायला लागली होती. पाणी तर रोज घातलं जात होतं, मग काय झालं अचानक? रमानी रडवेल्या चेहऱ्याने बाबांकडे पाहिलं. बाबा सुकायला लागलेली रोपं मुळापासून काढून काळजीपूर्वक पाण्यात सोडत होते. “या वाढणाऱ्या रोपांना कुंडीतली माती आणि तिच्या मुरणारं पाणी पुरत नाहीये, आपण ती दुसऱ्या कुंडीत नव्या मातीत लावू, तिकडे रुजली तर छान वाढतील. इथेच राहिली तर ही रोपं मरतीलच पण जी आत्ता चांगली दिसताहेत त्यांचीही वाढ खुरटेल.”, बाबांनी रमाला समजावालं. काही दिवसांनी रमानं पाहिलं तर त्या हलवलेल्या रोपांपैकी काही रोपं छान रुजून वाढू लागली होती.


काही दिवसांनी रमाच्या बाबांनी आईला नोकरी बदलल्याचं सांगितलं. योगायोगानं रमाच्या आईनं मोहरीची भाजी केली होती. रमानं भाजी घेत बाबांना विचारलं, “जशी ती रोपं दुसरीकडे रुजली आणि वाढली, तसेच तुम्हीही नव्या नोकरीत रुजाल का हो?”. जेवणाच्या टेबलावर बऱ्याच दिवसांनी गप्पा फुलल्या होत्या!

Saturday, October 10, 2015

धरण बांधते, माझे मरण कांडिते

कोणे एके काळी सात आकाशापल्याडच्या प्रदेशात एक बुटक्या लोकांची वसाहत होती. वसाहतीची जागा मोठी निराळी. तिथून खाऱ्या पाण्याची नदी वाहत असे आणि जमीन लाल आणि दलदलीसारखी होती. हे बुटकेही विचित्र, त्यांना खाऱ्या पाण्याचीच तहान लागत असे. ती क्षरिता त्यांना भरपूर पाणी पुरवत असे. पण ती नदी त्यांचं सर्वस्व होतं, जीवनवाहिनीच जणू! काळाबरोबर बुटक्यांची वस्तीही वाढू लागली, वस्तीचे गाव आणि हळुहळू शहर झाले. नदीचे पाणी त्यांना पुरेना. बुटके होते हुशार त्यांनी त्या नदीवर धरण बांधून पाणी अडवायचे ठरवले. धरण बांधणार कशाचे? माती अशी दलदलीची, ती नदी काय अडवणार? त्यातल्या एक बुटका जरा जास्त हुशार होता. त्याच्या लक्षात आले की नदीतून कधीकधी थोडा चिकट गाळ येतो, तो किनाऱ्यावर बराच काळ चिकटून बसतो आणि काही काळाने नदीत वाहून जातो. हा गाळ गोळा करून जर आपण बांध घातला तर नदीचे पाणी अडवता येईल. बुटके कामाला लागले, त्यांनी थोडा थोडा करून पुरेसा गाळ गोळा केला आणि नदीवर धरण बांधले. नदीचे पाण्याचा भरपूर साठा झाल्यामुळे बुटक्यांना फार आनंद झाला, किंबहुना नदीत जरा जास्तच पाणी येऊ लागल्यासारखे वाटू लागले. हे वाढीव पाणी वापरण्यासाठी धरणाला दारे आली, धरण आणखी पक्के केले गेले. बुटक्यांना आपल्या कारागिरीचा अभिमान वाटू लागला. ही नदी कुठली, ती कुठून येते आणि कुठे जाते, तिचे प्रयोजन काय तिच्यात हा गाळ येतो कुठून, त्याचे प्रयोजन काय हे प्रश्न त्यांना पडले नाहीत असे नाही, पण सुखाच्या धुंदीत हा विचार बाजूला सरला.
--
जयंत बुट घालण्यासाठी वाकला आणि त्याच्या ओटीपोटातून असह्य कळ गेली. त्याच्या नकळत तो गुरासारखा ओरडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी मूतखड्याचे निदान केले. काही काळ बाहेरचे उपचार करून पाहिले पण उतार पडेना तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे दिसू लागले. एक दिवस त्यांनी लेझरच्या साह्याने मूतखडा काढून टाकला. जयंतला आराम मिळाला.
--
इकडे बुटक्यांच्या गावात, अचानक एक दिवस एक प्रखर दिव्याचा झोत आला आणि त्याने धरण फोडून टाकले, सारे शहर रातोरात उध्वस्त झाले. त्यातनं वाचले ते निसर्गाचा कोप वगैरे म्हणत दैवाला दोष देत इकडे तिकडे फिरताहेत.
--
सुश्रुतसंहितेत खालीलप्रमाणे वर्णन आहे
मूत्राशयो मलाधारः प्राणायतनमुत्तमम् | पक्वाशयगतास्तत्र नाड्यो मूत्रवहास्तु याः||
तर्पयन्ति सदा मूत्रं सरित: सागरं यथा | सूक्ष्मत्वान्नोपलभ्यन्ते मुखान्यासां सहस्रशः||
ज्याप्रमाणे नद्या सागरात (पृथ्वीवर पडणारे) पाणी विसर्जित करतात त्याप्रमाणे शरीरातील पाणी हजारो नाड्यांमधून मुत्राशयात जाते. जर या नाड्यांमध्ये बांध पडला तर माणसाला त्रास होतो, तर ह्या निसर्गरूपी पुरुषाला धरणांनी त्रास होत नसेल काय? माणूस जर तो त्रास दूर करायचा प्रयत्न करतो, तर निसर्गही करत नसेल काय?

Friday, May 01, 2015

एका वजनाची गोष्ट

रविवारची संध्याकाळ, मी बागेत चक्कर मारायला चाललो होतो. एक गृहस्थ समोरून येताना दिसले. नेहमीप्रमाणे मी हात हलवून, हसून मी ओळख दिली, त्यापलिकडे आमची ओळखही नाही, त्यांनीही ओळखीचे स्मित केले. नैमित्तिक उपचार आटोपल्यामुळे मी पुढे निघालो. पण या गृहस्थांनी मला हाक मारून थांबवले, "आपण बऱ्याचदा एकमेकांना पाहतो, पण आपली ओळख नाही", या प्रास्ताविकाने सुरु झालेली गाडी, नाव, गाव वगैरे नेहमीचे थांबे करीत, "काय करता आपण?" इथे येऊन पोचली.
"मी Database internals developer आहे", मी खरे उत्तर सांगितले, जे फार थोड्या लोकांना कळते.
गृहस्थांचा चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव!
"मी System programmer आहे", मी तेच वेगळ्या पद्धतीने सांगितले.
"म्हणजे software मध्ये का?", स्वत:च्या चेहऱ्यावरचा प्रश्नांच्या गुंत्यातून सुटलेली त्यांची नजर माझ्या सुटलेल्या पोटावर स्थिरावली.
"हं, वाटलंच मला, व्यायाम वगैरे करायला वेळ नसेल मिळत".
"हो ना, म्हणूनच आज फिरायला जातो आहे. सुट्टीचा तेवढाच सदुपयोग", गाडीला नकोसे वळण मिळालेले पाहून मी तिथून काढता पाय घेतला.

मी लहानपणापासूनच तसा दुधातुपाचं खाऊन ते अंगावर मिरवणारा माणूस. लहानपणीही कोणी मला बारक्या म्हणून हाक मारलेली आठवत नाही. मुलांबरोबर मी माझेही कपडे वाढत्या मापाने आणतो, बैठ्या कामामुळे पोट सुटलं आहे, गाल डोळ्यांची भेट घ्यायला आतूरलेले आहेत, हनुवटीला जोड मिळाली आहे, इ. गोष्टी समोरच्याच्या डोळ्यात जरा भरतात. लोक "तब्येत सुधारतीये हं" किंवा "लग्न मानवलेलं दिसतंय" वगैरे म्हणतात.

एक गृहस्थ जरा आणखी पुढे गेले. मी एकदा नेहमीच्या भेळवाल्याकडे दोन प्लेटनंतरची तिसरी प्लेट रिकामी करत होतो. त्या दिवशी भेळ जास्तच रंगल्यामुळे, नेहमीपेक्षा एखादी प्लेट जास्त मागवावी असा विचार करत असताना माझ्या समोरचे एक गृहस्थ भेळ खाऊन जाता जाता माझ्या अंगावर कुठल्याशा वजन कमी करण्याच्या course चे पत्रक टाकून गेले. जास्तीचीच काय पण होती ती सुद्धा प्लेट घशाखाली उतरेना!

रोडावला त्याला पाप्याचे पितर । वाढला अंगाने ढेरपोट्या ।।
लोक जैसा ओक धरिता धरवेना । त्यजुनिया जन ओरपावे ।।

तुकारामांनी हादेखील अभंग लिहून ठेवला असता तर माझ्यासारख्या लोकांवर किती उपकार झाले असते, पण त्यांनाही गाथेच्या वजनाची चिंता पडली असावी. आजपर्यंत यांपैकी कोणी लोक माझ्या घरापर्यंत पोचले नव्हते. घराबाहेरचं संकट टाळता येतं, घरातलं नाही.

पण आता हे संकट घरात येऊन पोचलं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून घरी आलो, तर हे बागेत भेटलेले गृहस्थ एका तरुणाबरोबर माझ्या घरी आलेले दिसले. समोर चहाचे रिकामे झालेले कप पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडतोय तोच ते मलाच भेटायला आल्याचं त्यांनी जाहीर केलं.
"हा माझा मुलगा", त्यांनी ओळख करून दिली.
"अरे वा, काय करतो, software मध्ये का?", त्याच्याही सुटू लागलेल्या पोटाकडे पाहत मी माफक सूड घेतला.
"पूर्वी software मध्ये होता, आता आहारतज्ञ म्हणून काम करतो.", गृहस्थ.
"Nutritionist", मुलाने सुधारणा केली.
"म्हणलं तुमची गाठ घालून द्यावी, तुम्हाला मदत होईल.", माझ्या पोटाकडे कटाक्ष टाकत ते गृहस्थ म्हणाले. "software मध्ये राहून वाढलेले स्वत:चे वजन कमी करण्यासाठी त्याने हा अभ्यास सुरू केला आणि आता तो इतरांना पण मदत करतो."
"आम्ही introductory session नी सुरुवात करतो. म्हणजे carbohydrates, proteins वगैरेंची ओळख करून देऊन सुरुवात करतो आणि शेवटी तुम्हाला तुमचा diet chart करून देतो. तो पाळला की वजन कसे हा हा म्हणता उतरते.", आहारतज्ञांनी त्या शब्दाचा सूड घेत माहिती पुरवली. मला एकदम शाळेत जाऊन बसल्यासारखं वाटलं.
"तुम्ही आहार ठरवताना वात, पित्त, कफ या गुणांचा विचार करता का?", मी गुगली टाकायचा आयुर्वेदिक प्रयत्न केला, पण तो no ball ठरला.
"छे! छे ते सगळं बकवास आहे, आम्ही latest research चा विचार करून आहार ठरवतो. यानंतर fats, metabolism, muscles, proteins हे इंग्लिश शब्द आणि त्यांना जोडायला मराठी व्याकरण वापरून त्यानं एक लांबलचक व्याख्यान दिलं. माझ्या पोटातले कावळेदेखील तेच ओरडताहेत असा मला भास होऊ लागला. तो जे बोलला सगळ्याचा सारांश मी रोज खात असलेलं अन्न निकस असून (हे निकस अन्न खाऊन कावळे एवढे ओरडतात, मग सकस खाल्लं तर?) डॅमवे कंपनी अत्यंत सकस अन्न पावडरी आणि गोळ्यांच्या स्वरूपात विकते, ते मी घेवून वजन कमी करावे. त्या गोळ्यांच्या किंमती ऐकून कमी होणाऱ्या वजनात खिशाचेच वजन जास्त असेल अशी मला शंका आली. ज्या अन्नावर आमच्या कित्येक पिढ्या (आणि त्यांच्या पोटातले कावळे) पोसल्या आणि चांगली सोन्याची फुलं डोक्यावर पाडून स्वर्गलोकी गेल्या त्या अन्नाला हा कालचा पोर माझ्याच घरात बसून निकस वगैरे म्हणत होता. पण इथे तात्विक वाद घालून उपयोग नाही हे माझ्या ध्यानात आलं. काहीतरी झटपट मार्ग हवा होता.
"तुमच्याकडे EMI ची सोय आहे का?", पैशाचे सोंग दिसले नाही की सगळे नाटकच बाद होते.
"EMI, EMI, हप्त्याने खरेदी करण्याची सोय, आहे का?", त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून मी स्पष्ट केले.
त्या दिवसानंतर हे बापलेक माझ्या मागे बडा घर पोकळ वासा असे काहीसे सांगत हिंडतात असे ऐकिवात आले आहे. हा गैरसमज सध्यातरी माझ्या फायद्याचा आहे. घरात आलेलं संकट पोकळ वाश्यामुळे सध्यातरी टळलं आहे.

Friday, December 26, 2014

Database maintenance, Geeta and Universality of maintenance

Ask any database user, what's the most irritating thing and most of them will answer "database maintenance". Almost every database, whether SQL or NoSQL, needs periodic maintenance. Free space needs to be collected so that, the database takes lesser space; statistics needs to updated so that the queries can be optimized; and so on. Users delay the maintenance activities till the transactional load reduces, at which times there are enough resources available for the maintenance tasks. A decade or two back, it was easier to take out time for such maintenance activities, but today, it has become increasing difficult to schedule maintenance activities because of increased load on database servers. Hence the "irritation" and users are expecting that database systems somehow reduce the maintenance requirement.

Is that possible? The answer looks tough. Periodic maintenance is a Universality. And surprisingly, our ancestors had acknowledged this fact. In Hindu scripture named "Bhagavad Geeta" (भगवद् गीता) or popularly known as only "Geeta" (गीता), a verse 4:7 goes thus

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत | अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् |
परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम् | धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

meaning: whenever धर्म (the force which sustains any system) is forced to sleep because of अधर्म (the opposite force), I am created (popularly translated as I take birth) to uphold the Good and to destroy the bad deeds. I happen (popularly translated as - I take birth) periodically in every age.

How easy is to see the parallel. If the free space be collected at the same time it is created or if the statistics would be updated at the time data gets added or changed, a database would not need any maintenance. But then the transactions would be slower, thus causing losses of money or time. Not only that, but the maintenance is sometimes more effective when done in bulk. If we were to clean few bytes every time those are freed, the total time for such tiny collections would be much larger than cleaning up huge chunks; same is the case with the statistics. So, in order to optimize the transactional throughput we leave the garbage uncleaned, or let the statistics be stale, thus creating "bad deeds", which eventually hinder the "Good", i.e. efficient operation of database. So, a maintenance task like Vacuum needs to "happen" periodically so as to destroy the "bad deeds" and help the "good". It shouldn't surprise us, the Hindus, that the sages put these words in the mouth of Krishna, who is the reincarnation of Vishnu, depicted as the force "maintaining" the Creation.

The Garbage or "bad deeds" are universal and they need to periodically cleaned. It is everywhere, from our bodies, houses, cities to computer systems. We need to keep maintenance windows for cleaning those periodically. Many scriptures describe these maintenance windows in various ways. Manusmriti (मनुस्मृती), which records the "commandments" of Hindus, explains those as periods of rest. The nights be used for daily maintenance, the period waning of moon (कृष्णपक्ष) be used for monthly maintenance, the period when Sun appears to move towards the South (दक्षिणायन) be used for yearly maintenance (Manusmriti verses 1:65-80). Old testament similarly employs the concept for Sabbath after every seventh day (Exodus 31:12-17, KJV), seventh month and seventh year and so on.

While we ponder over the universality and eternality of the scriptures, a finality strikes. While the database developers try to design their systems so that the they need smaller and smaller maintenance windows, it's important that the application developers too, design the applications such that the databases and other platforms used by the applications get enough maintenance windows; even the God needed to rest on the seventh day, databases are merely mortals!