Saturday, January 21, 2012

पुणे मनपा निवडणूक २०१२

आमची कामवाली हातात एक खोकं घेऊन धापा टाकत आली.
"काय गं, कुठे होतीस? आणि हे हातात काय?" - मी, उशीर झाल्याचा वैताग शब्दांबरोबर बाहेर पडला.
"अहो बाई, तिकडे साबळेची माणसं काचेचे बाऊल वाटताहेत. अख्खी वस्ती लोटलीये. फुकटचं कोण सोडनार, रांगेत लागले म्हणून थोडा उशीर झाला." - तिच्या चेहऱ्यावरून आनंद उतू जात होता.
"कशाबद्दल बाऊल वाटतायत?" - मला पुसटशी शंका आली, पण खात्री‌ करावी म्हणून विचारलं.
"अजून रथसप्तमी व्हायची आहे,  हे संक्रांतीचं वाण म्हणून असंल!" - इतकं कसं माहित नाही यांना, अशा थाटात तिनं मला माहिती पुरवली. हल्ली पुरुष पण हळदीकुंकवं करून वाणं लुटतात हे माहित नव्हतं मला.
"दर वर्षी‌ लुटतात का असं?" - मी आणखी विचारलं.
"आता कॉर्पोरेसनचं विलेक्शन नाही का फुडच्या महिन्यात? म्हणून वाबळे. पण दर साल, दोन साली कुठलं तरी विलेक्शन असतंच मग, दर साली ज्याचं विलेक्शन तो लुटतोच." - तिनं माझ्या ज्ञानात भर टाकली. "परवा तर स्टीलच्या ताटल्या वाटल्या कासकरच्या माणसांनी, एकीला एकच देत होते, पण मी सहा आणल्या, घरात सहा खाणारी तोंडं त्यांना सहा नकोत का?"
"कुठून येतात एवढे पैसे यांच्याकडे", मी हजारोंच्या संख्येनं मला काय लुटता येईल याचा विचार करत होते.
"जिंकले की बक्कळ कमवतात की! त्यासाठी आत्ता वाटाय काय झालंय? एवढ्याचं काय त्या कागलानं इथल्या वस्तीतल्या लोकांना काशीयात्रेला नेलं व्हतं तेचा इचार करा. त्यानं तर शंभर पानी पुस्तकबी काडलंय, सगळे फोटो, त्यानं कुणाकुणाला यात्र घडवली, काय काय वाटलं तेचे. आख्या वार्डात हजारोंनी वाटली असतील तसली पुस्तकं!"
"अगं, पण नगरसेवक झाला किंवा अगदी महापौर झाला, एवढं मानधन किंवा पगार थोडीच असतोय" - मी आणखी भाबडेपणाचा आव आणला.
"आता कसं सांगायचं तुम्हाला", माझं सारं अज्ञान पुसायचं‌ ठरवल्यासारखं ती म्हणाली, "ते इथे एवढे रस्ते काय उगीच केले, दिसली कुठलीबी‌ टाचकी गल्ली की‌ ओत डांबर, आमच्या घरापुढचा रस्ता तर आता उंबऱ्याच्या पार वर गेलाय. वरती आन् पाट्या बसवल्या, बाकं, बागा पैसा काय नुसता वाहत येतो."
"हं, म्हणूनच दर पावसाला रस्त्यात डबकी साचतात, की‌ पुऩ्हा नवा थर", मी खोचकपणे बोलले, "पाहिलंस ना आमच्या इथल्या ओढ्याची काय वाट लावली आहे. चॅनेलिंग केलं होतं ती सगळी‌ स्लॅब मागच्या पावसात वाहून गेली, त्यावर दिवसन् रात्र जोरदार आवाज करत पूल बांधला, झोपेचं‌ खोबरं. त्या पुलाच्या कामात उरलेलं चॅनेलिंग गेलं. आता वरच्या वस्तीवरून सगळा कचरा येतो, तो इथे साचतो, डासांचं फावतं, . . . "
"मग तक्रार का नाही करत, नगरसेवकाकडे?" - मला थांबवत ती म्हणाली, "माझ्या घरात पावसाचं पाणी‌ आलं होतं, सगळ्य़ा घरात पाणी, मी लगेच फोन केला त्याला, आला होता पाणी‌ काढायला."
"तक्रार कसली, त्या नगरसेविकेला सांगितलं, तर बया पाठ फिरवून निघून गेली तिथून. आणि काय गं तुझ्या घरातलं पाणी काढायला नगरसेवक कशाला लागतो तुला? तुम्हाला नाही काढता येत?"
फार न बोलता तिनं भांड्यांत हात घातले, मी माझं आवरायला निघाले. आमची कामं करायला थोडाच नगरसेवक येणार होता.