Friday, March 24, 2006

इंद्रधनुष्या, ये ना संगे खेळायला.

हे गाणं मी लहानपणापासून म्हणत, ऐकत आलो आहे. इतकी वर्षं, इतक्या वेळा हे इंद्रधनुष्य पाहूनही, अजून ह्या सप्तरंगी स्वर्गीय दागिन्याविषयीचे माझे आकर्षण किंचितही कमी झालेले नाही.

मी आणि माझा एक मित्र राजगडावरून परतत होतो. जवळजवळ दोनचार मैल चाललो असू. पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. कुठेच S.T. ची चाहूल लागत नव्हती. तेव्हढ्यात, एक गाडी येताना दिसली. हात केला आणि ती थांबली. आमची निदान हमरस्त्यापर्यंत जायची सोय झाली. माझी नजर बुलंद राजगडावरून हलत नव्हती. तो आता दूर जाऊ लागला. तेवढ्यात, मित्राने माझं लक्ष समोर वेधलं. समोर संपूर्ण इंद्रधनुष्य माझ्याकडे पाहून हसत होतं. त्याची दोन्ही टोकं आम्हाला दिसत होती. आश्चर्य म्हणजे, आमची गाडी जसजसी त्या इंद्रधनुष्याजवळ जात होती, तसतसे ते एका टोकाकडून नाहीसे होऊ लागले. मी गोंधळून गेलो. बराच वेळ ह्या घटनेचा अर्थच लागत नव्हता. एकदम अंधारात वीज चमकावी तसा, डोक्यात प्रकाश पडला. हुर्यो! आम्ही इन्द्रधनुष्याखालून चाललो होतो. जसजसी गाडी पुढे जात होती तसतसे आम्ही इन्द्रधनुष्याचे प्रतल कापत चाललो होतो. त्यामुळे इन्द्रधनुष्याचा काही भाग, जो आत्तापर्यंत आमच्या आणि सूर्याच्या समोर होता, तो आता मध्ये येऊन नाहीसा होत होता. पुढे जाणाऱ्या गाडीबरोबर माझी नजर अदृश्य होणाऱ्या टोकाचा वेध घेत होती. आम्हाला निरोप द्यायला खुद्द निसर्गाने उभारलेली भव्य कमान आम्ही कसे नाकारणार?

मी खूप काळ इंद्रवज्राबद्दल ऐकून होतो. इंद्रवज्र म्हणजे सम्पूर्ण वर्तूळाकृती इंद्रधनुष्य! असे म्हणतात की, हरिश्चंद्रगडावर हे दृष्य दिसते. ह्यावर कडी म्हणजे जर आपण पुरेशा उंचीवर असू, तर ह्या इंद्रवज्रामध्ये पाहणाऱ्याची सावली दिसते. अर्थातच हे दृष्य डोळ्यांनी पहायची माझी फार इच्छा होती. ती मुम्बईहून कोइंम्बतूरला विमानाने जात असताना फलद्रूप झाली. विमानाखाली शूभ्र ढगांनी यक्षनगरी उभी केली होती. सूर्यानं आमच्या विमानाची या यक्षनगरीत पाडलेली सावली मी पाहत असताना, अचानक ह्या सावलीला सात रंगांनी वलयांकित केले. यापुढे काय बोलू?
मी अजूनही इंद्रवज्रात माझी सावली बघायला आतूर आहे!